अज्ञान मीमांसा

 ज्ञान आणि अज्ञान मीमांसा श्रीधर तिळवे नाईक

युरेशियन परंपरेमध्ये ज्ञानाच्या संदर्भामध्ये सर्वात प्रथम ब्रह्म तंत्र येते या ब्रह्म तंत्रानुसार मीच ब्रह्म आहे हे आत्मज्ञान सर्वात महत्त्वाचे होय याला शह म्हणून गौतम बुद्ध याने आत्मज्ञानाला नकार दिला आणि आत्माच नाकारला पण त्याने ब्रह्माला नकार दिला का तर नाही तर उपनिषदिक वेदांत परंपरेला जे अनिष्ट वळण नंतरच्या काळात लागले ते त्याने दुरुस्त केले होते ब्रह्मतंत्र हे ब्रह्मज्ञानाला सर्वाधिक महत्त्व देते आत्मज्ञानाला सर्वाधिक प्राधान्य देते याउलट गौतम बुद्ध हा अज्ञानज्ञानाला सर्वाधिक प्राधान्य देतो अज्ञान म्हणजे काय तर गौतम बुद्ध यांच्या मते अज्ञान हेच तृष्णेचे मूळ आहे आणि एकदा का या तृष्णांचे आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाचे योग्य ज्ञान झाले की अज्ञान दूर होते आणि निर्वाणाची प्राप्ती होते आत्ताच्या काळात ही अज्ञान ज्ञानमीमांसा आपण अधिक वाढवू शकतो तिची व्याप्ती वाढवू शकतो आणि 

१ आत्मअज्ञान

२ कुल अज्ञान

३ कुटुंब अज्ञान 

४ आप्तावळ व आप्त अज्ञान

५ गोतावळ वा गोत अज्ञान 

६ गण अज्ञान

७ मानव अज्ञान 

असे अज्ञानाचे सात प्रकार करू शकतो कारण अज्ञान असे सात पद्धतीने अस्तित्वात असते


गौतम बुद्ध हा फक्त आत्म अथवा जिविक अज्ञानासंदर्भात बोलत असला तरी आता त्याची व्याप्ती वाढवणे हे अत्यंत आवश्यक झालेले आहे . केवळ जीवच नाही तर एखादे कुटुंब अथवा कुल हे सुद्धा संपूर्ण अज्ञानी असू शकते इतकेच नव्हे तर एखादा गण त्याला आजकाल आपण राष्ट्र असे म्हणतो ते संपूर्ण राष्ट्रच अज्ञानात असू शकते एखादा गटच किंवा एखादी आप्तावळ म्हणजेच आप्तांचा गट एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण अज्ञानात असू शकतो किंवा एखादा गोतावळा म्हणजेच गट ग्रुप अज्ञानात असू शकतो प्रश्न असा आहे की हे अज्ञान निर्माण कसे होते तर त्याचे उत्तर आसक्ती असे आहे आणि आसक्ती ही गौतम बुद्ध म्हणतो तशी फक्त तृष्णारूप असत नाही तर घनरूप भूक द्रव्य रूप तृष्णा आणि वायुरूप निकड अशा तीन रूपामध्ये वावरू शकते

आसक्तीचे सुद्धा 

१ व्यक्तिगत अथवा जीवात्मक आसक्ती 

२ कुटुंबात्मक आसक्ती  

३ कुलात्मक आसक्ती 

४ आप्तात्मक आसक्ती

५ गोतात्मक आसक्ती

६ गणात्मक आसक्ती 

७ मानवात्मक आसक्ती 


असे सात प्रकार असू शकतात गोतात्मक आसक्ती ही एक फार गुंतागुंतीची गोष्ट आहे स्वतःचा गोतावळा पुढे नेणे हा तिचा मुख्य अजेंडा असतो गोत अथवा गणगोत ही मूळची शैव संकल्पना जी आजही काही आदिवासी जमातींच्या मध्ये जिवंत आहे ती युरेशियन लोकांनी स्वीकारून गोत्र निर्माण केले आणि त्यातून प्रचंड गोंधळ निर्माण झाले कारण गोत ही वास्तव आहे तर गोत्र हे काल्पनिक आहे गोत हे दोन प्रकारचे असते १ मैत्रय गोत २ गणगोत सर्वसाधारणपणे ज्याला आज आपण कायदा म्हणतो तो कायदा गोताला बांधून ठेवतो याला मूळ शब्द सूत्र वां विधी सूत्र असा आहे आणि तो कापसावरून आलेला आहे सूत असे त्याला म्हणतात त्याचे संस्कृत रूप पुढे सूत्र असे झाले आणि अनार्यशैव परंपरा ही नेहमीच सुत अथवा सूत्र जतन करायची व सांगायची त्यातूनच पुढे सूत नावाची एक भटकी जमातच तयार झाली त्यांचा नंतर एक सूत नावाचा गण ही बनला त्यातूनच पुढे सुक्त ही संकल्पना जन्मली जी युरेषियन लोकांनी अधिक मोठ्या प्रमाणात राबवली पुढे पुढे युरेशियन श्रुतीमध्ये धर्म प्रभावी होत गेला आणि सूत्र हे ज्ञानप्रधान न राहता अनुभव प्रधान होत गेले आणि युरेशियन सूत परंपरा ही ज्ञान सांगण्यासाठी कथा सांगायला लागू लागली आणि त्यातूनच पुढे पुराणे बनत गेली आणि याचाच अधिक पुढचा अविष्कार म्हणून किर्तन जन्मले 


प्रश्न असा आहे की अज्ञान नेमके कोण निर्माण करते का निर्माण करते कसे निर्माण करते ?


ज्याला आपण आजकाल सामूहिक भूका, तृष्णा आणि निकडी म्हणू शकतो त्या नेमक्या कोण का कशासाठी केव्हा कशा निर्माण करतं? 


आपण अलीकडे ज्ञान या प्रक्रियेविषयी सतत बोलतो मला वाटतं की आता वेळ आलेली आहे की आपण अज्ञान या प्रक्रियेविषयी अत्यंत सखोल चर्चा केली पाहिजे अज्ञानाचे स्वरूप काय आहे या अज्ञानाची मॅनेजमेंट कोण चालवतो कशी चालवतो याविषयी अत्यंत खोलात जाऊन चौकशी करण्याची वेळ चिन्हसृष्टी युगामध्ये आलेली आहे पोस्टट्रूथ युग हा शब्द प्रयोग भीषण आहे परंतु आपणाला ही भीषणता लक्षात येत नाही कारण truth जिवंत असलं काय किंवा नसलं काय काही फरक पडत नाही असा आपला भ्रम झालेला आहे किंबहुना तसा भ्रम निर्माण करून दिलेला आहे आणि तो अज्ञानाने निर्माण केलेला आहे आणि हे अज्ञान अत्यंत पद्धतशीरपणे स्पॉन्सर केले जात आहे 

आत्तापर्यंतच्या सर्व युगामध्ये अज्ञान हे कायमच डार्क होते आता मात्र ते प्रथमच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश तोही खोटा प्रकाश चिन्हात्मक प्रकाश स्पॉन्सर करत आहे आणि त्यामुळे एका खोट्या चिन्हप्रकाशाची वावटळ वलय म्हणून स्वीकारणारे लोक निर्माण होतात हे चिन्ह वलय इतके भ्रमात्मक असते की ब्रम्हात्मकतेचा सत्यात्मकतेचा प्रश्न सुद्धा पडत नाही सत्यात्मकता पूर्णपणे साईडलाईन करून असत्यात्मकता प्रस्थापित करणे तिच्यावर कोणी टीका केल्यास त्याच्यावर केसेस टाकणे अशा प्रकारचे उद्योग सुरू झालेले आहेत आमचे अज्ञान तुम्ही उघडे पाडाल तर आम्ही तुम्हाला तुरुंगाचा रस्ता दाखवू अशा प्रकारच्या धमक्या कळत नकळतपणे दिल्या जात आहेत आणि हे सत्यासाठी योग्य नव्हे सत्यात्मकता ही कुठल्याही राष्ट्राचा प्राण असते जर तीच गुप्त झाली तर मग सर्व काही लुप्त होत जाते आणि नंतर उरतात ते फक्त धार्मिक सांगाडे ! मुस्लिम आक्रमणापूर्वी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा स्वतःच असा धार्मिक सांगाडा तयार केलेला होता कुठलाही यज्ञ कुठलीही पूजा या प्रक्रियेला थांबवू शकली नाही आणि आपण पराभूत झालो नंतर इंग्रज येण्यापूर्वी सुद्धा आपण असाच धार्मिक सांगाडा तयार केला आणि आपण इंग्रजांच्याकडून पराभूत झालो याचे कारण आपण आपल्या पूर्वजांना विसरलो जे सतत सांगत होते ते ज्ञान परम सत्य आहे


ज्ञानासारखा प्रकाश नाही हे आपले सर्व पूर्वज सांगतच असतात मग ते अनार्यशैवधर्माचे असोत किंवा वैष्णव धर्माचे वा कुठल्याही धर्माचे असोत अज्ञान हे नेहमीच अंधाराकडे नेते आपण आपल्या राष्ट्राला अज्ञानाकडे घेऊन जाणार आहोत का असा प्रश्न आता सर्वांनी स्वतःला विचारावां खोट्या केसेस टाकून जर का अज्ञानाचे समर्थन करायला अज्ञानाच्या बाजाराचे समर्थन करायला आपण सोकावणार असू तर या देशातल्या हिंदुत्वाला कसलेही भवितव्य नाही मुस्लिम आणि इंग्रजी आक्रमणाच्या आधी आपण नेमकी हीच चूक केली होती आणि आता पुन्हा एकदा आपण तीच चूक करत आहोत अज्ञान ही नेहमीच सत्तेची ताकद असते किंबहुना सत्ता जास्तीत जास्त जनतेला जास्तीत जास्त अज्ञानी ठेवते हे घडू नये म्हणून तर सत्ता आणि ज्ञान असे दोन वेगळे वर्ग तयार करण्यात आले आणि त्यातूनच पुढे ब्राह्मण आणि क्षत्रिय असे दोन वर्ण निर्माण झाले जर ज्ञानी लोक म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण जर ज्ञानाऐवजी अज्ञानाचे समर्थन करणार असतील तर या देशातल्या ज्ञानाचे होणार काय ? निंदा आणि टीका सहन करण्याइतपत बळ जर तुम्हाला ज्ञानातून लाभत नसेल तर मग त्या ज्ञानाचा फायदा काय ? ज्ञानाची सर्वात मोठी जी काही खासियत आहे ती म्हणजे सतत स्वतःचे परखड आत्मपरीक्षण करत स्वतःला सतत सुधारत न्हेणे स्वतःला उन्नत करणे ही होय ज्ञानाचे सर्व मार्ग खुले असले पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रकारची टीका करण्याचा अधिकार आपण सर्वांना दिलाच पाहिजे केवळ कोणी टीका करतो म्हणून जर का आपण त्याच्यावर कोर्टात केसेस टाकणार असू तर मग टीका होणार नाही आणि एकदा टीका थांबली की अज्ञान वाढत जाते असा आजवरचा आपला इतिहास आहे बाहेर आक्रमक टपलेलेच आहेत आता त्यांना आपण पुन्हा संधी द्यायची का हा प्रश्न स्वतःलाच विचारावा तुकाराम महाराजांनी आधीच सांगितलेले आहे की निंदकाचे घर असावे शेजारी ! तुकाराम वाचून सुद्धा नींदेचे आणि टीकेचे महत्त्व कळत नसेल तर आपणाला तुकाराम काय कळाले? 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना