bjp

 

वैदिक हिंदुत्ववाद आणि स्वामी दयानंद सरस्वतींनी सांगितलेले हिंदू धर्मावरचे १० कलंक श्रीधर तिळवे नाईक
स्वामी दयानंद सरस्वती यांचा लढा हिंदू धर्मातल्या अनेक चुकीच्या प्रथांच्या विरोधात होता त्यांनी हिंदू धर्मावर दहा कलंक असल्याचे सांगितले ते पुढील प्रमाणे
१ मूर्तिपूजा और अवतारवाद
जन्मदत्त वर्ण आणि जाति-पाति
३अस्पृश्यता स्त्री पुरुष विषमता
४ श्राद्ध
५ स्वर्ग आणि नरक
६ पण्डे, महन्त, मठाधीश , आचार्य आणि भगवान् यांच्यासारखे स्वतःला ईश्वराचे प्रवक्ते म्हणवणारे लोक
७ जन्मपत्री, हस्तरेखा, फलित ज्योतिष , कुचक्र
८ शाप वरदान
९ गंडेदोरे
१० स्त्री पुरुष विषमता
याशिवाय गीतेला प्रमाण ग्रंथ मानणे ते योग्य मानत नव्हते ते वेदांना प्रमाण मानत होते गीतेला नाही त्यांच्यामध्ये गीता हा फक्त आचार्य ग्रंथ आहे आणि आचार्यांना त्यांचा विरोधच होता त्यामुळे गीतेला ग्रंथ म्हणून स्वीकारावे पण आर्ष ग्रंथ म्हणून नव्हे असे त्यांचे म्हणणे होते
त्याचबरोबर वेद हे सर्वच शूद्र लोकांच्यासाठी ही आहेत अशी त्यांची भावना होती किंबहुना सर्व मानव जातीसाठीच वेद लिहिले गेले असे ते म्हणत त्यासाठी ते यजुर्वेदातला पुढील अंश देत
'ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय' (यजुर्वेद 26.2)
भाषांतर
वेद ब्रह्मण, राजन्य ,वैश्य आणि शूद्र यांच्यासह समस्त आत्मा म्हणजे मनुष्यप्राणी आणि शत्रू यांच्यासाठीही आहेत
वेदांच्या मध्ये ब्रह्मण आहेत ब्राह्मण नाहीत राजन्य आहेत क्षत्रिय नाहीत नंतर प्रक्षिप्त करून हे शब्द घुसवले गेले पण ते प्रत्यक्ष मुळ वेदांच्यात नसावेत
प्रश्न असा आहे की हिंदुत्ववादी हा वैदिक हिंदुत्ववाद का स्वीकारत नाहीत ? हिंदुत्ववादाचा एकच एक चेहरा नाही स्वामी दयानंद सरस्वतींचे हिंदुत्व (कदाचित त्यांना हिंदुत्व हा शब्द सुद्धा मान्य झाला नसता कारण त्यांना हिंदू हा शब्दच मान्य नव्हता) हे आर्यत्व आहे आणि ते आर्य हा शब्द प्रमाण मानतात त्यामुळे हे हिंदुत्व ज्याला आपण आद्य हिंदुत्व म्हणू शकतो हे नंतरच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे झालेले दिसते
याला काटशह म्हणूनच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्राह्मणी हिंदुत्व मांडलेले दिसते आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये तेच प्रथम अवतरले आणि त्याचा अत्यंत भयंकर असा परिणाम महाराष्ट्रावर झालेला आहे
याचे कारण एकच होते महाराष्ट्रातले ब्राह्मण कधीही पेशवाईच्या सावली मधून बाहेर पडले नाहीत पेशवाईतली मनुस्मृतीची मेंटॅलिटी ते सतत स्वतःच्या हृदयामध्ये घेत वावरत राहिले म्हणूनच मनस्मृतिप्रधान हिंदुत्व हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झळकत राहिले आणि ते जिथे जिथे प्रभावी झाले तिथे तिथे वैदिक हिंदुत्वापासून तुटत गेले अर्थात याला काही अपवाद होते मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ते मात्र ब्राह्मणी हिंदुत्वापेक्षा वैदिक हिंदुत्वाकडे जास्त आकर्षिले गेले होते साहजिकच ते वेदांती होते आणि वेदांती हिंदुत्व हे वैदिक हिंदुत्वाच्या जास्त जवळचे आहे म्हणूनच आज देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देत नाहीत कारण सावरकर सुद्धा गीते संदर्भातील तत्व सोडून दहाही कलंक ते कलंकच मानतात ते यामध्ये स्वतः शोधलेला अकरावा कलंक ॲड करतात तो म्हणजे सद्गुण विकृती त्यांच्यामध्ये हिंदू हे सदगुणी आहेत आणि ते इतके सदगुणी आहेत की कधीकधी स्वतःचे धार्मिक हितसंबंध सुद्धा ते बघत नाहीत माझ्यामते यात तथ्य नाही माझे स्वतःचे मत असे आहे की अनेकदा हिंदू हे जातीपाती त वर्णा व्यवस्थेत वाटले जातात आणि हळूहळू इतर वर्णांच्या बाबतीत आणि जातींच्या बाबतीत वाटले जातात आणि मग ते त्यांच्या बाबतीत इतके असहिष्णू आणि दुर्गुणी होत जातात की काही सीमा राहत नाही आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या धर्मातील ९० टक्के लोकांचा द्वेष करायला लागता तेव्हा जे व्हायचे तेच होते तुम्ही मग हळूहळू स्वतःच्या धर्माबाबतीत बधीर होत जाता या संवेदन बधिरतेला ते आणि बाहेरचे अनेक तथाकथित विचारवंत हिंदूंचा सहिष्णु पणा व उदारमतवाद समजतात स्वतःच्या कुटुंबाखेरीज कशातच रस नसणे हे हिंदूंचे एक लक्षण आहे साहजिकच अगदी राजकारणातले लोक सुद्धा स्वतःच्या कुटुंबापलीकडे पाहत नाहीत जास्तीत जास्त नातेवाईक आणि गणगोत स्वतःचा वर्ण किंवा स्वतःची जात त्यापलीकडे अनेकांची मजल जात नाही त्यामुळे पक्षीय निष्ठा सुद्धा गहाळ होत चालली आहे अनेकदा हिंदू लोक हे परधार्जिणे होत राहतात कारण ते स्वतःच्याच धर्मा मधल्या पण दुसऱ्या वर्णात आणि दुसऱ्या जातीत असणाऱ्या लोकांचा द्वेष करतात एखादा हिंदू अस्पृश्य हिंदूबरोबर जेऊ शकत नाही परंतु मुसलमानांच्या बरोबर जेऊ शकतो कारण यासंदर्भात कसल्याही धार्मिक आज्ञा नव्हत्या पुढे त्या आल्या
मी याला अल्पनेत्र वृत्ती म्हणेन किंवा अल्पदृष्टी वृत्ती म्हणेन त्यातूनच मग माणसाला स्वतःच्या आसपास तर माणसे लागतात ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि स्वतःच्या धर्मातल्या लोकांच्यासाठी दरवाजे बंद झालेले असतात किंबहुना ते स्वतःच बंद केलेले असतात मग व्हायचे ते होते पावणे येऊ शकतात पण पर जातीतला आणि पर वर्णातला स्वधर्मी माणूस येऊ शकत नाही यातूनच पर धर्मातले अतिथी देव वाटतात अतिथी देवो भव किती करायचे याचा पासपोस अनेकदा राहत नाही मी सदगुणांना विकृती मानत नाही माणसाने सदगुणीच असले पाहिजे मात्र त्याचा अर्थ स्वतःचे संरक्षण करणे सोडून दिले पाहिजे असा नाही स्वधर्मी लोकांचा द्वेष सोडून दिला पाहिजे खरे तर सर्वच धर्मातल्या लोकांच्यावर प्रेम करता आले पाहिजे पण हिंदू इतके थोर आहेत की ते परधर्मीय लोकांच्यावर प्रेम करू शकतात परंतु स्वधर्मी लोकांच्यावर नाही त्यामुळेच अनेकदा परकीय आक्रमकांना स्वतःच आमंत्रण देणे किंवा ते आमंत्रणा शिवाय आले तर त्यांनाच आपल्याच माणसांच्या विरोधात मदत करणे अशा प्रकारचे उद्योग जितके हिंदूंनी केलेले आहेत तितके कदाचित जगातल्या कुठल्याच धर्मातल्या लोकांनी केली नसतील त्याबाबतीत लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे हेच हिंदू जेव्हा मुस्लिम धर्मात जातात तेव्हा मात्र ते स्वतःच्या धर्मातल्या लोकांच्यावर प्रेम करायला शिकतात अनेकदा तर कट्टर बनतात याचा अर्थ स्पष्ट आहे की हिंदूंच्यातले सगळे दुर्गुण हे हिंदू धर्माने स्पॉन्सर केलेले आहेत म्हणूनच हे दहा कलंक दूर होणे फार गरजेचे आहे
मला व्यक्तिशः असे वाटते की सद्गुण ही विकृती होऊ शकत नाही त्यामुळे सावरकरांची सद्गुण विकृती संकल्पना मी स्वीकारत नाही सर्व माणसांनी सद्गुणीच असले पाहिजे. मात्र हे सद्गुण असताना एक गोष्ट नेहमी पाहिली पाहिजे विशेषता समोर जर दुर्जन आणि लबाड लोक असतील तर आपले सद्गुण विकृती होणार नाहीत त्याची काळजी घेतली पाहिजे
प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष ह्या १० कलंकांना आणि मी दिलेल्या अल्प नेत्रवृत्ती या अकराव्या , परधर्म धार्जिणेपणा ह्या बाराव्या व स्वधर्म बंधू बधिरता या तेराव्या कलंकाना हटवणार आहे की नाही? बटेंगे तो कटेंगे सारख्या निगेटिव्ह घोषणा देण्यापेक्षा तेरा कलंक दूर करेन मग स्वतःला हिंदू म्हणेन अशा घोषणा देणे जास्त चांगले आणि पॉझिटिव आहे दुसऱ्या धर्मांना नावं ठेवावी आणि स्वतःचा धर्मातले कलंक मात्र झाकून ठेवावेत हे चांगले नाही आतापर्यंत तरी हिंदुत्ववादाला ना स्वामी दयानंद सरस्वती झेपले ना स्वातंत्र्यवीर सावरकर झेपले हिंदुत्ववादी लोक ऑफिसात फक्त त्यांचे फोटो लावतात पण प्रत्यक्ष त्याने काय सांगितले त्याच्या आचरणाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झालेले असते अलीकडे तर ब्राह्मणी हिंदुत्वाचे मुख्य प्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोळवलकर गुरुजी यांचेच प्रभुत्व वाढत जाणार आहे की काय अशी आता शंका येते आहे हे झाले तर हिंदुत्वाचा अस्त होणे अटळ आहे

श्रीधर तिळवे नाईक

राममंदिर ते मनुस्मृती भाजपचा वैष्णव हिंदूत्व प्रवास श्रीधर तिळवे नाईक 

ह्या निवडणुकीत भाजपने केलेला एक क्रांतिकारक बदल सर्वांच्याच नजरेतून निसटला तो म्हणजे हर हर महादेव ही घोषणा बाजूला करून जय श्रीराम ह्या घोषणेचे मोदींनी केलेले समर्थन तिचा प्रचार

मुळात हिंदुत्ववादाने  गोळवलकरांच्या काळात ब्राह्मणी हिंदुत्व स्वीकारले होते पण लोक त्याला भुलले नाहीत १९८० नंतर ब्राह्मणी हिंदुत्व बाजूला सारून संघाने वैष्णव हिंदुत्व जवळ केले महाराष्ट्रात विठ्ठल पूर्णच स्वीकारला ह्या वैष्णव हिंदुत्वाने प्रथम राम मंदिर आंदोलनाची घोषणा केली ह्या वैष्णव हिंदुत्वामुळे व्याप्ती वाढली तरी पूर्ण बहुमत मिळेना तेव्हा भाजपने २०१४ साली मोदींच्यासारखा हर हर महादेव म्हणणारा नेता पुढे आणला आणि भाजपला प्रथमच निर्विवाद बहुमत मिळाले २०१९ ला त्याची पुनरावृत्ती झाली आणि ह्या बहुमतानंतर भाजपने पुन्हा मूळचा वैष्णव हिंदुत्वाचा कार्यक्रम हातात घेतला 

सर्वात प्रथम रामलल्ला मंदिर पूर्ण करायला घेतले जय श्रीराम ही घोषणा देण्यात आली भारतभर ती पुन्हा घुमवण्यात आली शैव धर्मियांच्यात त्यामुळे एक अस्वस्थता येणे अटळच होते आपण फक्त निवडणुकीपुरते वापरलो गेलो कि काय असा प्रश्न शैवांच्यात निर्माण झाला ह्या असंतोषाला शांत करण्यासाठी काशीतील शिवमंदिराची राम मंदिरासारखीच स्थापना करण्यात येईल असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी द्यायला सुरवात केली 

२०२१ २२ २३ २४ ह्या सालात अचानक बहुजनांचा नायक भगवान शंकर बाजूला करण्यात आला आणि बहुजनांचा नायक म्हणून भगवान श्रीराम पुढे आणण्यात आले आणि ही निवडणूक भाजपने पुन्हा एकदा वैष्णव हिंदुत्वाखाली लढवली आहे ह्यामागे कारण काय होते ?

ह्यामागे कारण होते जॉन्सन आणि ग्रिम ह्यांचा २०१० साली प्रसिद्ध केलेला अहवाल ! तो अचानक २०२० साली भाजपमध्ये दाखल झाला ह्या अहवालाच्या मते २०१० साली भारतात ६४ करोड वैष्णव धर्मी ३० करोड शैव धर्मी लोक आहेत २०२४ ला हे प्रमाण ८० करोड वैष्णव ४० करोड शैव असे होते शिखांचा समावेश शैवांच्यात केला तर ४२ करोड ! साहजिकच भाजपला आता असे वाटायला लागले आहे कि निवडणूक जिंकण्यासाठी केवळ वैष्णवांची मते पुरेशी आहेत 

आमचा सर्वे ह्याबाबत वेगळा होता आमच्या मते भारतात शैव ४२ करोड वैष्णव ३० करोड आहेत आणि राम कृष्ण ह्या वैष्णव शिव शक्ती ह्या शैव अशा चौघांची एकसाथ एकत्रित उपासना करणारे ४९ करोड आहेत करोड परशुराम वा नरसिंह अशा वैष्णव अवतारांची उपासना करताहेत जॉन्सन आणि ग्रिम ह्यांनी ह्या ५० करोड लोकांचा समावेश वैष्णवांच्यात केला आहे 

भाजपला हे मान्य नसावे साहजिकच वैष्णवांना खुश करण्यासाठी जय श्रीराम ही घोषणा मुख्य घोषणा बनवण्यात आली 

ह्यामुळे शैवांच्यापुढे धर्मसंकट निर्माण झाले पण पुन्हा एकदा काशीमधील मंदिर पाडून उभी केलेली मशीद पुन्हा शैवांना देऊ तिथे भव्य शिवमंदिर निर्माण करू असे आश्वासन देण्यात आले 

मी नेहमीच सांगत आलो आहे कि वैदिक , ब्राम्हण , वैष्णव ह्यांच्यानंतर युरेशियन लोकांनी चौथा धर्म बनवला आहे आणि तो आत्ताचा हिंदू धर्म आहे ह्या हंदू धर्माचे चार  धर्मग्रंथ मुख्य आहेत वेद , रामायण , महाभारत (भगवदगीता ) मनुस्मृती ! साहजिकच वैष्णव हिंदुत्व ह्या चारी धर्मग्रंथांचा प्रसार प्रचार करते आणि त्याचा भाग म्हणूनच रामलल्लाचे मंदिर बांधून त्याचा गाजावाजा करण्यात आला त्याला जगप्रसिद्धी मिळवून देण्यात आली 

आता पुढचे पाऊल अभ्यासक्रमात वेद महाभारतातील भगवदगीता मनुस्मृती ह्यांचा अभ्यासक्रमात समावेश करायचा  तर दुसरीकडे शैवांच्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला वैदिक सिव्हिलायझेशन म्हणून हायजॅक करायचे ह्यांचा तसा समावेश अभ्यासक्रमात आणायचा हे आहे हे झाले कि भारताचे युरेशियीकरण पूर्ण होईल असे भाजपला वाटते 

ह्या प्रकारात सर्वाधिक गोची ही शैवांची होणे अटळ आहे पुरोगामी लोकांनी शैव धर्म नाकारून इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याने पुरोगामी काँग्रेस साम्यवादी समाजवादी वा आंबेडकरवादी पक्ष शैवांच्यासाठी कायमच बाद होते आणि आता भाजपनेही शैवांना बाजूला केलेले आहे 

महाराष्ट्रात तर ही गोची अधिकच मजबूत आहे कारण इथले पुरोगामी वारकरीवादी वैष्णववादी आहेत 

मला वाटतं ही निवडणूक २०२९ ची निवडणूक शैवांच्यासाठी फार महत्वाची असेल 

श्रीधर तिळवे नाईक 

 

  धर्म म्हणजे मोक्ष नव्हे 

श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये अलीकडच्या काळात पसरलेल्या ज्या काही गैरसमजुती आहेत त्यातील एक गैरसमजुत म्हणजे धर्म म्हणजे मोक्ष होय वास्तविक भारतीय परंपरेमध्ये युरेशियन आल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष असेच चार पुरुषार्थ सांगितले गेले होते परंतु हे चार पुरुषार्थ समजून न घेताच पुढे रेटले गेले अलीकडच्या काळात तर हा गैरसमज आधुनिक, पुरोगामी , उत्तराधुनिक विचारवंतांनी प्रचंड प्रमाणात वाढवून ठेवला आहे यामध्ये ओशो रजनीश यांच्यासारखा माणूससुद्धा सामील आहे उदाहरणार्थ ओशो यांनी अनेकदा धर्म हा सामूहिक असत नाही तो प्रचंड वैयक्तिक असतो वगैरे वगैरे सांगून धर्म म्हणजे मोक्ष अशी व्याख्या केलेली आहे वास्तविक धर्माचा आणि मोक्षाचा काडीचाही संबंध नाही म्हणूनच आपल्याकडे युरेशियन परंपरेने धर्म आणि मोक्ष हे दोन वेगळे पुरुषार्थ मानलेले आहेत आज आपण जेव्हा इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म अशा व्याख्या करतो तेव्हा एक  गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या दोन्ही धर्मांच्यामध्ये मोक्ष ही संकल्पना नाही आता जर ह्या दोन धर्मात मोक्ष नावाची संकल्पनाच नसेल तर मग तुम्ही धर्म म्हणजे मोक्ष असं का म्हणता आहात आणि त्या पद्धतीने का भाष्य करता आहात?  यामुळे फक्त गोंधळ उडलेला दिसतो जुडाईक परंपरा कधीही आपले प्रेषित मोक्षाला पोहोचलेत असं म्हणत नाहीत उलट ते त्यांना अल्ला किंवा गॉड यांच्या जवळ पोहोचलेत असे म्हणतात आणि कयामतीला ते त्यांच्या शेजारीच बसलेले असणार आहेत असेही सांगतात याचा अर्थ स्पष्ट आहे धर्म ही श्रद्धेवर आधारित महाश्रद्धा आहे जी श्रद्धेबरोबरच श्रद्धेवर आधारित कायद्याची व्यवस्था देते आपल्याकडेही समाजाला धारण करतो तोच धर्म असे म्हटले जाते म्हणजे तिथेही धर्माचा संबंध हा श्रद्धेशी आणि समाजाला कायदे देणाऱ्या कायदेशीर व्यवस्थेशी आहे हे मान्य आहे त्यामुळेच ब्राह्मण धर्म वारंवार स्मृतींचा उल्लेख करत असतो आणि आपल्या धर्माला हिंदू धर्मीय लोक सुद्धा श्रुती स्मृतीपुराणोक्त असेच म्हणतात ज्यातील स्मृती या कायद्याशीच निगडित आहेत अनेकदा पुराणेसुद्धा कायद्याशीच निगडित आहेत ती उदाहरण म्हणून वापरली जातात अनेकदा रामायणातले शंबुकाचे उदाहरण वापरले जाते तेव्हा रामायण हे कायदेशीर पुस्तकच असते


प्रश्न आहे इतक्या स्पष्टपणाने दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या असतील तर त्या एक करण्याचा उद्योग का चाललेला आहे ? मुख्य म्हणजे ओशो रजनीशांच्यासारखा एवढा विचारवंत माणूस हे कसं काय करतो यासाठी आपणाला युरेशीयन परंपरेतील युरेशियन परंपरेतील ब्रम्ह,सांख्य ,जैन आणि बौद्ध धर्मांच्यापाशी जावे लागते या लोकांनी प्रथम हा घोटाळा सुरू केला यांनी  धम्म म्हणून मोक्षाचा मार्ग सांगितला आणि या मार्गाच्या आधारे कायद्याची कुठलीही स्मृतींच्या पेक्षा वेगळी कायदेशीर व्यवस्था सांगितली नाही परिणाम असा झाला की या देशातून स्मृतींचा प्रभाव कमी झालाच नाही कारण कायदे तर हवेत आणि युरेशियन परंपरा मानणाऱ्या राजांच्याकडे स्मृती हेच कायदे असल्याने त्यांनी सांख्य जैन व बौद्ध धर्म स्वीकारला तरी अनेकदा स्मृतिजन्य कायदे पाळलेले दिसतात अर्थात याला काही अपवाद आहेत उदाहरणार्थ सम्राट अशोक पण हे अपवाद आहेत 

याबाबत शैव श्रुतीचा एक स्पष्ट स्टांस आहे तो म्हणजे दंडसंहिता ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि ती त्या त्या काळानुसार त्या त्या राजाने लिहायला हवी साहजिकच प्रत्येक शैव गणपतीने म्हणजेच राजाने किंवा गणप्रमुखांनी वेगवेगळे कायदे केलेले दिसतात आणि ते त्या त्या काळाचे आहेत शिवाजी महाराज हे याचे उत्तम उदाहरण आहे आणि संभाजी महाराज हेही उत्तम उदाहरण आहे कारण संभाजी महाराजांनी देखील आपल्या काळानुसार शिवाजी महाराजांनी दिलेल्या कायद्यात काही बदल केलेले आहेत उदाहरणार्थ गुलामगिरीची परंपरा ही संपूर्णपणे संभाजी महाराजांनी कायदेशीर पातळीवर नाकारली आणि त्याचेच काही परिणाम ज्यांना जीव घेणे परिणाम म्हणता येईल झालेले आहेत कारण त्यांचे हे कायदे अनेकांना मान्य नव्हते कारण गुलामगिरीत अनेकांचे हितसंबंध गुंतलेले होते जिथे पितापुत्रांचे दोन वेगळे कायदे होऊ शकतात तिथे शैव काळाला का महत्व देतात ते स्पष्ट व्हावे कारण दोन पिढ्यांचासुद्धा काळ वेगळा असू शकतो याची जाणीव शैवांना आहे 

चंद्रगुप्त मौर्य , बिंबिसार आणि सम्राट अशोक हे एकाच वंशाचे शैव राजे होते पण मोक्षाकडे जाताना राज्य शासनाचा यांनी त्याग केलेला आहे आणि मोक्षाकडे जाण्यासाठी प्रत्येकाने वेगळा मार्ग निवडलेला आहे उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्य शैव  असूनही जैन झाले बिंबिसार मात्र शैवांच्याच आजीवक दर्शनानुसार मोक्षाच्या साधनेकडे गेले तर आयुष्यभर स्वतःला चंडाशोक आणि कालाशोक म्हणवून घेत काली आणि चंडीची भक्ती करणाऱ्या अशोकाने बौद्धांचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यासाठी कुठल्याही शैवाने त्याला अडवलेले नाही याचे कारण त्या काळामध्ये हे मार्ग आपल्यापेक्षा वेगळे आहेत असे शैव मानतच नव्हते हे मार्ग पुढे वेगळे आहेत असे सांगणारे लोक निर्माण झाले

या प्रत्येक सम्राटाचे राज्य शासन मात्र मौर्य कायद्यानुसारच होत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे कारण धर्म वेगळा आणि मोक्ष वेगळा याची कल्पना सर्व मौर्य राजांना होती 

कालांतराने हे धर्म पूर्णपणे वेगळे आहेत असे मत स्थिरावले विशेषत: ब्रिटिशांच्या काळातच हे मत जास्त फोफावलेले आहे अन्यथा वाकाटकांनीसुद्धा कैलास मंदिर बांधताना आरामात जैनांची आणि बौद्धांची शिल्पे खोदलेली दिसतात ती खोदलीच नसती असो हल्ली अनेकांना वेगवेगळे धार्मिक उन्माद चढतात आणि शैवांचा उदारमतवाद कोणालाच दिसत नाही 

हे असे का मानले गेले असेल यामागचे कारण उघड आहे खुद्द भगवान शंकरांनी ११४ तंत्रे दिलेली आहेत आणि ही कालातीत आहेत मात्र तरीही त्यांच्यात बदल करण्याचा अधिकार प्रत्येक साधकाला दिलेला आहे त्या उलट धर्म मात्र किंवा दंड संहिता मात्र कालनिष्ठ असते गणपतीनिष्ठ असते गणनिष्ठ असते असेच सांगितलेले आहे त्यामुळेच कोकणातल्या परशुरामाची (ह्या शैव व शिवशिष्य असलेल्या परशुरामाचा आणि विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामाचा काहीही संबंध नाही) राजवट वेगळे कायदे करते तर आसाम मध्ये पार्वतीची राजवट वेगळीच चौकट सांगते म्हणजेच तंत्र म्हणजेच मोक्ष कालातिततेकडे जातो ह्याउलट धर्म मात्र तात्कालीक असतो

आता इतिहास इतका स्पष्ट असताना धर्म आणि मोक्ष हे दोन वेगळे पुरुषार्थ आहेत हे सतत सांगितलेले असूनही ही गडबड का पुन्हा पुन्हा केली जात आहे? हा प्रश्न विचारण्याचे कारण हीच गडबड पुढे पुरोगामी लोकांनी केलेली दिसते त्यांनीही धर्म आणि मोक्ष एकच केले याचा परिणाम असा झाला की जो तो धर्म सनातन आहे धर्म सनातन आहे असे सांगू लागला पण सनातन म्हणून काय पुढे वाढले जाणार आहे याची कल्पना कोणालाच आली नाही आणि ब्राह्मण धर्माने सनातन म्हणून आपोआपच श्रुती स्मृतीपुराणोक्त धर्म प्रत्येकाच्या ताटात वाढला आणि लोकही आनंदाने जेवू लागले

सुदेवाने संविधान वेगळे आणि धर्म वेगळे असे मानणारी सेक्युलर परंपरा सत्तेवर आली आणि आंबेडकर घटनेचे शिल्पकार झाले अन्यथा माहित नाही काय झाले असते या लोकांनी पुन्हा एकदा धर्म वेगळा आणि संविधान वेगळे अशी भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेत पुन्हा धर्म म्हणजेच मोक्ष झाला म्हणजे सेक्युलर वादाने  प्रत्यक्षात धर्म म्हणजेच मोक्ष ही पुरोगामी अंधश्रद्धा नष्ट केलीच नाही उलट ती दृढच केली त्यामुळे आपोआपच धार्मिक कायदे संविधानात समाविष्ट झाले वास्तविक मोक्षिक स्वातंत्र्य सर्वांनाच द्यायला आहे आणि धर्म हा आता कालबाह्य झाल्याने नवीन संविधान आम्ही देत आहोत असे सांगायला हवे होते पण हे झाले नाही आणि धर्म पुन्हा एकदा लोकांच्या डोक्यात बसला आणि आज अवस्था अशी आहे की धर्माचे कमबॅक झालेले आहे आणि ते देशाला कुठे घेऊन जाणार आहे याची कोणाला कसली कल्पना नाही हे पुरोगामी लोकांचे पाप आहे आणि आश्चर्याची गोष्ट त्यांना ते दिसत नाही इंग्रजांच्या वसाहतवादाचा हा झालेला सर्वात मोठा दुष्परिणाम आहे त्यांच्याकडे ते ख्रिश्चन असल्याने मोक्ष ही संकल्पना नसल्याने त्यांनी मोक्ष थेट साल्वेशनशी जोडून धर्म आणि मोक्ष एक करून टाकले आपल्याकडे इंग्लंडकडे बुद्धी टाकलेल्या पुरोगामी विचारवंतांनी हे रिपीट केले इंडियन धारा काय आपला वैचारिक वारसा काय याचा कसलाही अभ्यास न करता कलोनियल चष्म्यातून पाहण्याची ही पुरोगामी लकब आज भारतात धर्मराज्य येते की काय अशी शंका निर्माणकर्ती झाली आहे . पुरोगामी लोकांना आपण काय करून ठेवलेले असते याचीच कल्पना नसते 

आता मात्र धर्म आणि मोक्ष या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगळे जीवनार्थं आहेत हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे अन्यथा त्यातून जे अनर्थ निर्माण झालेत त्यांचे सातत्य टिकेल आणि हे सर्वांनाच महागात पडलेले असेल 

श्रीधर तिळवे नाईक


 यांची शोकांतिका श्रीधर तिळवे नाईक 

नरहर कुरुंदकर यांची शोकांतिका  ही त्यांच्या इस्लामविरोधातून जन्मलेली आहे वास्तविक खरा पुरोगामी आणि समाजवादी हिंदुत्व विरोधात आणि इस्लाम विरोधात सारख्याच ताकतीने लढतो कुरुंदकर हे एकटेच असे करत होते समाजवाद्यांच्या पुरोगामीवादाविषयीच्या कल्पना फार भिन्न आहेत साहजिकच त्यांनी त्यांचा इस्लाम विरोध त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी वापरला याचा एक दुष्परिणाम असा झाला की हिंदुत्ववाद्यांना नरहर कुरुंदकर स्वतःच्या इस्लामविरोधी अजेंडासाठी अत्यंत आवश्यक वाटले आणि हळूहळू आज अवस्था अशी आलेली आहे ते नरहर  कुरुंदकरांना हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्शन देणे हे खुद्द हिंदुत्ववाद्यांनाच गरजेचे वाटते कारण इस्लामच्या संदर्भातली सडेतोड टीका फक्त  कुरुंदकरांनी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची टीका केलेली आहे त्या सर्वांना बहिष्कृत करणे ही पुरोगामी वाद्यांची एक लकब होऊन बसलेली आहे आता सुद्धा कुरुंदकरांच्याबाबतीत जे काही घडते आहे ते फार काही वेगळे नाही हे होणारच होते स्वतःच्या गोट्यातला माणूस असा पारंपारिक लोकांच्या हातात सोपवणे याबद्दल खरे तर पुरोगामी  लोकांनीच पश्चाताप व्यक्त करायला हवा होता पण तो करायचा राहिला बाजूला आजही कुरुंदकर म्हटले की त्यांना हिंदुत्ववादी म्हणणारे अनेक शहाणे दीड शहाणे या समाजात अस्तित्वात आहेत इस्लाम हा एक प्रॉब्लेम आहे जसा ब्राह्मणधर्म हा एक प्रॉब्लेम आहे त्यांची सोल्युशन शोधताना एकाला एक वागणूक आणि दुसऱ्याला एक वागणूक हे चालणार नाही हा सापत्न भाव तुम्हाला मुसलमानांची वोटिंग मिळावीत म्हणून चालत असेल तर तुम्ही विचार दरिद्री आहात असेच म्हटले पाहिजे तुम्हाला जर असे वाटत असेल की हा लढा    लांबणीवर टाकता येईल तर तुम्ही मूर्खांच्या नंदवनवानात वावरत आहात कारण तुम्ही हेच पाकिस्तान मागणीबाबत केले होते आणि तुम्हाला वाटले होते की हे सर्व टाळता येईल पण प्रत्यक्षात हे टळले नाही आणि बांगलादेश आणि पाकिस्तान नावाचे दोन देश आता निर्माण झालेले आहेत आज ना उद्या इस्लामचा पुढचा लढा  तुमच्या दाराशी येणे अटळ आहे इस्लाम काही तुम्ही पुरोगामी आहात म्हणून तुम्हाला क्षमा करणार नाही ते नंतर काफीर म्हणून तुमच्याच विरोधातही  ठाकणारच आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पुरोगामी लोकांच्या हे लक्षात येत नाहीये. ज्याप्रमाणे  ब्राह्मण धर्म  आज ना उद्या  वर्ण व्यवस्था  या समाजामध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत राहील  त्याचप्रमाणे इस्लाम सुद्धा संपूर्ण जग इस्लाम बनवल्याशिवाय थांबणार नाही यात पुरोगामीही आले बहुतेक पुरोगामी विचारवंतांना असं वाटतं की ते करणाची कवच कुंडले घेऊन आलेले आहेत अशी कवच  कुंडले कुणाकडेच नाहीत बहुदा बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था  झाल्यावरच ते जागृत होणार आहेत 

आजची नरहर कुरुंदकरांची शोकांतिका ही पुरोगामी  लोकांनी त्यांना हिंदुत्ववादी ठरवल्यातून झालेली आहे त्यांच्यावर अदृश्य बहिष्कार टाकण्यात आला तो ठरवून टाकलेला नाही पण तो अदृश्य बहिष्कार सर्वांना दिसत होता आज त्याचाच फायदा कट्टर ब्राह्मण्यवादी लोकांना मिळतो आहे मताचे राजकारण फक्त हिंदुत्ववादी खेळतात आणि आम्ही खूप सज्जन आहोत असा जो  साळसूदपणा चाललेला असतो त्यात फारसे तथ्य नाही मुसलमानांचा प्रश्न आला की मतांचे राजकारणच येते समाजवाद्यांना नेहमीच निवडून येण्यासाठी मुस्लिम मते मदत करतात कारण मुस्लिमांचा हितसंबंध हिंदुत्व विरोधात आहे त्यांना सध्या त्यांच्या अजेंडासाठी समाजवादी सोयीचे आहेत दुर्दैवाने हे डाव्या लोकांना कधीही कळले नाही आणि भविष्यात कदाचित कळणारच नाही हे तेव्हा कळेल जेव्हा प्रत्यक्ष इस्लाम त्यांच्या दारात कट्टर बनून ठाकेल दुर्दैवाने तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि समाजवाद कुठल्यातरी चितेवर जळत असेल.

SHRIDHAR TILVE

 शेख हसीना आणि भारत श्रीधर तिळवे नाईक


हिंदुस्तानी मुसलमानांच्यामध्ये कायमच दोन प्रकार असतात पहिला प्रकार आंतरराष्ट्रीय मुसलमानांचा असतो तर दुसरा प्रकार देशी मुसलमानांचा असतो यातील आंतरराष्ट्रीय मुसलमान हे नेहमी आपल्या घराण्याचे मूळ भारताबाहेर असल्याचे सांगतात आणि आश्चर्यकारकरीत्या भारतीय मुसलमान त्यांना जास्त मानसन्मान देतात शेख मुजीब रहमान यांचे मूळ हे असे आंतरराष्ट्रीय होते त्यांचे घराणे मूळचे इराकचे बगदादचे! साहजिकच त्यांना मान सन्मान होता शेख हसीना यांच्या वाट्यालाही तो आला याउलट मोहम्मद अली जिना हे देशी मुसलमान होते साहजिकच त्यांची सेक्युलर बनायला चाललेली त्यांची विरासत टिकलेली दिसत नाही कारण आंतरराष्ट्रीय मुसलमानाला जो ग्लॅमरचा मुलामा असतो तो त्यांच्याजवळ नव्हता 


बांगलादेशाच्या निर्मितीत भारताचा उद्देश एकच होता तो म्हणजे पाकिस्तानमध्ये फूट पाडणे आणि दुसरा उद्देश बांगलादेशमधून होणारे मुस्लिम स्थलांतर थांबवणे किंबहुना हे स्थलांतर थांबवण्यासाठीच भारताने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. बांगलादेशमधल्या कट्टर मुसलमानांना भारताचे वर्चस्व कधीच मान्य नव्हते म्हणजे मदत घ्यायची पण ती विसरून जायची ही कृतघ्न वृत्ती ! कारण शेवटी त्यांच्या दृष्टीने ही काफिरांच्याकडून घेतलेली मदत ही लक्षात ठेवण्याची गरजच नसते बांगलादेश मधली जनता सुरुवातीला निदान कृतघ्न नव्हती आता ती तशी बनली आहे की नाही हे पुढील काळात सिद्ध होईल शेख हसीना यांना हे कृतघ्न होणे मान्य नव्हते आणि त्यांचे घराणे हे नेहमीच भारताविषयी कृतज्ञ होते पण याचा अर्थ ते हिंदूंच्या विषयी कृतज्ञ होते असा घेऊ नये त्यांच्याही राजवटीत बांगलादेश मधील हिंदूंचे धर्म परिवर्तन सुरू होते आणि त्यांनी याबाबत सोईस्कर मौन पाळले होते त्यांच्या भारत केंद्री वृत्तीमुळे शेख हसीना या भारताच्या एजंट आहेत अशा प्रकारचे आरोप त्यामुळे त्यांच्यावर झालेले दिसतात आणि आता त्या भारतातच आश्रयाला आलेले असल्याने त्यांना याबाबत अधिकच प्रश्न विचारले जातील मुळातच प्रॉब्लेम असा असतो की लोकांची भूक नेहमी वाढत असते अपेक्षा वाढत असतात त्यांची राजवट या वाढलेल्या अपेक्षांना पुरी ठरलेली नाही पण हा बांगलादेशी जनतेचा आत्मघातही होऊ शकतो कारण पुढील राजवट ही आर्थिक सुधारणांच्या बाबतीत पुढे नेणारी असेल असे नाही


भारतात मात्र नेहमीप्रमाणे पुरोगामी लोकांनी त्यांची स्वतःची फालतुगिरी सुरू केलेली आहे अनेकांना त्यांची राजवट आणि मोदींची राजवट या दोन्हीही हुकूमशाहीच्या राजवटी असल्याने हसीना यांचा जो अंजाम झाला तोच शेवट मोदींचा होईल असे काल्पनिक वाटायला लागलेले आहे वास्तविक दोन्ही राजवटीत फार मोठा फरक आहे बांगलादेशमध्ये जनतेचा असंतोष हा इस्लामिक राजवटीकडे नेण्यासाठी धडपडणारा एक फार मोठा समुदाय आहे भारतामध्ये असे काही नाही तेव्हा वडाची साल पिंपळाला लावण्यात काही अर्थ नाही उलट यामुळे मोदी यांना बळ मिळणेच होईल अर्थात नेहमीप्रमाणे पुरोगामी वाद्यांना आपण काय करतो हे कळत नाहीये


शेख हसीना यांची राजवट ही एका महिलेची दीर्घकाळ चाललेली सर्वात मोठी राजवट होती त्यांची लोकशाही ही कितपत खरी होते हा प्रश्न कायमच विचारला जाईल कारण विरोधकांनी त्यांनी ज्या पद्धतीने वागवले ती पद्धत हुकूमशाही पद्धतीला जवळ जाणारी होती साहजिकच विरोधकांनी राळ उडवणे स्वाभाविक होते अर्थात विरोधक जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी फार काही वेगळे केले नव्हते त्यांनी हसीना यांची कोंडी करण्याचे सर्व उपाय केले होते त्यामुळे दोघेही नर्मदेतले गोटेच आहेत डावा उजवा करणे अवघड आहे याबाबतीत मग भारताच्या बाजूने कोण एवढाच प्रश्न उरतो शेख हसीना कश्याही असल्या तरी त्या भारताच्या बाजूने होत्या हे स्पष्ट आहे बांगलादेशात सत्तेवर येऊ घातलेले लोक जर इस्लामवादी असतील तर इस्लामिक राजवट येणे अटळ आहे आणि भारताला या गोष्टी तापदायक होणे ही अटळ आहे दुर्दैवाने पुरोगामी लोकांना हे कळत नाही उद्या पुरोगामी सत्तेवर आले तर ते काय करणार आहेत इस्लामिक राजवटीला साथ देणार आहेत? प्रतिक्रिया देताना काही काळ वाट पाहणे गरजेचे होते विशेषता तिथे सत्तेवर कोण येतय याविषयी निदान वाट पाहणे अपेक्षित आहे पण एकंदरच मोदींना टीकेच्या केंद्रस्थानी कसे आणता येईल एवढ्या संकुचित दृष्टीने पाहणाऱ्या अतिशहाणपणाला काय कळणार? असो जोपर्यंत बांगलादेशमध्ये सत्तेवर कोण येणार आणि त्याचे भारताविषयीचे धोरण काय असणार हे कळत नाही तोपर्यंत यावर अंतिम भाष्य करणे चुकीचे होईल 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

मोक्ष LOVE