चर्चने बायबल किंवा ब्राह्मण धर्माने वेद सामान्य माणसांच्या पासून का लपवून ठेवले श्रीधर तिळवे नाईक 


युरोपियन धर्मशास्त्राचा उत्तर आधुनिक इतिहास लिहिताना अलीकडच्या काळात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय तो म्हणजे चर्चने सामान्य माणसांच्या पासून बायबल का लपवून ठेवले? याच पार्श्वभूमीवर आपण असा प्रश्न विचारू शकतो की युरेशियन वेद सामान्य माणसांच्या पासून का लपवले गेले आणि शैव वेद म्हणजे आयुर्वेद ज्योतिष वेद शस्त्र वेद वैगरे सामान्य माणसांना का उपलब्ध करून दिले गेले होते किंवा पवित्र कुराण सारखा धर्मग्रंथ का सामान्य माणसांना सुद्धा उपलब्ध झाला?


युरोपमध्येच मुळात या संदर्भातच एक वाद असा आहे की चर्चने ते खरोखरच लपवले का? ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये वेद लपवले गेले त्याप्रमाणे हे बायबल लपवले गेले होते का ? असा प्रश्न आपल्याकडे भारताचा संदर्भात निर्माण होत नाही कारण या संदर्भातली स्पष्ट आणि स्वच्छ डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत आणि वेद हे ब्राह्मणे तरांच्यासाठी नाहीत ही घोषणा अनेकदा आपल्या इतिहासात १९ व्यां शतकात ही प्रकट झालेली आहे


मग हा प्रश्न भारतासंदर्भात वेगळा निर्माण होतो तो म्हणजे भारतातील चर्च लॅटिन मधील बायबल का फॉलो करत होते त्याचा मल्याळम मध्ये किंवा गोवन कोकणी मध्ये जिथे ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणात होता अनुवाद व्हायला भारतामध्ये इतका उशीर का झाला दुर्दैवाने आपल्याकडे भारतीय चर्चवादाला प्रश्नच विचारले जात नाहीत फक्त ब्राह्मणांना प्रश्न विचारले जातात माझ्या मते हे होता कामा नये कारण सर्वच धर्मातल्या पुरोहितांना आपण सतत प्रश्न विचारले पाहिजेत 


बायबलचा इतिहास हा आपल्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे कारण आपल्याकडेसुद्धा वेदांच्या बाबतीत हीच स्थिती झालेली दिसते आणि तुलनात्मक अभ्यासासाठी या दोन केसेस खूप इंटरेस्टिंग आहेत 


या दोन्ही धर्मग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीही सामान्य माणसाला अनाकलनीय असणाऱ्या भाषेत लिहिले गेलेले आहेत वेद हे संस्कृत भाषेत लिहिले गेले तर बायबल लॅटिन भाषेत लिहिले गेले प्रत्यक्षामध्ये दोन्ही धर्मग्रंथ एका मूळ ओरिजनल भाषेत लिहिले गेले होते आणि जीजस लॅटिन भाषेत बोलत नव्हता हे आता सिद्ध झाले आहे त्याचप्रमाणे वेदांमधले ऋषी कुठली तरी आधीची आर्यभाषा किंवा आर्षभाषा वापरत होते इथून दोन्ही धर्मातले हे साम्य सुरू होते याचा अर्थ हे धर्मग्रंथ मूळ धर्मग्रंथ नसून ते धर्मग्रंथाचा अनुवाद आहेत किमान पक्षी त्यामधला जो उपदेश आहे तो या मूळ भाषांच्या मध्ये दिला गेला नव्हता इतके निश्चित आहे विशेषतः जीजस बाबत हे आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे की जीजस ची भाषा लॅटिन नव्हती आता जो धर्मग्रंथ मुळात स्वतःच भाषांतरित धर्मग्रंथ आहे तो स्वतःच्या भाषांतरित झालेल्या भाषेला पवित्र मानून भाषांतर करायला का नकार दिला जात होता. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की युरोपमध्ये ज्या लोकांनी भाषांतर केले त्यांना देहांताची शिक्षा मिळालेली आहे आपल्याकडे जी गोष्ट ज्ञानेश्वरांच्या बाबतीत झालेली आहे असे मानले जाते तीच गोष्ट तिकडे अनुवाद करणाऱ्या लोकांच्या बाबतीत झालेली आहे याचा अर्थ युरेशियन श्रुती आणि युरोपियन श्रुती दोन्हीही स्वतःच्या धर्मग्रंथांच्या अनुवादाबाबत एकाच माळेच्या मणी आहेत आणि त्यातूनच

भाषांतरासाठी असा कट्टर नकार का हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच मी विचारलेला प्रश्न निर्माण होतो की सामान्य माणसांच्यापासून बायबल किंवा वेद का लपवले गेले?(अलीकडेच उत्तर भारतात रामायण वाचण्याची परमिशन नाकारण्यात आली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे आणि हा अलीकडचा इन्सिडेंट आहे हे लक्षात घ्या)


या नकारा संदर्भात माझे स्वतःचे यासंदर्भातले उत्तर आहे ते म्हणजे मांत्रिकी! माणूस जेव्हा जमाती अवस्थेत होता तेव्हा श्रद्धा निर्माण झाली आणि त्या श्रद्धेबरोबर निर्माण झाली मांत्रिकी जिचा मंत्रांच्यावर विश्वास होता . वेद हे दुसरे तिसरे काही नसून मंत्र आहेत हे सर्वांना मान्य आहे आजही आपण गायत्री मंत्राचा उल्लेख मंत्र असाच करत असतो हे लक्षात घेण्याजोगे आहे प्रश्न असा होता की या मंत्रांची मालकी कुणाकडे गेली आणि का गेली? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की या मंत्रांची मालकी युरेशीयन लोकांच्यात सुरुवातीला सर्वांच्याकडे होती परंतु हळूहळू ब्राह्मणांनी हे सर्व मंत्र आपल्या ताब्यात घेतले ते पाठ केले आणि नंतर ते आपल्याकडेच ठेवून घेतले वास्तविक सर्व ऋषीचे सुरुवातीचे शिष्य हे ब्राह्मण नव्हते तर ते सर्व वर्गातून आलेले होते प्रश्न असा आहे की ही सर्व वर्गातून आलेल्या या लोकांचा पुढे ब्राह्मण वर्ग आणि नंतर ब्राह्मण धर्म कसा बनला उदाहरणार्थ ऐतरेय ब्राह्मण लिहिणारा जो लेखक आहे तो ब्राह्मण नव्हता असा उल्लेख आहे याचाच अर्थ सुरुवातीला ब्राह्मण हा वर्ग पुरोहितांचा वर्ग म्हणून जन्मला आणि हळूहळू तो मांत्रिकी ताब्यात घेणारा आणि मांत्रिकी म्हणणारा त्यांचे जतन करणारा वर्ण म्हणून कन्वर्ट झाला किंवा तयार झाला साहजिकच या ब्राह्मण वर्णांमध्ये आधीचे वेगवेगळ्या समुदायातले वर्गातले लोक असावेत आणि नंतर हे मांत्रिकेमध्ये स्वतःची हितसंबंध गुंतल्यामुळे एकत्र हितसंबंधांसाठी झालेले असावेत आणि हे हितसंबंध आर्थिक होते असे आता दिसते यज्ञ करणाऱ्या लोकांना मुबलक पैसा मिळत होता आणि हा पैसा सोडण्याची यांच्यापैकी बहुदा कोणाचीच तयारी नव्हती आणि बहुदा हा व्यवसाय पिढीजात राहावा म्हणून या लोकांनी आपल्या स्वतःच्या वर्गाचे रूपांतर स्वतः वर्णात केले 


म्हणजेच ब्राह्मण वर्ण म्हणजे वेगवेगळ्या वर्गातून वेगवेगळ्या समूहातून आलेल्या लोकांनी स्वतःची मांत्रिकीस जतन करण्यासाठी तिच्यावर कॉपीराईट जतन करण्यासाठी आणि तो हक्क पिढी जात पणे चालत राहावा म्हणून निर्माण केलेला वर्ण होय असे आता म्हणता येते म्हणजेच एका अर्थाने मांत्रिकी हीच वर्णव्यवस्था निर्माण करायला कारणीभूत झालेली आहे मूळ वैदिक ऋचा पाहिल्या तर त्यात शासक समुदाय सुद्धा होता आणि काही ऋषी उदाहरणार्थ विश्वामित्र शासक समूहातून आलेले होते. साहजिकच वेद सर्वांनाच खुले होते पण हळूहळू प्रत्येक मांत्रिकी मध्ये जे घडते तेच इथे घडलेले आहे म्हणजे प्रत्येक मांत्रिकी मध्ये एक गट असा निर्माण होतो जो स्वतःकडे त्या मंत्रांचे कॉपीराईट घेतो आणि इतरांना द्यायला नकार देतो वेदांच्या बाबतीत जे झाले तेच आपणाला बायबलबाबत झालेले दिसते भुतांना पळवून लावण्यासाठी बायबल मधले मंत्र म्हटले जातात आणि आज सुद्धा तुम्ही कुठलाही हॉलीवुड मधला चित्रपट काढून बघितला तर तुम्हाला त्यामध्ये हे करताना अनेक ख्रिश्चन पादरी दिसतात याचे कारण असे आहे की हळूहळू बायबल हे मंत्र बनत गेले या बायबलला जोडून काही मंत्र आणि प्रार्थना आल्या आणि साहजिकच एखादी गोष्ट एकदा मांत्रिकीचे पुस्तक बनले की मग ते कोणालाही इतरांना द्यायचे नाही असा एक भाव निर्माण होऊ लागतो खुद्द अनार्य लोकांचा इतिहास सुद्धा याला अपवाद नाही तिथे सुद्धा भगत नावाच्या एक वर्ग निर्माण झाला होता ज्याने अनार्य लोकांच्यातली सर्व मांत्रिकी आपल्या ताब्यात घेतली आणि आपला कॉपीराईट त्यांच्यावर नोंदवला ही भगत ही संस्था अनार्य लोकांच्यातली पुरोहित संस्था होती आणि भगवान शंकरांना तिच्या विरोधात बंड केले आणि त्या मांत्रिकीला शह देण्यासाठी मोक्ष मिळवणारी तंत्रे आणि तांत्रिकी आणली म्हणजेच मांत्रिकीला शह देण्यासाठी तांत्रिकी आलेली आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे जी मोक्षाकडे नेणारी होती आज सुद्धा भगत आपल्या मंत्रांना मंत्रच म्हणतात तंत्र म्हणत नाहीत त्यांना नंतर जबरदस्तीने तंत्र म्हणवून घ्यावे लागले कारण वैदिक लोकांशी मांत्रिकीबाबत स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच तंत्र बदनाम होत गेले कारण आपण जी करतो ती तांत्रिकी नसून मांत्रिकी आहे हे दाखवणे युरेशियन ब्राह्मण लोकांना आवश्यक वाटायला लागले साहजिकच त्यांना भगत लोकांची मांत्रिकी तांत्रिकी म्हणून बदनाम झालेलीच हवी होती पण दुर्दैवाने त्यातून हळूहळू उत्पन्न निर्माण होते हे लक्षात आले आणि मग ब्राह्मण सुद्धा भगतांच्या मांत्रिकीला आत्मसात करत स्वतःला तांत्रिक म्हणवून घेऊ लागले परंतु प्रत्यक्ष समाजात मात्र भगत लोकांना जे काही सुचत होते त्याला मंत्रच म्हटले गेले किंबहुना मंत्र हा शब्द अनार्य आहे की आर्य आहे हे ठरवणे अवघड आहे आजही शैव असलेल्या अनेक जमातीमध्ये आणि जातींच्यामध्ये भगताचे प्रभुत्व कमी झालेले नाही आणि ते मोडून काढणे हे एक कामच आहे याबाबतीत अनेकदा बहुजन समाज फक्त ब्राह्मणांना शिव्या देतो ते बरोबर नाही आपल्यामध्ये काय आहे तेही नीट बघितले पाहिजे. स्वतःत सुधारणा करायच्या नाहीत आणि इतरांना टीकेच्या क्षेत्रात आणायचे हे बरोबर नव्हे टीका दोन्ही धर्मातल्या दोन्ही मांत्रिकींच्यावर व दोन्ही क्षेत्रांच्यावर हवी दोन्ही बाजूंनी हवी आपल्यातही ती गोष्ट आहे की नाही हे तपासायला हवे आणि तपासावे लागते त्यासाठी मुळात आपल्यामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत हे आपण स्वीकारायला हवे 


ब्राह्मण धर्माने जेव्हा पुन्हा एकदा मांत्रिकी सत्तेवर आणली इतकेच नव्हे तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून स्वतःचा ब्राह्मण दरम निर्माण केला तेव्हा मांत्रिकीच्या या प्रभुत्वाचा कळस झाला साहजिकच त्याविरुद्ध बंड होणे अटळ होते नकुलिश, कपिल, गौतम बुद्ध, भगवान महावीर या लोकांनी बंड केल्यानंतर साहजिकच अनार्य लोकांच्यातील भगत आणि आर्य लोकांच्यातील ब्राह्मण यांचा धंदा बसला आणि त्यावरून काय करायला हवे हा वणवा पेटला यातूनच जे भगत होते त्यांनी सुरुवातीला ब्राह्मण म्हणून ब्राह्मण धर्मात प्रवेश घेतला हे आपण लक्षात घेतले पाहिजे अर्थातच सर्व भगत किंवा ब्राह्मण असे राहिले नाहीत अनेकांनी शैव धर्म स्वीकारला आणि मोक्षाची साधना सुद्धा केली अनेक भगत हे त्यांची आडनावे भगत असली तरी प्रत्यक्षामध्ये भगत राहिले नाहीत ते यथास्थितीत साधक बनले कालांतराने यातील काही जणांच्या पिढ्या या ब्राह्मण सुद्धा बनलेल्या दिसतात मी म्हटल्याप्रमाणे भगतांच्यापासून काही पंडित झाले आणि पंडितांच्या पासून काही ब्राह्मण झाले तर काही ब्राह्मण पंडित झाले त्याने शिव हे दैवत स्वीकारले शक्ती हे दैवत स्वीकारले म्हणजेच मांत्रिकीमुळे धर्मांतर दोन्ही बाजूने झालेले दिसते या भगत लोकांनीच वैदिक श्रुतीमध्ये आपला भागवत धर्म न्हेला अन्यथा बाहेरून आलेल्या युरेशियन लोकांच्या मध्ये भक्तीचे स्वरूप हे पूर्णपणे वेगळे होते आणि ते रोमन कॅथोलिक धर्माशी जास्त जुळणारे होते आणि आपण जर का वैदिक ऋचा वाचल्या तर त्यावरून त्याचे स्वरूप स्पष्ट होते ही भक्ती काहीशी यज्ञ केंद्रित विधीशी निगडित होती ती पूजा नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे नंतर अवस्था अशी आली की यज्ञ संस्कृती जवळ जवळ लोप पावली अनार्य लोकांची पूजा संस्कृती जवळजवळ सर्वच ब्राह्मणांनी स्वीकारली पण दुर्दैवाने त्यांनी मांत्रिकीवरचे आपले अधिकार मात्र शेवटपर्यंत सोडले नाहीत आणि त्यातूनच नंतरच्या अनेक समस्या निर्माण झाल्या कुठे ना कुठे आज सुद्धा हा आपला उपजीविकेचा राखीव धंदा आहे असे आजही ब्राह्मण वर्णाला वाटते त्यामुळेच मांत्रिकी सोडायला ब्राह्मण वर्ण आजही सहजासहजी तयार होत नाही


थोडक्यात सांगायचे तर मांत्रकीवर आपलाच कॉपीराईट राहावा तो इतरांच्या ताब्यात जाऊ नये म्हणूनच वेद असो किंवा बायबल असो लपवले गेले यातला जबाबदार दोन गोष्टी होत्या पहिली मांत्रिकीमुळे धर्मसत्ता मिळणे आणि आणि ती धर्मसत्ता स्वतःकडे शाबूत ठेवणे तिच्यावर नियंत्रण ठेवणे आणि दुसरी यातून मिळणारे उत्पन्न प्रचंड होते आणि अनेक राजे लोक सुद्धा मांत्रिकीवर विश्वास ठेवत असल्याने त्यांच्याकडून मिळणाऱ्या भेटी या अत्यंत अनमोल भेटी असत याबाबतीत ख्रिश्चन रेकॉर्ड जर बघितली तर आपण अचंबित होतो आणि मग ख्रिश्चन धर्म हा जगातला सर्वात श्रीमंत धर्म का आहे ते आपणाला कळून चुकते स्वतःच्या इन्कम चा हा रिसोर्स कोण गमावणार ? साहजिकच हे धर्मग्रंथ लपवले गेले बायबल लपवले गेले पुढे मग पुरोगामी वाद आल्यानंतर त्याने प्रिंटिंग मध्ये बायबल आणले आणि तिथूनच प्रोटेस्टंट धर्माची पार्श्वभूमी तयार व्हायला सुरुवात झाली यानंतर मांत्रिकी हळूहळू मागे जाईल असे वाटले होते परंतु खुद्द युरोपमध्ये सुद्धा असे काही घडले आहे असे वाटत नाही शेवटी मांत्रिकतेला शह म्हणून नास्तिकता स्वीकारली गेली आणि आता ती प्रचंड वाढलेली दिसते मुख्य म्हणजे उत्तर आधुनिक कालखंडामध्ये बायबलचा खरा इतिहास पुढे यायला लागला आणि यातून आलेल्या काही गोष्टी अतिशय चमत्कारिक होता उदाहरणार्थ जीजस हा आफ्रिकन होता किंवा ब्लॅक होता अशा प्रकारची पुढे आलेली मांडणी किंवा जीजस ला एक पत्नी होती अशी आलेली मांडणी एकंदरच बायबल हे दंतकथेचे आगार आहे असे मानणारे लोकही पुढे आले आणि त्यातूनच बायबल सामान्य माणसांच्या पासून का लपवले गेले हा कळीचा प्रश्न सतत निर्माण करण्यात आला आपल्याकडे त्याचे रूपांतर वेद सामान्य माणसांच्या पासून का लपवण्यात आले असे झाले ज्याचे उत्तर मी वर दिले आहे


ह्या पुढचा उत्तर आधुनिक प्रश्न असा आहे की इतिहासामध्ये या मांत्रिकीने नेमके केले काय ? हळू हळू कुठल्याही समाजामध्ये जेव्हा आर्थिक आणि राजकीय अध:पतन सुरू होते तेव्हा समाजामध्ये मांत्रिकी वाढत जाते साहजिकच ते करणारे लोक पुन्हा मोठे होत जातात भारताच्या इतिहासामध्ये मांत्रिकी लोकांची मंत्रक्रांती ही कायमच घडत आलेली गोष्ट आहे जी प्रस्थापित झालेल्या नवतेला चॅलेंज देते आणि पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून आणते परंपरा परतते आणि लोक सुद्धा पुन्हा परंपरेत परततात उत्तर आधुनिकतेच्या इतिहासात उत्तर आधुनिकतेने नेमके हेच घडवलेले आहे आणि आपण समजतो तसे त्यामध्ये फक्त आर्यलोक नाही तर अनार्य लोक सुद्धा आहेत हे आता स्पष्ट होते आहे याचा एक परिणाम असा होतो की ब्राह्मणेतर लोक हिंदुत्ववादाचा डिस्कोर्स स्वीकारायला लागतात कारण त्यांना सुद्धा आपल्या मांत्रिकी मध्ये परतावे असे वाटते मंत्र क्रांतीमध्ये ब्राह्मण आणि भगत असे दोन्ही समुदाय कर्मठ बनून ऍक्टिव्ह असतात तेव्हाच मंत्रक्रांती यशस्वी होते चीन आणि जापान सारख्या देशांमध्येसुद्धा खुद्द बौद्ध धर्मात सुद्धा ही मांत्रिकी घुसलेली दिसते आणि तिच्या विरोधात चीनमध्ये छान आणि जापान मध्ये झेन आंदोलन पण झालेले दिसते याचे कारण उघड आहे कारण अनेकदा मूळ धर्मग्रंथाची मालकी मांत्रिकी सोडत नाही आणि मग करायचे काय असा प्रश्न सिद्ध लोकांच्या पुढे आणि बुद्ध लोकांच्या पुढे ठाकतो साहजिकच त्यांना या मांत्रिकी विरोधात उभे राहावे लागते मंत्रांच्यात ताकद असते की नाही हा आज सुद्धा भारतामध्ये डिबेटचा विषय आहे कारण हा डिबेट सनातन आहे आणि तो फक्त भारतात आहे असा कोणी गैरसमज करून घेऊ नये अगदी इस्लाम सारख्या अत्यंत कठोर धर्मात सुद्धा या मांत्रिकीने प्रवेश केलेला दिसतो आणि त्याला तावीजी असे म्हटले जाते इस्लामचे सुदैव असे आहे की तिथे कधीही धर्मग्रंथ लपवला गेला नाही किंबहुना इस्लामचा प्रचार आणि प्रसार होण्यामध्ये कुराण या धर्मग्रंथांचे असे खुले असणे ही एक फार मोठी अचीवमेंट होती इस्लाम मध्ये कधीही कुराण या धर्मग्रंथाचा अनुवाद झाला म्हणून त्या अनुवादकाराची हत्या केली गेलेली नाही उलट अनेकदा त्याला प्रोत्साहन दिले गेलेले आहे हे जरा इस्लामच्या विरोधकांनी लक्षात ठेवावे इस्लामच्या अनेक गोष्टी चांगल्या असतात त्यापैकी ही एक गोष्ट आहे अर्थातच तरीही जो हिंदूंचा प्रॉब्लेम आहे तोच मुस्लिम लोकांचा आहे म्हणजे संस्कृत मध्ये मंत्र म्हटले की कसे इमोशनल आणि आपण काहीतरी अतीत व दैवी गोष्टीशी जोडले जात असल्याचा फिलिंग हिंदूंना येतो तसाच फिलिंग अरेबिकमध्ये काही म्हटले गेले की मुसलमानांना येतो कारण शेवटी दोघेही भारतीय असतात आपल्याला न कळणाऱ्या भाषेत कोणी काही म्हटले की लोकांना मजा येते आणि ही टिपिकल भारतीय मानसिकता आहे मी स्वतः आचार्य म्हणून भक्ती उपायाच्या संदर्भात साधकाला आवश्यक वाटली तर काही ड्युटीची कामे करतो उदा साधनेची सुरुवात म्हणून इष्टदेवतेची प्राणप्रतिष्ठा करणे तेव्हा एक अट घालत असतो ती म्हणजे मी शैव देवतांची प्राणप्रतिष्ठा करेन पण मंत्र मराठीत किंवा हिंदीत किंवा इंग्लिश मध्ये म्हणेन मराठीत किंवा हिंदीत किंवा इंग्लिश मध्ये अर्थ समजावून सांगेन तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे पण लोक हे स्वीकारतात का? अलीकडे तर अवस्था अशी आहे की अनेकांना सिद्ध लोकांनी सांगितलेल्या नेमक्या शैव पूजा मूळ स्वरूपात काय आहेत तेही आठवत नाही त्यामुळे अनेकदा हे विधी कसे केले जातात तेच माहीत नाही त्यामुळे झक मारत मला हे काम करावेच लागते यासंदर्भामध्ये सर्व शैव पूरोहितांना तुम्ही मार्गदर्शन करा अशी विनंती मला सतत येत असते आणि कधीतरी या संदर्भात एक शिबिर घ्या असे सांगितले जाते मला अजून तरी ते जमलेले नाही किंबहुना ते केल्यानंतर मोक्ष वाढण्याऐवजी मांत्रिकीच वाढण्याची शक्यता मला जास्त दिसते त्यामुळे ते करावेसे वाटत नाही पण आपण ते न केल्याने लोक थांबत नाहीत आणि मग दुसऱ्याच प्रकारची मांत्रिकी तिथे येते जी अत्यंत निर्बुद्ध असते असा माझा अनुभव आहे त्यामुळेच जी स्थिती आहे ते बघता कधीतरी हे करावे लागेल असे दिसते आता जर माझी ही अवस्था असेल तर जे लोक ऑलरेडी मांत्रिकीमध्ये आहेत ते काय विचार करत असणार हे स्पष्ट आहे


एक युक्तीवाद नेहमीच माझ्या बाबतीत माझ्या बाजूने येतो तो म्हणजे या निमित्ताने शैव असणे म्हणजे काय आहे हे समजावता येते ज्याप्रमाणे चर्च किंवा मशिदीमध्ये डिस्कोर्सेस देता येतात तसे आपल्याकडे मंदिरांच्या मध्ये दिले जात नाहीत आपल्याकडे येतात ती पारंपारिक प्रवचने किंवा कीर्तने ज्यात जास्तीत जास्त मांत्रिकीचे समर्थन केले जाते आणि मोक्षाबाबत मनोरंजनवादी दृष्टिकोन असतो त्यामुळे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे विशेषता संघटनाच्या पातळीवर तो निर्माण होत असतो हवेत असणाऱ्या लोकांना मुद्दा समजत नाही परंतु जे संघटनेत आहेत त्यांना ते नीट कळत असतं लोकांच्या पर्यंत कसे पोहोचायचे हा याबाबतीतला खरा प्रश्न असतो

यानिमित्ताने विज्ञान सांगता येते आणि वर्ण आणि जाती व्यवस्था विरोधात बोलता येते ज्याचा मी नक्कीच विचार करतो आहे मात्र मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश असे म्हटले कि आश्चर्यकारकरीत्या अनेकांना ही अट झेपत नाही ते तुम्ही संस्कृतमध्ये मंत्र म्हणाल तर आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ अशी ऑफर देतात ही भारतीयांची एकविसाव्या शतकातील स्थिती आहे याचा अर्थच कळत नकळतपणे सर्वसामान्य मनुष्य सुद्धा या मांत्रिकीला मदतच करत असतो त्यालासुद्धा पटत नाही की देवाला कुठलीही भाषा गैर नाही त्याला मराठी हिंदी आणि इंग्लिश सुद्धा येते शेवटी तो देव आहे तर त्याला प्रत्येक भाषा प्रियच असणार पण हे तर्कशास्त्र स्वीकारले जात नाही आणि लॅटिन किंवा संस्कृत किंवा अरेबिक याच भाषा लोकांना आवडतात याबाबत संत एकनाथांनी जो प्रश्न विचारला होता तो असा की संस्कृत देवाने बनवली तर मराठी का चोरांनी बनवली हा अत्यंत वाजवी प्रश्न आहे परंतु हा प्रश्नच मांत्रिकीला आजही शत्रू वाटतो त्यातच अलीकडे आपल्या सिरीयल आणि चित्रपटांनी देव संस्कृत मध्येच बोलत होते अशी एक धारणा तयार केलेली आहे आणि विरोधाभास असा आहे की प्रत्यक्ष पडद्यावर देव प्राकृत भाषेत आणि देशी भाषेत बोलत असतात त्याशिवाय चित्रपट किंवा सिरीयल हिट होऊ शकत नाही म्हणजे आपले संवाद लोकांना कळावे म्हणून प्राकृत किंवा देशी किंवा अपवादात्मक वेळेला पोटी भाषेत संवाद म्हणायला हवेत तरच ते लोकांना कळेल व टी आर पी वाढेल असे वाटते आणि दुसरीकडे संस्कृत किंवा लॅटिन किंवा अरेबिक असेच मांत्रिकी मध्ये चालले पाहिजे असा आग्रहही असतो हा एक विलक्षण विरोधाभास आहे


म्हणजेच आज सुद्धा जर काय आपण मांत्रिकीचा विचार केला तर असे दिसते की लोकांना मांत्रिकीवर विश्वास ठेवायचा आहे किमान पक्षी त्यातल्या अंधश्रद्धा काढून प्राणप्रतिष्ठासारखे विधी करायचे असतील किंवा लग्न जन्म आणि मरण विधी करायचे असतील तर लोकांना आजही मांत्रिकी आवश्यक वाटते याबाबतीत पुरोगामी लोकांना किंवा आधुनिक लोकांना काय वाटते याच्याशी लोकांना काहीही देणे घेणे नाही एका अर्थाने त्यामुळेच उत्तर आधुनिक लोकांनी या सगळ्याला मान्यता देऊन टाकली आणि परंपरेचा भाग म्हणून हे स्वीकारण्यात आले. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांच्या पुढें अचानक प्रश्न निर्माण झाले प्रथम बंड करून झाले परंतु लोक यासंदर्भात बदलत नाहीत असे लक्षात आल्यावर जे आहे ते वापरत नवता कशी पोहोचवता येईल हे पाहणे आले अगदी हॉलीवुडच्या चित्रपटात सुद्धा आपणाला असे दिसते की हे लग्न मरण वगैरे विधी होत असताना मांत्रिकी येतेच शैव लोकांच्यात तर कुलदेवतेनुसार मांत्रिकी बदलत असते आणि माझा अनुभव असा आहे की ब्राह्मण लोकांना तिच्या विषयी कसलीही कल्पना नाहीये. ते उगाचच पुराणोक्त मंत्राच्या आधारे काहीतरी करत असतात मूळ मंत्र हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि ते कुठल्याही पुराणात उपलब्ध नाहीत फक्त त्या त्या आचार्याकडे परंपरेने ते आले असतील तरच अन्यथा याबाबतीत एक प्रकारचा शुकशुकाट पसरलेला आहे याबाबतीत युरेशियन धर्माचे लोक काहीसे भाग्यवान आहेत कारण त्यांचे सर्व मंत्रविधी हे व्यवस्थित पुराणांच्या मधून जपले गेलेले आहेत आणि ब्राह्मण वैदिक मंत्र तर स्वतःसाठी वापरतातच ब्राह्मणेतरांच्यासाठी मात्र त्यांनी आज सुद्धा मुख्यतः शूद्रांच्या साठी लिहिलेले पुराणोक्त मंत्रच ठेवलेले आहेत अलीकडे भाजपाला आपल्या चुका लक्षात आलेल्या आहेत आणि भाजप मधले काही ब्राह्मण अलीकडे ब्राह्मणेतरांच्यासाठी सुद्धा वेदोक्त मंत्र म्हणायला लागलेले आहेत मात्र हे खूप अल्पसंख्यांक आहेत हेही खरे आहे 


प्रश्न असा आहे की इतक्या सगळ्या युगामधून मांत्रिकी पास होत गेली तरीसुद्धा हा लपवण्याचा अट्टाहास का आहे त्याचे कारण उघड आहे मक्तेदारी ! ही मक्तेदारी सोडायची नाहीये म्हणूनच सर्व पुरोहित लोक ती जास्तीत जास्त आपल्या ताब्यात ठेवतात याला अपवाद फक्त ख्रिश्चन आहेत आणि शैव व मुस्लिम तर याला सुरुवातीपासूनच अपवाद आहेत जी सुधारणा या धर्मांच्यात झाली ती भारतीय धर्मांच्यातसुद्धा होणे अत्यंत आवश्यक आहे आजसुद्धा तुम्ही जर मुस्लिम असाल तर तुम्ही कुठून आलात हे विचारले जात नाही तुम्ही कुराण आणि अरेबिक भाषा शिकू शकता भारतीय धर्मांच्या मध्ये हे होणे अत्यंत आवश्यक आहे


काही लोक म्हणतील की मांत्रिकीला थेट विरोध तू का करत नाही तर याचे उत्तर असे की मी हे करून दमलो आहे लोक काही झाले तरी जन्म लग्न आणि मरण या तीन विधींच्या संदर्भात मांत्रिकी पुन्हा पुन्हा आणणार असेच मला आता वाटत आहे खरे तर या सर्व गोष्टी बदलायला हव्यात हे मला पटते परंतु याला जो पर्याय आपण देतो तो लोक स्वीकारत नाहीयेत यासाठी समाजामध्ये नास्तिकता वाढणे अत्यंत आवश्यक आहे पण भारतामध्ये अजूनही 99% लोक आस्तिक आहेत अशावेळी या मांत्रिकीलाच वापरत आपण जर का त्यांना खरा मोक्ष काय आहे हे सांगितले तर ते अधिक उपयुक्त ठरते हा माझा अनुभव आहे शिवाय या संदर्भामध्ये डेव्हलप झालेली अत्याधुनिक उत्तराधुनिक तंत्रे वापरून पाहणे ही गरजेचे असते म्हणजे अनेकदा या गोष्टी थेरेपी म्हणून काम करतात का हा उत्तर आधुनिकतेने निर्माण केलेला सर्वात मोठा प्रश्न आहे त्या वगळल्या तर त्यांचा माणसांच्या वर नेमका काय परिणाम होतो याचेही आकलन आणि अभ्यास सुरू आहे काही गोष्टी वाट पाहायला लावणार हे उघड आहे यावर सतत प्रयोग करणे आवश्यक आहे कारण नास्तिक झाला की अर्थव्यवस्था विकसित होते हे गृहीतक इंग्लंडमध्ये कोसळलेले आहे उलट श्रद्धा पूर्णपणे गायब झाली तर नेमके काय होते अराजक पसरते का वगैरे अनेक प्रश्न आजच्या काळात निर्माण झालेले आहेत गोष्टी गुंतागुंतीच्या असतात त्यांचे सपाटीकरण करून चालत नाही विशेषतः मरण विधी हे दुःख कमी करतात का असा एक फार मोठा संशोधनाचा प्रकल्प सध्या चालू आहे मला वाटते की आपण आणखी काही काळ यासंदर्भात वाट बघावी 


एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे स्वातंत्र्य बंधुता आणि समता यांना सर्व धर्मांनी विशेषता भारतीय धर्मांनी आता वाव द्यायला हवा त्यासाठी किमान जन्म लग्न आणि मरण या तीन विधींच्या मध्ये संपूर्ण स्वातंत्र्य , समता आणि बंधुता आणता येऊ शकते या तत्त्वांचा ग म भ न तिथे होऊ शकतो मांत्रिकीचा निदान एवढा तरी सदुपयोग करायला हरकत नाही


श्रीधर तिळवे नाईक


आज संविधान दिन ! भारतीय पुरोगामीवादाचा त्यातील सुधारणावादी व रोमँटिक अशा दोन नवंतांनी उभ्या केलेल्या राजकीय आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यलढयांनी परंपरावादी शोषणग्रस्त व्यवस्थेवर मिळवलेल्या विजयाला अधिकृत कायदेशीर संहिता दिल्याचा हा दिवस ! भारतीय पुरोगामीवादाचे ज्यांना सर्वोच्च शिखर म्हणता येईल अशा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिले 

ह्या संविधानाने पुरोगामीवादाच्या पायाभूत अशा दोन गोष्टी अधोरेखित केल्या पहिली सांसदीय लोकशाही ही राजकीय व्यवस्था व स्वातंत्र्य समता बंधुता ह्या तत्वांना बांधणारी मानणारी सामाजिक व्यवस्था व ही समता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केली गेली आरक्षणव्यवस्था ! पुढे इंदिरा गांधींच्या काळात समाजवाद हीही आर्थिक व्यवस्था म्हणून स्वीकारली गेली प्रत्यक्षात मूळ अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती पण ती अंतिम म्हणून स्वीकारली गेली नाही १९६० सालानंतर जी साठोत्तरी समाजवादी पिढी उदयाला आली तिने भारतीय संविधानाला समाजवाद स्वीकारायला लावला 

आज आपण असं म्हणू शकतो कि १९७७ पर्यंत संविधानवाद हाच आता परंपरा म्हणून प्रस्थापितता म्हणून प्रस्थापित झाला 

ह्या संविधानाविरुद्ध दोन शक्ती ठाकल्या 

१ हिंदुत्ववाद : ह्याने कधीही भारतीय संविधान स्वीकारले नाही पण पर्याय म्हणूनही काही नवे सुचवले नाही हे एका अर्थाने प्रतिगामी लोकांचे प्रतिगामी विरोध होते 

२ ओशोंवाद : ओशो रजनीश हे मात्र ठामपणे संविधानातल्या अनेक गोष्टींविरुद्ध उभे ठाकले गांधीवाद व समाजवाद हा संविधानाचा कणा होता ओशोंनी त्यांच्यावर प्रचंड हल्ले केले हे पुरोगामीविरुद्ध उत्तराधुनिक बंड होते वास्तविक हिंदुत्ववाद्यांनी ओशोंना डोक्यावर घ्यायला हवे होते कारण हिंदुत्ववाद्यांना आवडणाऱ्या सर्व परंपरांचे ते पुनर्जीवन करत होते आणि हिंदुत्ववाद्यांचा आर्यवाद त्यांनी कधीही सोडला नाही तरीही १९८० पर्यंत हिंदुत्ववाद्यांना ओशोंवाद झेपला नाही नंतर आलेल्या नवहिंदुत्ववादी पिढीने मात्र हळूहळू ओशोंवाद स्वीकारायला सुरवात केली मात्र आजही हा ओशोंवाद झेपलाय असं वाटत नाही ओशोंनी मोक्षाचा जो फिल्मी drama उभा केला त्याला तर तोड न्हवती साहजिकच हिंदू संस्कार मानणाऱ्यांना ओशोंच्यात एक नवा प्रेषित सापडला आज ओशोंचे वैचारिक वर्चस्व प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे 

भारताचे एक वैशिष्ट्य आहे इथे नवतेलाही परंपरेचा आधार द्यावा लागतो त्यामुळे बंडखोर लोकही वेद उपनिषद गीता ह्यांचा आधार घेऊन बोलायला लागतात संपूर्ण पुरोगामीवादाचं हे वैशिष्ट्य होतं म्हणजे युरोपियन पुरोगामीही टेस्टामेन्ट , प्लेटो आणि ऍरिस्टोटल ह्यांचा आधार घेऊनच सुरवात करताना दिसतात ओशोंना ह्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी बुद्ध महावीर उपनिषद बायबल सुफी कथा झेन व भक्ती संत ह्यांचा आधार घेत त्यांनी मांडणी केली आधुनिकतेने जी परंपरा धुडकावली ती उत्तराधुनिकतेनं पुन्हा नव्याने सादर केली ओशो रजनीश हे भारतीय उत्तराधुनिकतेचं उत्तम उदाहरण होय 

१९९० नंतर हिंदुत्ववाद सत्तेवर यायला सुरवात केली साहजिकच संविधानाला असलेला त्यांचा विरोध माहीत असल्याने पुरोगामी लोक हळूहळू चिंतेत पडायला लागले हिंदुत्ववादी जर स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहिले तर आज ना उद्या हे संविधान धुडकावणार हे उघड आहे प्रश्न आहे नव्या संविधानाची दिशा काय असणार आहे प्रतिगामी कि गतिगामी ? प्रतिगामी पुनर्जिवनवादी संविधानामुळं पाकिस्तानचे अफगाणिस्तानचे काय हाल झाले ते आपल्यासमोर आहेत त्यामुळं संविधानातील बदल गतिगामी असणार असतील तरच ते भारताला पुढे न्हेतील समान नागरी कायदा हे त्यासाठीचे पहिले पाऊल आहे सद्यातरी ह्या पावलांची हवा आहे पण प्रत्यक्षात त्यादृष्टीने पाऊल टाकणे राजकारणामुळे अडले आहे म्हणजेच समान नागरी कायद्यामुळं आपण इलेक्शन जिंकू कि हरू हे हिंदुत्ववाद्यांना सद्या कळत नाहीये 

दुसरी गोष्ट पर्यायी संविधानाची कसलीही बौद्धिक व्यवस्था हिंदुत्ववाद्यांच्याकडे नाहीये काही लोक तर चक्क मनुस्मृतिवादी आहेत हे लोक जर आवाजी होत गेले तर हिंदुत्ववाद्यांचा पराभव अटळ आहे हिंदुत्ववाद्यांच्यातच प्रतिगामी हिंदुत्ववादी व गतिगामी नवहिंदुत्ववादी असे दोन गट पडलेले दिसतात मोदी गतिगामी हिंदुत्ववादी असल्याने सद्या प्रतिगामी हिंदुत्ववादी गप्प आहेत पण ते अशेच राहणार आहेत का 

हल्ली आयडियालॉजी इज डेड म्हणणाऱ्या उत्तराधुनिक महाभागांची संख्या वाढतीये मन्या जोशी ह्याने कवितेत ही घोषणा अमेयुरोपमधून आयात केली होती तेव्हा मी त्याला दणकून विरोध केला होता फिक्शनमध्ये जगणाऱ्यांना असले चाळे सुचतात ज्यांना ह्या देशाची ग्राउंड रियालिटी माहीत आहे त्यांना ह्या देशात आयडियालॉजीतल्या काही गोष्टींची किती गरज आहे हे नीट माहीत आहे ह्या अंगाने मी एक इन्टर्व्युही दिला होता आयडियालॉजीवाल्यांना चौथ्या नवतेत आणलं पाहिजे हे खरं पण हे करतांना आयडियालॉजीतल्या स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही सारख्या मूल्यांना नष्ट करता कामा नये असं माझं ठाम मत आहे 

हिंदुत्ववाद्यांचं संविधान स्वातंत्र्याचं काय करणार आहे ? ह्या देशातील ब्राह्मण्यवादानं इसवीसन १००० नंतर ब्राह्मणेत्तरांच स्वातंत्र्य धर्माकडे गहाण ठेवून घेतलं होतं शैव राजवटींनी ( शिवाजी महाराज ते होळकर शीख राजवटी )  ते वारंवार सोडवून आणलं म्हणून ते टिकलं पुन्हा जर का ते हिसकावलं गेलं तर शैवांनाच ते पुन्हा सोडवून आणावं लागेल त्यापेक्षा ते जाणारच नाही ह्याची काळजी घ्यावी हे उत्तम 

मला आशा आहे कि हिंदुत्ववादी प्रतिगामी दिशेकडे न जाता भविष्याच्या गतिमानी दिशेनं जातील गोळवलकर कि प्रमोद महाजन ह्यात प्रमोद महाजनांची निवड करावी लागणे अटळ आहे अन्यथा सद्या अल्पमतात असलेला ब्राम्हण्यवाद (हा फक्त ब्राम्हणांच्यात असतो असं नाही तो कुणातही असू शकतो अनेक ब्राम्हण ब्राह्मण्यवादापासून मुक्तही आहेत  ) प्रथम पाठीवर मग डोक्यात चढेल आणि मग डोक्यात जाईल ब्राम्हण्यवाद डोक्यात गेला कि तो आपोआपच इतरांना छाती पोट मांड्या म्हणत पायदळी तुडवतो हा इतिहास आहे 

स्वातंत्र्य चळवळीतून प्राप्त झालेल्या आपल्या संविधानाचा स्वातंत्र्य हा प्राण आहे तो जिवंत रसरसता व सळसळता राहिलाच पाहिजे 

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

मोक्ष LOVE