DECATHLON TANTRA NOV 24
जानेवारी 25 टायपिंग
पता नही कौनकौनसे तमाशे खडे होने वाले है
शायद अनदेखे डरानेवाले जमाने खडे होने वाले है
सदिंया बीत गई मगर हम वहा के वहा ठहरे हुए
क्या आनेवाले समयभी वैसे के वैसे खडे होने वाले हैं ?
जातके अलावा कुछ नही दिखता उन्हे भगवान दिखता है
क्या पहले जिनके ठेके थे उन्हीके ठेके खडे होने वाले हैं ?
जिन लोगोने बदलनेकी कोशिश की वो लापता हो गये
जो कभी बदले नही उनकेही बच्चे खडे होने वाले है
ये नजारा हुस्न का नही ये नजारा मातम का है
अब हर जगह इन्सान लाश बनके खडे होने वाले है
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलॉन :अन कॅटेगरीकल: तंत्र या काव्यफायलीतून)
तुला दुसरा कोणी वाचवेल
ही दंतकथा आहे
तुझे आयुष्य फक्त तूच अनुभवू शकतोस
त्यामुळेच तुझ्याविषयीचे निर्णय
तुझ्याच अनुभवातून येऊ शकतात
अनुभवांची कक्षा रुंदव
पण स्वानुभव प्रायोरिटीला ठेव
मेंदूच्या आत तर केवळ तूच आहेस
तेही मेंदू ने तयार केलेले आहेत
प्राण वाहत आहे
तो रक्तापासून पाण्यापर्यंत काहीही गोळा करू शकतो
तो कोणत्या समुद्राला नेऊन मिळवायचा
हे मात्र तुझ्या हातात आहे
म्हटलं तर शिवाकडे जाऊ शकतोस
किंवा ह्या जीवांच्या समुद्राकडे जाऊ शकतोस
बाकी एक गोष्ट नक्की आहे
जीवांच्यात मीठ लागते
शिवात मीठही विरघळून जाते
श्रीधर तिळवे नाईक
( डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
विक्षिप्तपणा म्हणजे सिद्धी नव्हे
मोक्ष मिळवणे ही खरी सिद्धी
यमनियम हीच सिद्धता
प्रचंड नाक वाढवणे
रोज दहादा आंघोळ करणे
किंवा दहा वर्षे अंघोळ न करणे
कपडे न घ****
किंवा १०० कपडे घ****
म्हणजे तपस्या नव्हे
नग्नतेचा खरा अर्थ
बनण्याचे सारे कपडे
बनवण्याचे सारे कपडे
उतरवून ठेवणे
केवळ असणे
नग्न तोच ज्याच्या अंगावर समाजाने दिलेल्या कुसंस्काराचे कपडे टिकत नाहीत
केवळ आंघोळ करून स्वच्छ होशील
पण शुद्ध होशील याची कसलीही गॅरंटी नाही
जोवर अंतकरण शुद्ध नाही
तोपर्यंत मळाचा अंत नाही
अंतकरण शुद्धी ही खरी शुद्धी
आणि अहंकार म्हणजे अशुद्धी
नखे वाढवू नकोस
कुठल्याही भ्रष्टाचारात हात न बुडवणे
म्हणजे नखे न वाढवणे
नख म्हणजे तृष्णांची वाढ
ती नैसर्गिक आहे
तिला शैविक बनवणे म्हणजे सिद्धता
जे शिवाकडे नेते ते शैविक
जे जीवात अडकवून ठेवते ते जैविक
फरक समजून घेणे म्हणजे सिद्धता
ह्या अशा ठोंब्या उपायांच्याकडे
जाशील
तर आयुष्याची होळी होशील
आयुष्याची काशी करणे म्हणजे मोक्ष मिळवणे
आणि ते ठोंब्या उपायांच्याकडून
शक्य नाही
जर खरोखरच काशीत जायचे असेल
तर मोक्षाची साधना कर
बाकी सगळ्या चिल्लर राजधान्या आहेत
वाजल्या न वाजल्या
नाहीतर मोडून खाल्ल्या
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
शरीर म्हणजे महाप्राणावर उठलेली लाट
लाटेत पाणीही आहे
जिला तू प्राण समजतोस
आणि समुद्रही आहे
तुझा सगळा तामझाम त्या पाण्यातल्या क्षारांनी उभा केलाय
ज्यात मीठही येते
तेव्हा नावा सोड
पण त्या पाण्यावरच तरंगत राहतील किंवा पाण्याभोवती
याचे भान बाळग
ढग उडतील तुझ्यातूनच
कदाचित पाऊस पडेल
पण हे सर्व पुन्हा समुद्राला मिळणार आहे
याचे भान बाळग
सतत सरकत राहशील मागेपुढे
गतीचा फील येईल
पण मुळात तू एका महागतीत अडकलेला आहेस
जीला पृथ्वी म्हणतात याचे भान बाळग
तुझ्या पोटातून एखादा मासाही निघून जाईल
तो शार्कही असेल किंवा देव मासा
एखादा समुद्र घोडा तुला टचही करेल
किंवा एखादे जेलीफिश
समुद्राच्या पोटातलं काही ना काही तुला सतत स्पर्शत राहील
ते म्हटलं तर तुझं आहे
म्हटलं तर तुझं नाही
तू आयुष्यभर लाटेला पाहत राहशील
आणि लाटांना पाहत राहशील
तुला कोणीही सांगणार नाही की तू समुद्राचा भाग आहेस
कारण लाट असताना लाटेला समुद्र दिसत नाही
कळत तर बिलकुलच नाही
तेव्हा अज्ञानाची लाज बाळगू नकोस
फक्त ज्या दिवशी तुला कळेल की तू समुद्र आहेस
त्या दिवशी तू समुद्र झालेला असशील
आता हे कळण्यासाठी
तुला किती स्वतःतच येरझऱ्या माराव्या लागतील
मला माहित नाही
कोणी सांगावं लाटांचं उठणं आणि बसणं
हे सुद्धा येरझऱ्या असेल
तेव्हा डोळे उघडून बघ असे मी म्हणणार नाही
कारण डोळे उघडले की तुला फक्त लाटा दिसतील
डोळे मिट
आणि लाट-उनाडक्या सोडून दे
एकदा डोळे मिटलास
की कोणी सांगावं
समुद्र होशील
आणि लाटा तुला दंतकथा वाटतील
पाण्याचा स्वभाव आहे असे म्हणून सोडून दे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्यफायलीतून)
कसल्या जगात तुला पॉप्युलर व्हायचंय
हा नरक आहे तुला नरकाची खबर व्हायचंय?
रिस्क मर्सिडीज आहे पराक्रम मागते
तिचे मालक व्हायचंय की ड्रायव्हर व्हायचंय ?
देह खराब झालाय इंजीनियरिंगने दुरुस्त होणार?
ज्याला त्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचंय
जंगलाचा एकच फायदा शत्रूची भूक मर्यादित
ठरव शिकारी कि शत्रूचे अन्न पोटभर व्हायचंय
चांगले वाईट सर्वांना नीट माहिती आहे
ज्याला त्याला यशस्वी पण फास्टर व्हायचंय
शेवटी त्यांनी माझे अचूक निदान केले
जिथे शून्य ठेवता येईल असा डोंगर व्हायचंय
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र या काव्यफायलीतून)
गुण आणि अवगुण
एका नाण्याचे फ्युजन
हा आसक्तीचा धातू
नाणी पाडण्याचा सेतू
होतील सदा निर्माण हेतू
कधी किंतु कधी परंतु
तुला बनवतील जंतू
आन देतील मोठा तंबू
आधी व्याप्ती उखाड
होशील मोक्षाचे झाड
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलोन सिरीज मधील डे कॅथलॉन अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
ढग
आकाशाच्या विरोधात उभा ठाकलेला ढग
मी काढून घेतो अलगत त्याची पाण्याची रग
चालून नेतात चालू फ्लॅश एकामागून एक
काळ उभा करतो त्याच्यापुढे जहाजाचे डेक
पाण्याशिवाय कसे बरसावे कोल्हापूर शहरात
त्याच्यामधून गळत राहते एक कोरडी धार
डोळ्यामधून उडत राहतो आगीचा धुरळा
माहित नाही कुठल्या पृथ्वीचा काढणार असतो कोथळा
प्रेम नसलेला तो आकाशा मधूनच हद्दपार
शेवटपर्यंत कळत नाही त्याचा आर त्याचा पार
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र या काव्यफायलीतून)
थोडे तीळ थोडा गूळ
संसाराचे गोड मूळ
गोड खाण्याचे व्यसन
आयुष्यावर वजन
एकही नाही लाभ
तरी सुटत नाही लोभ
झाले आयुष्य चक्की
देहामध्ये धक्काबुक्की
फेक गर्दी बाहेर
तरच तुझी आहे खैर
संसाराने देह ज्याचा ढापला
तो राहत नाही आपला
एक तीळ वाट सातात
काय होते बघ आत
देह होईल शून्याळा
होशील पूर्ण सगळा
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन अन कॅटेगरी कल तंत्र या काव्यफायलीतून)
जलतंत्र श्रीधर तिळवे नाईक
कोणी समुद्रात पडून असतं
कोणी ढग बनून हवेत जातं
कोणी फक्त उपकारासाठी कोसळतं आणि कुणाला टिकवतं
कोणी झरा बनतं
तर कोणी नाला
कोणी गटार सुद्धा
तेव्हा मदत करताना नेहमी लक्षात ठेव
स्वतः वाहतो आहेस
आणि ज्याला मदत देतोयस तोही वाहत आहे
तुझी मदत तुझे वाहणे आहे
ज्याला मदत केली आहेस
तो वहात वहात कुठे जाईल हे कोणीही सांगू शकत नाही
कदाचित तो/ती उद्या मोठी नदी बनेल
आणि तू झराच राहिलेला असशील
आणि तो/ती तुला ओळख दाखवणे बंद करेल
प्रवाह जगणे किंवा प्रवाह होणे इतके सोपे नसते
तू जर खरोखर झरा बनलेला असशील
तर महानदीची तुला आठवणही येणार नाही
ती तुला दिसणारच नाही
तू तुझ्या झरा असण्यातच खुश असशील
आनंदात असशील
पण डोळे मोठे करून पाहशील तर तुझ्या मदतीमुळे कोणी नदी झालेले असेल
कोणी महानदी झालेले असेल
तुला आयुष्याचा राग येईल
तुला तू केलेला मदतीचा कदाचित पश्चाताप होईल
पण लक्षात ठेव तू ज्याला मदत केली तो आता शिल्लक नाही
आणि आता जो आहे
तो महानदी आहे
तो काहीही करेल
त्याला संपूर्ण विसर पडेल
जग हे असं आहे
तुला आवडो ना आवडो
ते असंच प्रवाहित राहणार आहे
तेव्हा तू फक्त वाहणे बन
कोण कुठे पोहोचले याच्याशी तुला काय कर्तव्य ?
फक्त शुद्ध पाणी रहा
स्वतःच्या वाहण्यावर प्रेम कर
पण तुला कोणी बाटलीत बंद करणार नाही
याची काळजी घे
आनंदात खळखळता राहशील
तर ट्रस्ट मी
एक दिवस थेट समुद्र बनशील
जो कितीही ढग तयार करू शकतो
आणि पावसाळे पाठवू शकतो
तर रहा वहा
खळखळत
मातीवर बागडत
पाण्याचे फुलपाखरू बनत
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन या काव्य सिरीज मधील डे कॅथलॉन अन कॅटेगरी कल :तंत्र या काव्यफायलीतून)
डेकॅथलॉन तंत्र २०२४ डिसेंबर टायपिंग
चंद्रावर पोहचला पण ना माणूस राहिला
जनावर होता शेवटी जनावरच राहिला
रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूस मंदिरे
ईश्वर न कळणारा पाठलागच राहिला
त्याच त्याच गोष्टींनी आश्चर्य मुग्ध होऊ शकतो
वाढलो पण माझा जीव बालक फ्रेश राहिला
आपण जगावे म्हणून हे जग जन्मलेले नाही
ही गोष्ट वेगळी कि माणूस उत्क्रांत होत राहिला
माझी म्हणावीत अशी फक्त इंद्रिये होती
ज्यांच्यासाठी हा निसर्ग एव्हरग्रीन राहिला
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरींजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल तंत्र ह्या काव्यफाईलीतून }
पायताण नाही पण पाय आहेत ताण आहे
तुळजामुळे शरीरात अद्याप त्राण आहे
ज्यांना प्रेमाच्या व्याख्या ठाऊक नाहीत
त्यांच्यात पोपटात टिकलेला प्रेमाचा प्राण आहे
आकाश घसरगुंडी झाले ढग घसरले
कुणी वादळाचे हलवले पंचप्राण आहे
त्याने थोडासा दरवाजा काय ठोठावला
घराचा आतमध्ये हलला प्राण आहे
शेवटी कुणी न पोहचला ईश्वरापर्यंत
प्रत्येकाचा अहंकार वरताण आहे
अलंकारांचा देश त्याला अलंकार हवेतच
आयात करा जर संपली सोन्याची खाण आहे
आता मला थोडेसे घरगुती वाटत आहे
बुद्धाने काळजातला काढला बाण आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /तंत्र ह्या काव्यफायलीतून
मी स्वतःलाच मिठी मारली
मी स्वतःच्याच खांद्यावर डोके ठेवून रडलो
एकांत कधी साडी नेसला
कधी बिकनी घालून पोहला
दुःखांचे चेंडू समुद्रात कोसळले
तेव्हा म्हणालो बना नावां
आणि परता व्यवस्थित माझ्या हृदयात
समोरचा सुरा घेऊन आला
तेव्हा त्याच्याकडे पाठ केली
नीतीने ठरवलेले निर्णय
आणि निर्णयाने ठरवलेली नियती
यांच्यात फाटा फूट झाली
तेव्हा झोपेची क्वांटिटी वाढवली
ताणांचे अरण्य उभे केले
आणि बघता बघता ते प्राणी झाले
ऑर्डर आल्या त्या स्वीकारल्या
केओस आले तेही स्वीकारले
होम डिलिव्हरी म्हणून नेहमी
हॅप्पीनेस डिलिव्हर केला
प्रेमाला जिद्द बनू दिले नाही
पाण्यासारखे आले तेव्हा गाणे केले
लोकांनी गद्दारीच्या व्याख्या बदलल्या
मी त्याबाबत सनातनच राहिलो
मोक्षाने दोन पावलं मागं नेलं
तर मी जिद्दीने शंभर पावले पुढे टाकली
लोक प्रार्थना आणि दारू यांच्यात
दारू निवडत असताना
मी प्रार्थना निवडली
आता तुझ्यासमोर उभा आहे
काहीही न मागण्यासाठी
माझी ही ताकद
काहीही न मागण्याची
तेवत ठेव
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलोन सिरीजमधील डेकॅथलोन :अनकॅटेगरीकल : तंत्र या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment