SAMIKSHA

 मिलान कुंदेरा श्रीधर तिळवे नाईक 

मिलान कुंदेरा गेला माझ्या कादंबरीकुळाचा हयात असलेला महाकादंबरीकार गेला 

प्रत्येक कादंबरीकाराचे स्वतःचे म्हणून असे घराणे असते माझे घराणे मराठीत अनुवंशहीन असले तरी जागतिक साहित्यात त्याचा वावर आहे ह्या कादंबरीकुळाचा आदिपुरुष महर्षी व्यास ! भाव , कल्पना आणि विचार ह्यांचा परफेक्ट समतोल साधत स्वतःच्या दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक घोड्यावर परफेक्ट मांड ठोकून संपूर्ण जगभरचा प्रवास भाषेत ट्रान्सफॉर्म करणे हे ह्या कुळाचे आदिम वैशिष्ट्य ! मराठीत भाव आहे तर विचार नाही दोन्ही असतील तर दार्शनिक घोडा नाही तिन्ही असतील तर कल्पनेचा पत्ता नाही असा सगळा घोळ ! साहजिकच मराठीतील एकाही कादंबरीकाराशी माझं जमलं नाही माझ्यावर सुरवातीच्या विद्यार्थी दशेत सखोल प्रभाव पडला तो व्यासांचा आणि कवितेत असाच समतोल साधणाऱ्या ज्ञानेश्वरांचा !

व्यासांची दार्शनिक मांडणी मला कधीच पटली नाही पण त्यांची घौडदौड करण्याची शैली मला पटली पुरोगामी कालखंडातला तर एकही कादंबरीकार मला आवडला नाही मात्र आधुनिक काळात असा कादंबरीकार मला वाटला तो जॉ पाल सार्त्र ! अस्तित्ववादाची पक्की मांड आणि भाव विचार ह्यांचा समतोल त्याच्यात मला आढळला त्यानंतर माझ्या आयुष्यात आला उत्तराधुनिक मिलान कुंदेरा !

The Unbearable Lightness of Being ही माझी त्याची सर्वात आवडती कादंबरी ! आधुनिकतेनं जो The Unbearable heaviness Being ला दिला होता त्याला लायटर पण गहन करत व्यक्त करण्याची ही शैली मला ज्याम आवडली खरेतर आयुष्याकडे जोक म्हणून पाहायला त्याने पहिल्याच कादंबरीत सुरवात केली अस्तित्वाच्या एकटेपणाऐवजी दुकटेपणावर त्याचा जोर होता “Two people in love, alone, isolated from the world, that's beautiful.”हे तसं भारीच होतं 

त्याने पुरोगामी कादंबरीतला व्यक्तिरेखा उभा करण्याचा मोह कायमच टाळला The Unbearable Lightness of Being मध्ये 

He had first met Tereza about three weeks earlier in a small Czech town. They had spent scarcely an hour together. She had accompanied him to the station and waited with him until he boarded the train. Ten days later she paid him a visit. They made love the day she arrived. That night she came down with a fever and stayed a whole week in his flat with the flu.

अशी वर्णनात्मक सुरवात करत नंतर मग 

And all at once he fancied she had been with him for many years and was dying. He had a sudden clear feeling that he would not survive her death. He would lie down beside her and want to die with her. He pressed his face into the pillow beside her head and kept it there for a long time. Now he was standing at the window trying to call that moment to account. What could ithave been if not love declaring itself to him?

But was it love? The feeling of wanting to die beside her was clearly exaggerated: he had seen her only once before in his life! Was it simply the hysteria of a man who, aware deep down of his inaptitude for love, felt the self-deluding need to simulate it? His unconscious was so cowardly that the best partner it could choose for its little comedy was this miserable provincial waitress with practically no chance at all to enter his life! 

असं काहीतरी येतं 

लेखक असणे म्हणजे सत्य शोधणे हे त्याला नीट कळलं होतं त्याची कल्पनाशक्ती स्वप्नील न्हवती तर फिक्शनल आणि फिलॉसॉफिकल होती साहजिकच कल्पनांची धुळवड उडण्याऐवजी एखाद्या खिडकीची काच पतंग म्हणून आभाळात उंच उडावी तसं काहीसं त्याच्या शैलीत कल्पनेचं व्हायचं वास्तवाचा त्याला तिटकारा न्हवता पण वास्तवाला इंट्रोस्पेक्टिव्ह सेल्फटच देण्यात तो वाकबगार होता बेकेटची मितव्यय शैली त्याने आत्मसात केली होती पण तिचा एकसाचेपणा त्याने टाळला बेकेट काय किंवा कुंदेरा काय दोघेही प्रथम कवी होते आणि त्याचा प्रत्यय गद्यातही दरवळता ठेवण्यात दोघे वाकबगार होते 

उत्तरआधुनिकतेनं केंद्रस्थानी आणलेला आयडेंटिटीचा प्रश्न त्याच्या कादंबऱ्यांत वारंवार येतो आधुनिक अस्तित्वाकडून उत्तराधुनिक आयडेंटिटीकडे झालेला प्रवास अनेकदा त्याच्या पात्रात आढळतो 

ओळखीचा पायाच मुळी मेमरी असतो त्यानेच म्हंटल्याप्रमाणे "The first step in liquidating a people is to erase its memory. Destroy its books, its culture, its history. Then have somebody write new books, manufacture a new culture, invent a new history. Before long that nation will begin to forget what it is and what it was... The struggle of man against power is the struggle of memory against forgetting."

तो आफ्टर अम्नेशियावर बोलत नाही तर अम्नेशिया येऊ नये म्हणून मेमरी सतत जिवंत ठेवण्याची आवश्यकता पटवतो राजकारण नेहमीच मतदारांची मेमरी खतम करून त्यांना नवीन आठवणी पुरवण्यासाठी धडपडत असतं अशावेळी नवीन मेमरीनां जागा देत जुन्या आठवणी जिवंत ठेवणं हा राजकीय लढ्याचा आवश्यक भाग बनतो ब्रिटिशांनी भारतीयांची मेमरी आपल्या हिशेबाने चालवली प्रत्येक साम्राज्यवादी नेता हे करतो अशावेळी आपल्या सांस्कृतिक आठवणी शाबूत ठेवणे फार गरजेचं बनतं कुंदेराच्या कादंबऱ्यात हे सर्व येते करुणा खूप हेवी असते म्हणूनच दुसऱ्याविषयीचे दुःख आपलं अंतःकरण जड करतं “Speak truth to power." असं त्यानं एके ठिकाणी म्हंटल आहेच प्रश्न इतकाच पॉवर बहिरी असेल तर ! निदान मग स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी तरी पॉवर ऐको न ऐको आपण बोलत राहिलो पाहिजे कला आजच्या काळात स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी बहिऱ्यांच्यापुढे केलेले संभाषण आहे संप्रेषण आहे 

विलास सारंगांनी आधुनिक दृष्टिकोनातून नॉस्टलजियावर टीका केली होती मिलांन कुंदेरा उलट दिशेनं जातो The Greek word for “return” is nostos. Algos means “suffering.” So nostalgia is the suffering caused by an unappeased yearning to return.” असं म्हणतो आज नॉस्टलजिया स्वप्नरंजन राहिलेला नाही तो रिटर्न ऑफ सफरींग बनला आहे कारण मायग्रेशन झाल्यानंतर नॉस्टलजिया पाठलाग करतो कुंदेरा आपल्या देशातून फ्रान्समध्ये मायग्रेट झाला होता साहजिकच नॉस्टॅलजिया फक्त भूतकाळ नाही तर जे मागे उरलेत त्यांचे काय ह्यांची काळजीही आहे चिंताही आहे 

आईन्स्टाईनने “Weak people revenge. Strong people forgive. Intelligent People Ignore.” असं म्हंटलं होतं आज सोशल मीडिया इंटीलिजन्ट लोकांना इग्नोर करूच देत नाही विशेषतः कम्युनिझममध्ये हे फारच अवघड बनलं होतं आत्महत्येचं सुप्त पोटेन्शियल पदोपदी तुम्हाला आजमावत असताना टिकून राहण्यातच आयुष्य खर्ची पडणं अटळ ! कुंदेराने आपलं आयुष्य कादंबरीत खर्च केलं 

त्याच्या आयडेंटिटी ह्या लघुकादंबरीत दोन वेट्रेसमधील एक संवाद आहे 

At the far side of the room, near the door to the kitchen, two waitresses were deep in discussion. Since she hated to raise her voice, Chantal got up, crossed the room, and stopped beside them; but they were too absorbed by their topic: "I'm telling you, it's ten years already. I know them. It's terrible and there's not a trace. None. It was on TV." The other one: "What could have happened to him?" "Nobody can even imagine. And that's what's horrible."

माहीत नसणं हे एकवेळ ठीक पण काय घडलं त्याची कल्पनाही करता येऊ नये हे जास्त हॉरिबल आहे 

व्यासांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका युगाच्या अस्ताविषयी बोलतायत सार्त्र आधुनिक युगाच्या अस्ताविषयी बोलतोय तर कुंदेरा कम्म्युनिझमच्या अस्ताविषयी बोलतोय आमच्या पिढीवर उत्तराधुनिकतेच्या अस्ताविषयी बोलण्याची वेळ आली इरावती कर्वेनीं ह्याला युगांत म्हंटलं होतं हा युगांत ज्यांना पेलायचा आहे त्यांना कुंदेराचे वाचन मस्ट आहे 


श्रीधर तिळवे नाईक


पुस्तक खपवण्याची जबाबदारी कोणावर आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

मराठीच्या साहित्य व्यवहारावर अनेक अंगाने प्रकाश टाकला जातो आणि त्यात पुस्तकाच्या खपाचा प्रश्न नेहमीच येत असतो या अंगाने एक प्रश्न नेहमीच निर्माण होत असतो तो म्हणजे औद्योगिक  युगा मधला  उत्पादन खपवण्याचा जो अधिकार आहे तो नेमका प्रकाशकांनी म्हणजेच उत्पादकाने कसा वापरावा ?आपल्याकडे यासंदर्भामध्ये जो गोंधळ सुरू आहे तो संपता संपत नाहीये म्हणूनच हे टिपण लिहीत आहे

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लेखक नेमका या संपूर्ण व्यवहारात काय असतो ? तर माझ्या मते जो दर्जा इन्व्हेंटरचा असतो तोच लेखकाचा असतो आता एखाद्या इन्व्हेंटरने जर एखाद्या गोष्टीचा शोध लावला तर तो शोध स्वीकारायचा की नाही हे उद्योगपती ठरवतात आणि साहजिकच त्यांनी तो उत्पादन करण्याचा अधिकार किती पैशात  घ्यायचा हे इन्व्हेंटर आणि उत्पादक दोघे मिळून ठरवतात एकदा का हा अधिकार घेतला की ते उत्पादन करण्याचा आणि खपवण्याचा अधिकार हा उत्पादकाकडे जातो साहित्याचे क्षेत्र याला अपवाद कसे असू शकते ? परंतु आपल्याकडे हा प्रश्न निर्माण होतो याचे कारण असे आहे की काही लेखकांची पुस्तके खपत नाहीत याचा अर्थ असा की उत्पादन फ्लॉप झाले आहे इन्वेंशन फ्लॉप झालेले आहे सर्वसाधारणपणे जगात या व्यवहाराची आणि या फ्लॉप होण्याची जबाबदारी उत्पादक घेतात परंतु पुस्तकाच्या संदर्भात मात्र माहित नाही का परंतु ही जबाबदारी उत्पादक घेत नाहीत म्हणजे फायदा मिळाला तर आमचा , पण तोटा झाला तर मात्र त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही अशी काहीशी वृत्ती काही उत्पादकांची झालेली असते याचा अर्थ असा आहे की उत्पादक हा फायनान्शिअली एबल नाहीये आणि इथेच मग उत्पादकाने उत्पादक होण्याचा घेतलेला निर्णय हा का घेतलेला आहे असा प्रश्न निर्माण होतो अशावेळी एक उत्तर असे असते की उत्पादन करण्याची क्षमता आणि कौशल्य आहे तशी स्किलड माणसे आहेत परंतु उत्पादन करण्यासाठी लागणारा पैसा नाही अशावेळी लेखक लोक जर का उत्पादनासाठी पैसे देऊन मदत करत असतील तर तो व्यवहार नेमका कसा पार पाडायचा ही पूर्णपणे त्या लेखकाची आणि  प्रकाशकाची वैयक्तिक गोष्ट बनून जाते या व्यवहाराच्या टर्म्स आणि कंडिशनस ह्या त्या दोघांनी मिळून ठरवायच्या असतात उत्पादन करण्यासाठी पैसे नाहीत हे एक वेळ समजून घेता येते परंतु जर ते पुस्तक म्हणजे उत्पादन खपवण्याची सुद्धा क्षमता नसेल तर मात्र मग प्रश्न निर्माण होतो की उत्पादक उत्पादक का झालाय कारण उत्पादनासाठी लागणारे पैसे सुद्धा नाहीत आणि उत्पादन खपवण्याचीही क्षमता नाही तर मग उत्पादक होण्याचे क्वालिफिकेशन काय? केवळ उत्पादन करण्याची क्षमता त्या संदर्भातले कौशल्य हे उत्पादक बनण्यासाठी पुरेसे आहे का?

 प्रश्न असा आहे की पुस्तक खपवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि लेखकाने या संदर्भात काय करायला हवे ? अनेकदा या सगळ्या गोष्टींच्यावर आदर्श पातळीवर चर्चा होते मला असे वाटते की याबाबतीत आपण जमिनीवर येणे खूप गरजेचे आहे 

इनवेंटर कोण असतो तर तो प्रतिभाशाली असा मनुष्य असतो जो इन्वेंशन करतो साहित्याच्या व्यवहारामध्ये लेखक इन्वेंशन करतो लेखकाचे प्रत्येक पुस्तक हे इन्वेंशन असते आता एकदा ही गोष्ट स्विकारल्यानंतर प्रश्न इतकाच येतो की मग त्याने हे इन्वेंशन कोणाला द्यायचे आणि इथे प्रकाशक येतो कारण  स्वतः इन्व्हेंटर लोकांच्याकडे स्वतःचे उत्पादन करण्याची सामग्री नसते किंवा त्यासाठी लागणारा वेळ नसतो कौशल्य नसते साहजिकच हे इन्वेंशन उत्पादन करण्यासाठी उत्पादकाला दिले जाते अनेकदा उत्पादन करण्याचे कौशल्य असते परंतु त्यासाठी लागणारा पैसा नसतो किंवा त्यासाठी लागणारा सगळा स्किल स्टाफ नसतो साहित्य क्षेत्रामध्ये हे उत्पादन करणे प्रकाशकाकडे दिले जाते मग उत्पादन झाल्यानंतर ते खपवण्याची जबाबदारी कवींनी घ्यायची का इनवेंटरने घ्यायची असा प्रश्न निर्माण होतो आणि अलीकडे ही जबाबदारी जो घेऊ शकतो तोच प्रसिद्ध कवी होतो विशेषता प्राध्यापक लोक आरामात स्वतःच्या एका पगारांमध्ये पुस्तक काढू शकत असल्याने प्राध्यापक लोकांचे अत्यंत सामान्य दर्जाचे लेखन सुद्धा खपताना दिसते प्रत्यक्षात हे लेखन खपलेले नसते तर ते अनेकदा भेट म्हणून वाटले गेलेले असते म्हणजे पुन्हा एकदा ज्याच्या हातात पैशाचा दोरा तो करतो लेखक म्हणून तोरा अशी स्थिती असते आता ज्यांना ह्या पद्धतीने जायचे नाही त्यांनी काय करावे तर त्यांच्यासाठी मराठीमध्ये कुठलीही दुसरी वाट नाहीये कारण स्वतःचे उत्पादन स्वतः खपवायला लागणारे कॉन्टॅक्टस त्यांच्याकडे नसतात आणि मुळात त्या पद्धतीने काम करण्याची तयारीच नसते

उत्पादन करण्याच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो की उत्पादन करण्यासाठी पैसे लागतात आणि जर का एखाद्या इंवेंशनचे उत्पादन करून घातलेले पैसे येणार नसतील तर ते इन्वेंशन स्वीकारले जाणार नसते मग करायचे काय हा प्रश्न साहित्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने कवितासंग्रहाच्या बाबतीत वारंवार येतो. जर कवितासंग्रह खपणारच नसतील तर त्यांचे उत्पादन का करायचे असा बहुतांशी प्रकाशकांचा प्रश्न असतो आणि तो अतिशय योग्य आहे कारण शेवटी खप नाही झाला तर उत्पादन करता येत नाही शेवटी उत्पादक हा पैसे मिळवण्यासाठी उत्पादन करत असतो एक उपाय असतो तो म्हणजे लेखकानेच उत्पादकाला या संदर्भात पैसे देणे आणि आपले इन्वेंशनचे उत्पादन खपते की नाही याची चाचपणी करणे आणि इथूनच मग प्रकाशकाला कवी लोकांनी पैसे देणे सुरू होते अनेक लोक याला अनैतिकता समजतात परंतु जर का आपण प्रकाशन कसे चालते हे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ही एक अटळ उत्पादकीय व्यवहार केंद्री गोष्ट आहे आमच्या बॉलिवूडमध्ये या संदर्भामध्ये नेहमीच एक भूमिका घेतली जाते ती म्हणजे ज्या लोकांना आपला मुलगा किंवा मुलगी सुपरस्टार होऊ शकतात असे वाटते त्यांनी स्वतःच पैसे टाकावे आणि उत्पादन करावे किंवा मग उत्पादकाला म्हणजेच निर्मात्याला पैसे द्यावेत आणि लॉन्च करावे हा एक असा व्यवहार आहे जो सातत्याने पार पाडला जात आहे त्यातून अनेकदा क्षमता नसलेल्या लोकांचे सुद्धा लॉन्चिंग होते आणि त्यामागे अनेकदा आई-बापांचे आंधळे प्रेम असते या प्रथेची सुरुवात कधी झाली हे सांगता येत नाही परंतु ती गाजली ती तनुजा आणि नूतन या अभिनेत्रीच्या लॉन्चिंग पासून ! शोभना समर्थ यांच्या चित्रपट उत्पादनापासून!  इथे पैशाचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याने साहजिकच हे सर्व स्वीकारले गेले परंतु जिथे अतिशय कमी पैशाचा प्रश्न असतो तिथे अनेकदा भोंगळ नैतिकतेचे प्रश्न निर्माण केले जातात जे प्रत्यक्ष व्यवहाराला apply होत नाहीत प्रत्येक इन्वेंटरला आपल्या इन्वेंशन विषयी खात्री असतेच त्यामुळेच तर तो इन्वेंशनच्या मागे लागतो किंवा त्याची मग ही  पॅशन असते प्रश्न असा असतो की ह्या पॅशन साठी उत्पादकाने किंमत का मोजावी विशेषता जर उत्पादन तोट्यात जाणार याची त्याला खात्री असेल तर!  इथे मुळातच प्रश्न उत्पादकाच्या नैतिकतेचा आहे खरोखर उत्पादक जसे सांगतोय तशी स्थिती आहे का आणि मराठीच्या उत्पादकांच्या बाबतीत ही प्रश्नांकित स्थिती वारंवार निर्माण होते हा प्रश्न वारंवार निर्माण होतो कारण मराठीतील उत्पादकांची याबाबतीतली स्थिती अत्यंत वाईट आहे अनेकदा तर लेखक गरीब आहेत आणि प्रकाशकांचे मात्र बंगले झालेत अशी स्थिती दिसते जर उत्पादन एवढं लॉस मध्ये चाललेले आहे तर मग तुमचे बंगले कसे होतात ? इथे खोटा डाटा पुरवला जातो म्हणजेच इथे डाटाच्या ऑथेंटीसिटी चा  प्रश्न आहे आपल्याकडे प्रकाशक अनेकदा या संदर्भात जी भुक्कडगिरी करतात त्याला तोड नाही मला या संदर्भात फक्त एकच प्रकाशक पुर्णपणे ऑथेंटिक वाटला तो म्हणजे रामदास भटकळ  ! म्हणूनच मी रामदास भटकळ यांच्या विषयी अत्यंत प्रेमाने लिहीत असतो ते मात्र त्यांच्या उत्पादनाचा सर्व तपशील आपल्या इन्व्हेंटरना म्हणजे लेखकांना देत असतात अशा प्रकारचा पारदर्शक कारभार मी तरी इतर कुणाचा पाहिलेला नाही यात माझे दुर्दैवाने काही मित्र सुद्धा आहेत ज्यांनी मला कधीही किती पुस्तके खपली हे सांगितलेले नाही किती प्रति छापल्या खपल्या हे सांगितलेले नाही मुळात हा हलगर्जीपणा आहे तो कसा तर अनेकदा काही प्रकाशक इतके हौशी असतात की त्यांना आपली काही यासंदर्भात जबाबदारी आहे असे वाटतच नाही ते अनेकदा एक नैतिक कर्तव्य म्हणून ह्या गोष्टी करत असतात म्हणजे श्रीधर  हा आपला मित्र आहे म्हणून आपण उत्पादन केले पाहिजे असे वाटणारा माझा मित्र कीर्ती कुमार शिंदे हा आहे त्याचा सगळा प्रकाशनाचा माझ्या संदर्भातला व्यवहार हा मैत्रीत चाललेला व्यवहार होता साहजिकच इथे हिशेब न देणे समजता येते परंतु जे प्रकाशक व्यवहार म्हणून आलेले असतात त्यांच्या संदर्भात त्यांनी व्यवहार स्वच्छ आणि नीटपणे पार पाडायला नको का असा प्रश्न येतो अनेकदा काही लेखक सुद्धा याबाबतीत हेराफेरी करतात असे मला लेखक लोक सांगत असतात अलीकडेच मला एक गोष्ट कळली की एका कवीने एका प्रकाशकाला पुस्तकावर काम करायला सांगितले आणि प्रत्यक्ष पुस्तक दुसऱ्याच प्रकाशकाला देऊन टाकले आता यामध्ये त्या प्रकाशकाचां जो उत्पादन खर्च झाला आहे त्याचे काय तो खर्च तरी मग तुम्ही नैतिकता म्हणून परत दिला पाहिजे जर का तुम्ही ते प्रकाशन दुसरीकडे दिलेले आहे पण दुर्दैवाने या संदर्भातली कसलीही जबाबदारी लेखक महाशयाने घेतलेली नाही आता हा लेखकांच्या बाजूने होणारा गैरव्यवहार आहे मी असे म्हणत नाही की प्रकाशकाची काही चुक नसेल परंतु काही जरी झाले तरी मग या संदर्भात नेमका व्यवहार काय आहे हे तुम्ही स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे अलीकडे लेखक लोकांना अनेक व्यवहार स्पष्टपणे करण्याची सवय नाही मराठी लोक या संदर्भात कायमच घाबरत असतात किंवा भोंगळ उद्योग करत बसतात सर्वात उत्तम गोष्ट अशी आहे की करार झाला तर ती रक्कम ठरवायला हवी आणि ठरवल्याप्रमाणे दिली गेली पाहिजे घेतली गेली पाहिजे आणि जर का करार होणार नसेल तर किमान शब्दांचा व्यवहार पक्का असायला हवा तुम्ही जो प्रकाशनदिनांक दिलेला असतो तो प्रकाशनदिनांक अनेक प्रकाशक पाळत नाहीत यामध्ये अनेक भलेभले प्रतिष्ठित प्रकाशक येतात जर उत्पादकाला आपले उत्पादना दिनांक ठरवता येत नसतील तर त्याचा अर्थ त्याच्या मॅनेजमेंट मध्ये काही घोळ आहे असाच होतो  जर आपले उत्पादन नेमके किती तारखेला येणार हेच तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कसे काय चांगले उत्पादक ? एक वर्ष दोन वर्ष होणारा उशीर मी समजू शकतो परंतु जर एखाद्या पुस्तकाला 20 20 आणि 24 24 आणि 25 25 वर्षे लागत असतील तर या संदर्भातली ऑथेंटीसिटी धोक्यात येते अशा वेळेला नेमके काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो 

कवितासंग्रहाच्या बाबतीत मात्र मी अलीकडे अशा निष्कर्षाला आलेलो आहे की जर काय तुमचे कवितासंग्रह खपणार नसतील तर तुम्ही प्रकाशकाला या संदर्भात मदत करायला हवी. एक तर तुम्ही स्वतःचे कविता संग्रह स्वतः खपवा आणि मुख्य म्हणजे प्रकाशकाने ही जबाबदारी स्पष्टपणे कवीवर टाकावी कवींना स्पष्टपणे सांगावे तू लिहिलेले हे पुस्तक खपणार नाही त्यांनी हे सांगणे गरजेचे आहे आणि खपवण्याची जबाबदारी तुझी आहे जर उत्पादक हे सांगणार नसतील तर मग आपोआपच ही जबाबदारी त्यांच्यावरच पडते ती जबाबदारी घ्यायची नाही असे कसे होईल यासंदर्भात पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे दुर्दैवाने ते अनेकदा नसते 

किंवा मग कवी लोकांनी आता मोजक्या प्रती काढता येणे शक्य असल्याने मोजक्याच प्रती काढून घ्याव्यात जेणेकरून त्यांच्यावर संग्रह खपवण्याची जबाबदारी येऊ नये शेवटी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा फायदा घ्यावा या संदर्भात जर का उत्पादन खपत नसेल तर त्या प्रकारची पारदर्शकता उत्पादकाने ठेवायला हवी अनेकदा उत्पादक किती प्रति गेल्या हे प्रामाणिकपणाने सांगतच नाहीत यातून मग सगळा गोंधळ उडतो जर का तुम्ही किती प्रति काढल्या आणि  किती खपल्या हे व्यवस्थित सांगितले तर पारदर्शक व्यवहार होऊ शकतो कवितासंग्रहाच्या बाबतीत सर्वांनाच माहिती आहे की कवितासंग्रह मार्केटला जातातच असे नाही यासंदर्भातला सर्वोत्तम मार्ग मराठीत कविता लिहिणे बंद करणे हाच आहे पण हिंदीमध्ये काय किंवा इंग्लिश मध्ये काय फार वेगळी स्थिती नाही एकंदरीत कवितेचा व्यवहार आतबट्ट्यातला व्यवहार आहे आणि त्यामुळेच कवितेच्या संदर्भातच प्रकाशनातले अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याच्यावर तोड म्हणून एक मार्ग काढावा लागतो माझ्या मते यातला सर्वोत्तम मार्ग हाच आहे की मोजक्या प्रती काढून घ्याव्यात आणि जर कदाचित काव्यसंग्रह खपायला लागला तर मग उत्पादकाने त्याची जबाबदारी  घ्यावी मात्र उत्पादकाने सुद्धा याबाबतीत व्यवस्थित प्रामाणिक असणे अत्यंत गरजेचे आहे दुर्दैवाने हा प्रामाणिकपणाच उत्पादकांच्याकडे नसल्यामुळे आजच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत मुळात नैतिकतेच्या पातळीचा विचार केला तर ही उत्पादन खपवणे ही जबाबदारी उत्पादकाची आहे संशोधकाची किंवा इन्व्हेंटरची न्हवे पण हा काव्यसंग्रह खपणार नाही याची तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही ते स्पष्टपणे त्या कवीला सांगणे आवश्यक आहे आणि तरीही  इन्व्हेंटरला जर का अशी काव्यसंग्रह काढण्याची हौस असेल तर त्याला मोजक्या प्रती काढतो असे सांगून हा काव्यसंग्रह खरोखर जातो की नाही हे पुस्तक खरोखर जाते की नाही हे पहावे हा व्यवहार कवी लोकांनाही परवडणारा आहे यदा कदाचित जर का ते उत्पादन किंवा काव्यसंग्रह जात नसतील तर त्या संदर्भात एक व्यवहार ठरवून हा व्यवहार कवींनी तो संपवून टाकावा हे उत्तम ! यामुळे दोन्ही बाजूने असलेली कटूता नाहीशी होऊ शकते कधी कवी स्वतःला ओवर एस्टिमेट करतात तर कधी प्रकाशक स्वतःला ओवर इस्टिमेट करतात अशावेळी जर का अंदाज चुकला तर शांतपणाने चुकलेला अंदाज दुरुस्त करणे हाच खरा उपाय असतो आणि तो सभ्य उपाय आहे

श्रीधर तिळवे नाईक 

=================================

मी वैष्णव संतांच्या अभंगांच्यावर फारशी समीक्षा लिहिलेली नाही याचे एकमेव कारण म्हणजे मी खूप कीर्तने ऐकलेली आहेत महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी इतक्या सुंदर पद्धतीने अभंगांची अर्थ निर्णयने केली आहेत की त्यांच्यानंतर काय असा प्रश्न पडावा मग काही जागा ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या आपल्याकडच्या साठोत्तरी पिढीने भरून काढल्या शंकर वैद्य, दिपू चित्रे , भालचंद्र नेमाडे, आ ह साळुंखे  म सु पाटील यासारख्या अनेकांनी इतकं या लोकांच्यावर लिहिलेले आहे की आता काही शिल्लक राहिलेले नाही निदान मला सुचत नाही आणि जेव्हा मला काही नवीन सुचले तेव्हा ते मग माझ्या कवितांच्यातूनच आलं आता कवितेत न आलेलं आणि समीक्षेसाठी शिल्लक असलेलं असं काही माझ्याजवळ आहे का तर नाहीये म्हणूनच मी फार वैष्णव संतांच्यावर बोलत नाही किंवा लिहीत नाही आधी आलेल्या लोकांच्या कामावर आपण काम करावे पण जर का आधीच्या लोकांनी काम केलं असेल तर त्याविषयी माहिती द्यावी आणि ते वाचा असे सांगावे अलीकडे दुसऱ्यांचे कॉपी पेस्टिंग जसेच्या तसे उचलण्याची पद्धत आलेली आहे मला ती मान्य नाही किमान अर्थनिर्णयन वेगळे असायलाच हवे  आपल्याकडे ही पद्धत नाही साठोत्तरी पिढीतल्या अनेक लोकांनी कीर्तनकारांची काही इंटरप्रेटेशनस जशीच्या तशी घेतली आहेत पण अनेकदा त्याचे श्रेय मात्र दिलेले नाही जणू काय कीर्तनकारांना डोके नसते असा काहीसा गैरसमज या लोकांनी करून घेतला की काय असा प्रश्न पडतो  मला हा काहीसा न पटलेला प्रकार आहे कुठल्याही गोष्टीवर काम करताना आपल्याजवळ काही सांगायला नवीन असेल तर आपण बोलावे अन्यथा न बोलणे  श्रेयस्कर!

श्रीधर तिळवे नाईक

*****************************************************************

प्रतिमावाद श्रीधर तिळवे नाईक 

आधुनिक कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये साहित्याच्या ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये जिला व्यवस्थित आकार आला होता अशी चळवळ म्हणजे प्रतिमावाद! एज्रा पाउंड हा या प्रतिमा वादाचा पायोनियर ! टी एस इलियट याने प्रतिमा वादाला अधिक चांगला आकार दिला आणि मराठीमध्ये त्याच्या प्रभावानेच तो जास्त प्रभावी झाला याचे सर्वात मोठे कारण भारतातल्या इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये टी एस हा आधुनिक कवी म्हणून अभ्यासक्रमात होता  एज्रा पाउंड याने हिटलरला पाठिंबा दिल्याने या काळामध्ये त्याच्यावर जवळजवळ बहिष्कारच टाकला गेला आणि सर्व श्रेय टी एस च्या नावाने कसे लागेल याची काळजी घेतली गेली भारतानेही इंग्लंडची भूमिका स्वीकारली आणि इलियट्सचा  जितका विचार आपल्याकडे झाला तितका कोणाचा झाला नाही हा सगळा महिमा अभ्यासक्रमाचा आहे हे उघडच आहे अभ्यासक्रम साहित्य विश्वाला आणि कला विश्वाला कसे डॉमिनेट करत जातात त्याचे हे एक उदाहरण आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याकडे प्रतिमा विचार होतो तेव्हा तेव्हा अनेकदा तो टी एस इलियटचा प्रतिमा विचार असतो आणि त्याच्या विचारांमध्ये अनेकदा पाहून चा विचार असल्यामुळे पाउंड चा विचार असल्याने तोही आपोआप  झिरपतो

पुरोगामी वाद आणि उत्तर पुरोगामी वाद यांच्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे आलेली आणि  सर्व दूर पसरत गेलेली आधुनिकता ही नेहमीच वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये अवतरत राहीली इंग्लंडमध्ये हा प्रतिमावाद आधुनिकता वादाचे लक्षण म्हणून आला काहींच्या मते तर आधुनिकता वाद म्हणजेच प्रतिमावाद इतका त्याचा प्रभाव पडला 

आपल्याकडे सत्यकथा संप्रदायाने या प्रतिमावादाचा प्रचंड गवगवा केला कारण बाळ सिताराम मर्ढेकर यांच्या सौंदर्यमीमांसेमध्ये प्रतिमा केंद्रस्थानी होती सत्य कथेचा सगळा प्रतिमा विचार हा व्यवस्थित एकत्रितपणे मांडण्याचे काम सुधीर रसाळ यांनी केले

वास्तविक प्रतिमावाद हा भारताला नवीन नव्हता मात्र त्याची मांडणी भारतीय होत होती उदाहरणार्थ  ज्ञानेश्वरांचे मोगरा फुलला हे जे काव्य आहे त्यामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणाने प्रतिमावाद देतो ज्ञानेश्वर मोगरा ही प्रतिमा आणि तिचा वेल हे मोक्षाचे प्रतीक बनवतात याचे मूळ शोधले तर आपणाला ते व्यंगार्थात दिसते व्यंजना ही शब्दशक्ती त्यामागे आहे आणि व्यंजनेमध्ये कवीने लेखन करणे हे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये प्रचंड रूढ झालेले होते कारण हा जो मोक्षाचा अनुभव असतो त्याची  इंद्रिय प्रचिती ही फक्त मोक्ष मिळालेल्या माणसालाच होत असते आणि मोक्ष मिळालेल्या सिद्धापुढे सर्वात मोठा प्रश्न असा असतो की ही प्रचिती जी प्रत्यक्षामध्ये फक्त त्या सिद्धाला येत असते  ती ज्यांना ही प्रचिती आलेली नाही त्यांना ती लौकिक भाषेद्वारे कशी द्यायची ? यावर काढलेली तोड म्हणजे व्यंजना ही शब्दशक्ती होय आणि व्यंगार्थं हा शब्दार्थ होय साहजिकच भारतीय प्रतिमावाद हा व्यंजनेच्या अंगाने सतत वाढत राहिला आणि प्रथम सिद्ध साहित्यात व नंतर संत साहित्यात तो अनेक रूपे घेऊन प्रकटत राहिला शैव आणि बौद्ध अशा दोन्ही प्रकारच्या सिद्धांच्या कवितेत तो सतत अवतरत राहिला उदाहरणार्थ सरहपा ,तिलोपा आणि गोरखनाथ वगैरे  नाथ कवी गोरखनाथांच्या संपूर्ण कवितेमध्ये आपणाला अशा प्रकारचा प्रतिमावाद दिसतो मराठीत ही शैली ज्ञानेश्वरांच्या अनेक अभंगांच्या मध्ये आणि ओव्यांच्या मध्ये अत्यंत सुंदर रीतीने प्रकट झालेली आहे  शैव संत साहित्यामध्ये हे खूपदा घडताना दिसते किंबहुना निवृत्तीनाथांच्या पासून ते मुक्तापर्यंत हे आपणाला घडताना दिसते मुळातच मोक्षाचें हे क्षेत्र तसे अलौकिक मानले गेल्याने ते लौकिक भाषेत कसे व्यक्त करायचे हा मोठा प्रश्न या चारही भावंडांच्या पुढे होता साहजिकच व्यंजनेची मदत घेणे स्वाभाविक होते आणि अशी मदत अगदी वैष्णव संतांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे जगातले सर्वात मोठे व्यंजन म्हणजे ईश्वर होय त्यामुळे त्याच्याबद्दलची व्यंजना जितकी अवतरली तितकी ती कुणाबद्दलच कधीच अवतरली नसेल शैव साहित्यातील शिव म्हणून शक्ती गणपती स्कंद  नंदी आणि ईश्वर रूपात आली तर वैष्णव साहित्यात राम कृष्ण विठ्ठल अशा रूपात आलेली दिसते

मराठीमध्ये याची एक पार्श्वभूमी आधीच तयार झाल्याने प्रतिमावाद हा सहज स्वीकारला गेला देशीवादी विशेषता नेमाडे यांच्यासारख्या लोकांना वाटते तसा तो काही पूर्णपणे उसना विचार नाही सुधीर रसाळ यांनी प्राचीन प्रतिमा वादाचा सुद्धा विचार केलेला दिसतो शंकर वैद्य यांनी तर तुकारामांच्या कवितेतले अनेक प्रतिमाजन्य प्रकार शोधून त्याची एक मांडणी केलेली दिसते किंबहुना भयाच्या दृष्टीने तुकारामाच्या कवितेत येणाऱ्या अनेक प्रतिमा त्यांनी व्यवस्थित विश्लेषणाच्या कक्षेत आणलेल्या दिसतात सगळे तत्कालीन सत्य कथेच्या अंकात व्यवस्थित आलेले दिसते माझा स्वतःचा सत्य कथेवर राग नक्की आहे पण तो कशासाठी आहे तर तो प्रतिमावादासाठी नाही तर प्रतिमा वादाच्या आहारी  जाऊन प्रतिमावाद नेमका कशासाठी आहे याचा सत्य कथेला पडलेला विसर त्यामुळे आहे प्रतिमा या नेहमीच जे अलौकिक आहे आणि जे साध्या सरळ प्रचितीच्या भाषेत मांडता येत नाही ते मांडता यावे म्हणून कलाकाराने शोधलेली युक्ती आहे इथे जीवनाशी नात तोडायचे नसते तर जीवनाशी असलेली नाळ अधिक भाषिक करता यावी म्हणून ती प्रतिमेच्या साह्याने मजबूत केली जाते दुर्दैवाने या मूलभूत गोष्टीचा सत्य कथेला विसर पडला आणि त्यातूनच मग प्रतिमा वादाच्या नावाखाली एक भोंगळपणा सर्वत्र अवतरायला लागला आणि मराठी साहित्यात कोंडी निर्माण झाली. एका अर्थाने प्रतिमा वादाचे रूपांतर एक प्रकारे आकृती वादात झाले आणि नुसती आकृती ही जीवनाशी जर का सांगड न घालता जीवनाशी नाळ न जुळवता प्रकटत राहिली तर ती फक्त ब्लॅक बोर्ड वरचा पोकळ चिन्ह उत्सव ठरते सत्यकथा असत्यकथा बनत गेली त्याचे सर्वात मोठे कारण प्रतिमा वादाचा जीवनाशी असलेला संबंध पूर्णपणे तुटणे होय

त्याचा एक परिणाम असाही झालेला दिसतो की प्रतिमावाद हा आधीच्या कवितांचे विश्लेषण करण्याचा एक मार्ग बनला उदाहरणार्थ बालकवी यांनी कधीही आयुष्यात प्रतिमावादी कविता लिहिलेली नव्हती कारण मुळात त्यांच्या काळात तो भारतात अवतरलेलाच नव्हता परंतु त्यांच्या औदुंबर या कवितेला प्रतिमावादी ठरवून तिचे विश्लेषण झाले आणि औदुंबर ही प्रतिमा नेमकी कोणत्या गोष्टीची प्रतिमा आहे याविषयी अनेक वाद झाले याला अपवाद कदाचित असले तर द ग गोडसे होते त्यांनी मात्र थेट तिला प्रथम पृथ्वीशी जुळवले आणि त्या कवितेचे भुमिनिष्ठ विश्लेषण केले

पाश्चात्य देशांमध्ये प्रतिमेचा विचार हाच व्यंजनेचा विचार आहे नंतर मग प्रतिक आले आणि अनेकदा प्लेटोला याचे श्रेय दिले जाते त्याने जी गुहेची प्रतिमा वापरली ती आजही प्रचंड फेमस आहे आणि पाश्चात्त्य देशात ते एक स्थिर प्रतीक बनल्याने गुहांच्यावर वारंवार कविता लिहिल्या जातात त्याला कारण प्लेटोची मांडणी आहे सर्वसाधारणपणे पाश्चात्त्य देशातील सर्व कवी हे प्लेटोकडे तर नाटककार हे अरिस्टॉटलकडे झुकताना दिसतात

प्रश्न असा आहे की एखादा नवीन वाद आला म्हणजे तो तसा स्वीकारावा का ? म्हणजे बालकवी यांना आपण  प्रतिमावादी कवी म्हणून बघावे का? कलावादाच्या नावाखाली अनेकदा प्रत्येक समीक्षकाचा हा वैयक्तिक प्रश्न म्हणून हा मुद्दा सोडून दिला जातो माझ्या मते याबाबत थोडा विवेक बाळगणे आवश्यक आहे बालकवी रोमँटिक कवी आहेत आणि औदुंबर ही रोमँटिक कविता आहे रोमँटिसीझममध्ये निसर्गावर कविता करण्याची इंग्लिश लोकांची फॅशनच होती. ही फॅशनच बालकवीनी गिरवली युरोपियन भाषांच्या मध्ये अनेक कवींनी अनेक वृक्षांच्या वर कविता लिहिल्या आहेत अनेकांनी फुलांच्या वर ही कविता लिहिलेल्या आहेत त्या काळामध्ये उदयाला आलेल्या पेंटिंगचाही हा परिणाम आहे विशेषता लँडस्केपचा ! बालकवींची औदुंबर ही कविता आपण बारकाईने पाहिली तर ती एक लॅंडस्केपच आहे एका अर्थाने शब्दांच्याद्वारे रेखाटलेले भूमिचित्र असे आपण म्हणू शकतो आपल्याकडे समीक्षकांनी हे सर्व भूमी चित्र अध्यात्मिकतेचे जंगल मानून मग त्या कवितेचे अलौकिक विश्लेषण सुरू केले आणि संपूर्ण कविता ढगात जायला लागली यातून समीक्षेविषयी प्रश्न निर्माण होतो की कविता ढगात नेणे हे समीक्षेचे कार्य आहे का? अर्थनिर्णयनाचा तुम्हाला अधिकार आहे पण हा अधिकार किती ताणवायचा याचा विचार झाला पाहिजे की नाही किमान पक्षी अशी जेव्हा ढगात जाणारे समीक्षक निर्माण होतात तेव्हा त्यांना जमिनीवर आणणारी जमिनी समीक्षा निर्माण करणे आवश्यक आहे की नाही ? माझ्या मते हो दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत आणि त्या घडल्या नाहीत की मग सारा खेळ आकाशात जायला लागतो आणि अमूर्त होत जातो अशी अमूर्तता जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती

बालकवींच्या कुठल्याही कवितेचा विचार करताना हे नेहमीच लक्षात घेणे आवश्यक आहे की त्यांना मुळात सौंदर्यवादाचा वारसा टिळकांच्या पासूनच मिळाला होता टिळक हे आद्य सौंदर्यवादी कवींच्यापैकी एक होते आणि हा सगळा वारसा त्यांना मुळात इंग्लिश मधून आलेला होता किंबहुना तत्कालीन इंग्लिश अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश होता एका अर्थाने हे लोक आपला अभ्यासक्रम मराठीत गिरवत बसले होते त्यांच्या अभ्यासक्रमातले हे इंग्लंड मधले सौंदर्यवादी कवी  निसर्गालाच ईश्वर मानत होते साहजिकच निसर्गाला सामोरे जाणे म्हणजे साक्षात ईश्वराला सामोरे जाणे होते आणि ते इथे घडलेले दिसते परलोकातला स्वर्ग हा प्रत्यक्ष निसर्गामध्ये शोधणे हा त्यामागचा उद्देश! हा अभ्यासक्रम  समजून न घेताच सौंदर्याचे विश्लेषण केले गेले की गोंधळ  व्हायला लागतो आणि तो झालेला आहे त्यामुळे जुन्या कवितांना नवीन अर्थ जरूर द्यावेत परंतु त्याचबरोबर ती कविता कशातून निर्माण झाली तेही पाहावे तिच्या निर्मितीचे  पार्श्व संगीत आणि भूमी काय आहे ते तपासावे उगाचच आत्ताच्या काळाचे नसलेले संदर्भ त्यांना लावू नयेत असे मला वाटते यासाठीच मी कवितेच्या अभ्यासासाठी ऐतिहासिक अभ्यास खूप गरजेचा आहे असे मानतो किंबहुना साहित्याच्या अभ्यासात ऐतिहासिक अभ्यास ही एक स्वतंत्र शाखा म्हणून विकसित करणे खूप आवश्यक आहे मी स्वतः गेली कित्येक वर्षे ईजम म्हणजे विचार प्रणाली शिकवतो आणि इतिहास मांडत मांडत कलांचे ऐतिहासिक पार्श्व निवेदन सादर करतो असे केले तरच कला तिच्या योग्य संदर्भात कळते आणि हे केले नाही की मग वर्तमानाचे नसलेले गैरलागू संदर्भ त्या कलेला लागू होतात त्यामुळे अनेकदा गैरसमज पसरतात. त्यातूनच मग नसलेल्या दंतकथा निर्माण व्हायला लागतात नसलेले विज्ञान निर्माण व्हायला लागते साहित्यकृती इतिहास बनतात हे टाळायचे असेल तर साहित्य कृतींची ऐतिहासिकता सतत जोखली गेली पाहिजे आणि ही ऐतिहासिकता जोखतांना साहित्यकृती या मुलत: काल्पनिक असतात हे बिंबवणे आवश्यक आहे असे झाले तरच नवीन पिढी नसलेले इतिहास नसलेले विज्ञान साहित्य कृतींच्या आणि कलाकृतींच्या मध्ये शोधणार नाहीत आणि काल्पनिकतेला काल्पनिक म्हणूनच पाहायला शिकतील आता तुम्ही विचाराल की असा काही स्वतंत्र अर्थ कोणी लावला तर त्यात एवढे वावगे काय आहे ? माझे म्हणणे इतकेच आहे की यदाकदाचित आपल्याला असे काही करावेसे वाटत असेल तर आपण निदान पक्षी हे वैज्ञानिक नाही असे तरी सांगणे आवश्यक आहे हे काल्पनिक आहे हेही सांगणे आवश्यक आहे सद्यस्थितीत तरी हे आवश्यक वाटते यदा कदाचित स्वतःला असा काही अर्थ लावायचा असेल तर तो अर्थ कवितेला अभिप्रेत असेलच किंवा कवीला अभिप्रेत असेलच असे नाही असे आधीच सांगावे 

अन्यथा अनेक गोष्टींच्या मध्ये विज्ञान सापडायला लागते इतिहास  सापडायला लागतो 

खरे तर प्रत्येक काळ तो तो काळ असतो त्या त्या काळाचे ते ते आकलन असते त्याला प्रथम समजून घेणे हे फार आवश्यक आहे वास्तव आणि कल्पना या दोन्हींची सांगड नीटपणे जी संस्कृती घालते तीच संस्कृती भरभराट करते अन्यथा वास्तववादी असलेले लोक संख्येने मूठभर असले तरी त्या कल्पनाजन्य वेगवेगळ्या ढगांच्या मध्ये  रममाण होणाऱ्या संस्कृतीला सहजरित्या पराभूत करतात हे पूर्वी झालेले आहे आणि ते आता पुन्हा रिपीट करायचे आहे का असा प्रश्न आपण विचारावा हे उत्तम! प्रतिमा वादाच्या नावाने दंतकथांचा उत्सव आणि कल्पनाजन्य इतिहासाचा उत्सव साजरा होणार असेल तर ते परवडणारे नाही म्हणूनच हे परखडपणे लिहिलेले आहे

श्रीधर तिळवे नाईक


**********************************




नवीन पिढीच्या कवींसाठी दोन शब्द श्रीधर तिळवे नाईक 

दिलीप चित्रेंशी चर्चा करतांना ते एक फार गहन मुद्दा उपस्थित करायचे तो म्हणजे मराठी आधुनिकता म्हणजे काय ? मी हा प्रोजेक्ट हाती घ्यावा अशी त्यांनी सूचना केली होती जी मला चौथी नवता विकसित करायची आहे म्हणून मी नाकारली पण आयुष्यभर त्यांच्या ह्या सूचनेने माझा पाठलाग केलाय मराठी आधुनिकतेची सुरवात ते तुकारामापासून करायचे जे मी ठामपणे नाकारायचो माझ्या मते तुकाराम हे मोक्षयुगाशी निगडीत होते आणि त्यांना विज्ञानाची ए बी सी डी ही माहीत न्हवती तुकारामांचा ग्रेटनेस हा होता कि ते धर्मयुगातून निसटले आणि बुद्धाप्रमाणे मोक्षयुगात दाखल झाले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर चक्रधर ह्या युगाचे नकुलीश लकुलीश कपिल असतील एकनाथ महावीर असतील तर तुकाराम गौतम बुद्ध आहेत आणि जो फरक आहे तो उपायाचा आहे म्हणजे नकुलीश ,लकुलीश ,कपिल ,महावीर ,बुद्ध हे जर योगोपायी ज्ञानोपायी ज्ञानकेंद्री असतील तर तुकाराम एकनाथ भक्तोपायी आहेत आणि साठोत्तरी ढसाळचा अपवाद वगळता अनेक कवी भक्तोपायी आहेत फक्त ढसाळच ज्ञानोपायी आहेत मराठीचे मोक्षयुग ह्या लोकांच्यामुळे बहरले आणि त्यांनी मार्गी मोक्षयुगाचा प्रोजेक्ट मराठीत आणून देशी मोक्षयुग निर्माण केले मराठी आधुनिकतेची चर्चा करायची असेल तर मराठी मोक्षतेची आणि अध्यात्मिकतेची चर्चा आपणास खोलात जाऊन करावी लागेल मराठी लोकांची ह्याबाबत तयारी आहे का ? मराठीचे प्राचीन युग हे अष्मक मूलक सातवहान वाकाटक चालुक्य ह्यांच्यामुळे दमदार होते गाहसतसई ते बृहत्कथा नकुलीश , हाल , गुणाढ्य , कालिदास , कैलास मंदिर , वररुची असे एकापेक्षा एक सरस उद्योग आपण करून बसलोय त्यांची तुलना मोक्षयुगाशी केली तर काय दिसते मलिक अंबर ,शिवाजी , पहिला बाजीराव ह्यांचा ग्रेटनेस मान्यच आहे पण व्यापारवाढीसाठी आवश्यक ती यंत्रणा आपण निर्माण केली नाही असेच दिसते म्हणजे देशी भाषेत अध्यात्म निर्माण झाले राजवट निर्माण झाली पण व्यापारी यंत्रणा निर्माण झाली नाही 

त्यानंतर प्रबोधनाचा मराठी प्रोजेक्टही सामाजिक पातळीवर बरा चालला पण विज्ञानाच्या पातळीवर आपण ढ निघाल्याने हा प्रोजेक्ट फाफललेला आहे इथेही लोकहितवादी , रानडे , ह्यांच्या मार्गी प्रबोधनाविरुद्ध फुले ह्यांचे देशी प्रबोधन उभे ठाकले व पुढे केशवसुत सावरकर गडकरी ह्यांच्या मार्गी रोमँटिसिझमविरुद्ध पुढे पु शी रेगे ,ना घ देशपांडे , बहिणाबाई चौधरी ह्यांचा अस्सल देशी मराठी रोमँटिसिझम येतोच म्हणजेच देशी मराठी मोक्षता देशी मराठी प्रबोधनता आपल्याला सापडते पण आपण त्याचे विश्लेषण करतो का उदाहरणार्थ निवृत्तीनाथ हे योगी होते तरीही योगोपायावर अस्सल मराठी म्हणावा असा ग्रंथ यायला विसावे शतक उजाडते आपले मराठी ब्राम्हण लोक इतके भंपक आहेत कि त्यांना आजही राजयोग म्हंटले विवेकानंद आठवतात वास्तविक कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांचे भारतीय मानसशास्त्र हे पुस्तक अधिक सटीक आहे 

मोक्षयुगातील भक्तोपाय प्रबोधनयुगात ज्ञानकेंद्री झाला ते उत्तमच झाले पण तो पुरेसा ज्ञानकेंद्री झाला नाही मोक्षतेत ह्या काळात कर्मयोगी गाडगे महाराजांच्याबरोबर ज्ञानयोगी राजयोगी निसर्गदत्त महाराजांचे केंद्रस्थानी येणे व्हायला हवे होते पण तसे झाले नाही केंद्रस्थानी कोण आलं तर साईबाबा ! वास्तविक दोघेही मोक्ष मिळालेले पण एक ज्ञानयोगी होता तर दुसरा राजयोगी तरीही सईबाबान्च्याबरोबर राजयोग वाढला नाही तर भक्तियोग वाढला ही मानसिकता काय आहे ? कि निसर्गदत्त महाराज ब्राम्हण असल्याने साईडलाईन केले गेले ? कि त्यांनी तथाकथित चमत्कार केले नाही म्हणून ते लायकीचे वाटले नाहीत ? मोक्षयुगात महाराष्ट्रात अनेक ज्ञानोपायी झाले पण त्यांचे ज्ञान संकलित केलेच गेले नाही फक्त वैष्णव भक्त असलेले संत अभंगगाथेतून सतत उपलब्ध होतील ह्याची काळजी घेतली गेली असे का ? वारकरी संप्रदायाची ही दादागिरी आहे कि त्यांनी आपले काम चोख बजावले आणि बाकीच्यांनी आपल्या संप्रदायाचे काम चोख बजावले नाही म्हणून हे घडले ? मराठी संस्कृती वारकऱ्यांच्यामुळे अचानक वैष्णवकेंद्री व भक्तिकेंद्री बनल्याने आज मराठी संस्कृतीची वाट लागली आहे पण लक्ष्यात कोण घेतो आपली चॅनेल्स व मीडियाही वैष्णव आहे ह्याला शह देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्ञानकेंद्री बौद्ध परंपरा महाराष्ट्रात पुन्हा आणली पण तिचा म्हणावा तसा परिणाम झालेला दिसत नाही बाबासाहेबांनी प्रबोधनाचे पोटी अंग विस्तारले आणि व्यापक करण्याचा प्रयत्नही केला पण आज आंबेडकरही फ्लॉप होतात कि काय अशी शंका येते आहे 

ह्यानंतरचा प्रोजेक्ट आधुनिकतेचा आहे आणि त्याचा पहिला टप्पा मार्गी आहे जो मर्ढेकरांनी सुरु केला तर दुसरा देशी नवतेचा आहे जो नेमाडे चित्रे कोलटकरांनी सुरु केला ह्यातील मार्गीचा म्हणजे आंतर्राष्ट्रीय आधुनिकतेचा नीट मागोवा आपण घेतला का ? आधुनिकतेचे मुख्य आरंभिक तत्वज्ञान अस्तित्ववाद ! आधुनिकतावादी अस्तित्ववाद तत्वज्ञान किर्केगार्दपासून सुरु होतो तर उत्तरवादी उत्तर-अस्तित्ववादी तत्वज्ञान फ्रेडरिक नित्शेपासून सुरु होते मराठीत ह्यांचे साधे अनुवाद तरी झाले का ? राजवाड्यांनी नित्शेचा एक अनुवाद केला तेवढाच पण पुढे काय ? मराठीत अस्तित्ववादी म्हणावे असे लेखन फक्त सदानंद रेगे , किरण नगरकर , विश्वास पाटील (नवे क्षितिज वाले )विलास सारंगांनी केलेले दिसते चित्रे कोलटकर नेमाडे (कोसला )सुरवातीला अस्तित्ववादी होते पण नंतर देशीवादी झाले आता ही जी स्थलांतरता आहे ती आंतरराष्ट्रीय आधुनिकतेकडून मराठी आधुनिकतेकडे आहे असे जर आपण मानले तर ही देशी आधुनिकता मराठी आधुनिकता किस चिडियाका नाम है भाई ? दुसरे आरंभिक तत्वज्ञान रचनावाद ज्याची सुरवात संरचनावादाने होते आणि मध्य उत्तरसंरचनावादाने तर शेवट उत्तरवादी तत्त्वज्ञानाने ज्यात उत्तरआधुनिकवाद , उत्तरवसाहतवाद , देशीवाद वैग्रे सर्व तत्वज्ञाने येतात 

फेसबुकवरची आत्ताची जी पिढी आहे त्यातील ५० टक्के लेखक रोमँटिक ४० टक्के प्रबोधनवादी आहेत ५ टक्के आधुनिक आणि ४ टक्के देशीवादी व १ टक्का चौथ्या नवतेचे आहेत प्रश्न असा आहे कि जे रोमँटिक आहेत त्यांना तरी रोमँटिसिझम कळलाय का ? किशोर कदम चंद्रशेखर सानेकरपासून प्रिया जामकरपर्यंत अनेकांचा पिंड रोमँटिक आहे त्यामुळे त्यांच्या कवितेत रोमँटिसिझम ताकद बनून येतो पण अनेकांचा तसा तो पिंडच नाही हे लोक फिल्मी आणि कमअस्सल लिहितात बहुतेकांचा रोमँटिसिझम हा ना धो महानोर पु शी रेगे ग्रेस ह्यांच्याप्रमाणे देशी आहे हे त्यातल्या त्यात चांगले आहे हीच अवस्था प्रबोधनवादाची आहे फार कमी कविंना प्रबोधनाची व परिवर्तनाची आंतरिक तळमळ आहे अनेकजण आंबेडकरांच्या पोटी परंपरेत लिहितात पण तळमळ वर्तमानपत्री सपाट आहे अनेक मार्क्सवादी कवीही पोरकट लिहितायत हे लोक पाश , ढसाळ वा मायकोव्हस्कीचे नाव का घेतात असाच प्रश्न पडतो पाश तुमच्या वॉलवरून दिसून काय फायदा ? तो तुमच्या कवितेतून दिसला पाहिजे आणि तुम्ही ग्रेट कार्यकर्ते असाल तर ते ग्रेट कार्यकर्तेपण तुमच्या कवितेत दिसलं पाहिजे नाहीतर "पाश नही लाश" म्हणायची पाळी येते 

आधुनिक व देशी कवितेत सर्वात उत्तम लेखन चालू आहे उदा चं प्र देशपांडें ते ठामपणे देशीवाद नाकारतायत आणि अस्तिववादी ऍब्सर्डिस्ट लिहीतायत खरेतर ही शैली जगत्मान्य आहे तरीही फार कमी मराठी लोक त्यात आहेत नामदेव कोळींच्यापासून अनेकजण देशीवादी आहेत आणि त्याचे कारण त्यांच्या अस्तित्वाची मुळे आजही गावात टिकून आहेत म्हणजे औदुंबर मुंबईत आहेत आणि ते पाय मात्र नदीत टाकून बसले आहेत 

ह्यां सर्वांच्यात वाद आहेत का तर मला माहीत नाही पण एक गोष्ट नक्की वाद व्हायला पाठीचे कणे ताठ असावे लागतात सरसकट सगळ्याला चांगलं म्हणणारे लोक फालतू असतात असं माझं मत आहे ज्याला नेमाडे लेखकाची नैतिकता आणि जिला मी लेखकाची अध्यात्मिकता म्हणतो ती ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट अशा लोकांच्याकडे नसते 

आणि ह्यापुढचा जो चिन्हसृष्टीयतेचा प्रोजेक्ट आहे जो सौष्ठवमधून चालू झाला अभिधा अभिधानानंतर शब्दवेध मधून विस्तारित झाला त्याविषयी ! तो समजा आंतरराष्ट्रीय मार्गी जालीय नवतेचा आहे असे आपण गृहीत धरले तर त्याचे तरी विश्लेषण आपण नीट करणार आहोत का ? गोष्टी मोडीत काढल्याचं पाहिजेत पण त्यासाठी त्या आधी समजून तर घेतल्याचं पाहिजेत आणि समजा तुम्हाला मार्गी विरुद्ध देशी विरुद्ध पोटी असा संघर्ष पुढे चालवायचा असेल तर देशी/ मराठी जालीयता म्हणजे काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि मराठी जालीयता सांगायची असेल तर मराठी आधुनिकतेचा प्रश्न उभा ठाकतोच आणि अधिक खोलात गेलात तर मराठी मोक्षतेचा मराठी प्रबोधनतेचाही ! मी चौथी नवता मांडतांना सांगोपांग विचार करूनच मांडली होती अभ्यास न करता नवता सांगोपांग मांडता येणे शक्य नसते पाचवी नवता यावी असं मलाही वाटतं पण केशवसुतांच्या रोमँटिक नवतेप्रमाणे उथळ आणि उठवळ होऊन तिने येऊ नये थोडे खोलात जावे 

श्रीधर तिळवे नाईक

अलविदा रीडर्स डायजेस्ट श्रीधर तिळवे नाईक 

रीडर्स डायजेस्ट ब्रिटनमध्ये बंद होणे ही एक दुःखदायक पण अपरिहार्य घटना आहे सारंग दर्शनेंनी ह्यावर उत्तम लेख लिहिला आहे 

माझा रीडर्स डायजेस्टशी असलेला संबंध लहानपणापासून आहे आमच्या दुकानातले एक गिर्हाईक हा अंक विकत घेई व दर सहा महिन्यांनी सगळे अंक रद्दीत आम्हाला देई ह्याचा कागद सुरवातीला मला आवडे कारण पन्नास ग्रॅमपर्यंतचा पदार्थ बांधायला तो फार उपयुक्त असे इंग्लिश कळत नसल्याने दुसरी उपयुक्तता कळत न्हवती ह्याच्या कागदाची पुदी फार भक्कम बने आणि घडी दुमडायला हा कागद फार सोयीचा पडे 

पुढे इंग्लिश यायला लागल्यावर वाचन सुरु झाले ख्रिश्चन उदारमतवादाचा भक्कम पाया ह्या डायजेस्टला होता हा उदारमतवाद दिसायला सोज्वळ असला तरी ख्रिश्चनिटीला भक्कम करत असे गोव्यात ख्रिश्चन कसे काम करतात हे पाहिल्याने रीडर्सचा कम्युनिझमविरोध मला तापदायक वाटला नाही अमेरिकन नैतिक चाड असलेल्या मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व भारतीय मध्यमवर्गाला विलोभनीय वाटणे अटळच ! मात्र १९९०नंतर भारतीय मध्यमवर्गाने वाचनाकडे लक्ष्य द्यायला तर मराठी मध्यमवर्गाने दुर्लक्ष करायला सुरवात केली त्याचा फटका रीडर्स डायजेस्टला पडला असावा माझे लक्ष्य आता अधिक सखोल झाल्याने रीडर्स डायजेस्ट मला उथळ वाटायला लागले आणि मी ते वाचणे बंद केले 

मुळात ब्रिटनमध्ये ५२ टक्के लोक नास्तिक झालेत आणि हेच लोक प्रामुख्याने मध्यमवर्गीय वाचक असल्याने रीडर्स डायजेस्टची लोकप्रियता ओहोटीला लागणे अटळच होते शिवाय गेल्या काही वर्षात टोकाचा उजवेपणा दोन बाजूंनी वाढतो आहे १ टोकाचा धार्मिक उजवेपणा २ टोकाचा आर्थिक उजवेपणा ह्या दोन्ही उजव्यान्नी कम्युनिझमला उखडले त्यामुळे एका अर्थाने कम्युनिझमला उखडून टाकणे हे रीडर्स डायजेस्टचे ध्येय पूर्ण झाले आहे एका अर्थाने रीडर्स डायजेस्टचे अवतारकार्य १९९० लाच संपले आहे आणखी काही वर्षांनी अमेरिकन आवृत्ती बंद पडली तर मला आश्चर्य वाटणार नाही भारतात इंग्रजीचे सशक्तीकरणाला रीडर्स डायजेस्ट फार उपयुक्त मानले जाई तोही रोल आता संपला आहे आमच्या पिढीत कम्प्युटरमुळे क्वीन्स इंग्लिश संपून अमेरिकन इंग्लिश रुळली त्याचाही फटका रीडर्स डायजेस्टला पडणे अटळ !

रीडर्स डायजेस्टचा अस्त हा एका अर्थाने ख्रिश्चन उदारमतवादाचा अस्त आहे अलविदा ब्रिटिश रीडर्स डायजेस्ट !

श्रीधर तिळवे नाईक  

************************************************************


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना