चौथी नवता आणि रामायण श्रीधर तिळवे नाईक 


कुठलीही जूनता व उत्तरता ही नवतेला भूतकाळाकडे घेऊन जाते उत्तराधुनिक भारतात हे घडले त्यातून एकीकडे राममंदीर आंदोलन जन्मले व रामानंद सागर ह्यांचे रामायण ! ह्यातून एक रामलहर जन्मली व आज तिचे पर्यवसान प्रत्यक्ष राम मंदिरात झाले आहे 


ह्यानिमित्त शंकराचार्य विरुद्ध मोदी असा जो वाद झाला तो लक्षणीय होता 


आद्य शंकराचार्यांनी पाचव्या शतकात झालेल्या अवस्था तंत्राच्या आचार्य शंकर ह्यांनी दिलेल्या १ शिव २ शक्ती ३ गणपती ४ कार्तिकेय व ५ सूर्य ह्या शैव पंचायनात बदल घडवून १ शिव २ शक्ती ३ गणपती ४ कार्तिकेय व ५ विष्णू असे नवे हिंदू पंचायतन देऊन हिंदू धर्माची स्थापना केली शैव व वैष्णव ह्यांच्यात सुरु झालेले वाद मिटावेत म्हणून त्यांनी हे केलं पण हे करताना इहलोकाविषयी ते उदासीन असल्याने त्यांनी वेदप्रामाण्य व स्मृतीप्रमाण्य स्वीकारले जी घोडचूक होती मात्र मोक्षाचा अधिकार सर्वांना दिला 


ब्राम्हण धर्म व वैदिक श्रद्धा हे यज्ञ केंद्री होते वैष्णवांनी शैवांची पूजापद्धती स्वीकारली मात्र देव वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे यूरेशियनच ठेवले कुठलीही मूर्ती बनल्यानंतर तिच्यात प्राणप्रतिष्ठा करणे हा शैव विधी ! ह्याचा उगम भावतंत्रात होता म्हणजे भाविकाने इष्ट ईश्वररूप निवडावे म्हणजे शिवलिंग , शक्तिलिंग , कोपेश्वर , काशिनाथ त्र्यंबकेश्वर अंबाबाई भवानी वैग्रे आणि मग त्या इष्टदेवतेची मूर्ती स्वतः बनवावी किंवा बनवून घ्यावी मग तिच्यापुढे सत्य ,अहिंसा ,सुकाम , अल्पभोग (संपूर्ण अपरिग्रह शक्य नाही असे शैव मानतात ) अचोर्य ,सदकार्य , क्षणभंगुरस्वीकार , सर्वकरुणा , सर्वकल्याण , निर्व्यसनीपणा व स्वच्छता , लोकपराङ्मुखता , निरहंकार ही द्वादश अंगे पाळण्याची प्राणप्रतिज्ञा करावी म्हणजे प्राण गेला तरी मी ही अंगे पाळेन अशी प्रतिज्ञा करावी मग प्राणायामाने आपला प्राण त्या मूर्तीत स्थापन करावा आणि त्या देवतेला मी माझे प्राण तुझ्यात प्रतिष्ठित म्हणजे विलीन करू इच्छितो असे सांगावे प्राणप्रतिज्ञा व प्राणप्रतिष्ठा ह्यांनी भावतंत्राचा प्राणायाम संपूर्ण होतो आणि हा प्राणायाम विधी भाविकाने करायचा आहे पुरोहिताने नाही शैव पुरोहिताने म्हणजे गुरव जंगम किंवा शैव ब्राम्हण ह्यांनी त्याला फक्त मार्गदर्शन व मदत करायची आहे मध्यस्थ म्हणून काम करायचे नाहीये पूर्वी सर्व शैव पुरोहितांना महाराष्ट्रात गुरवांना व शैव ब्राम्हणांना मूर्तिकाम येणे आवश्यक होते माझ्या स्वतःच्या घरात अगदी परवा परवा पर्यंत सर्वांना मूर्तिकला येत होती माझे वडील तर ह्यात मास्टर होते आजसुद्धा गुरव समाजात गणपतीची मूर्ती स्वतः बनवणारे अनेकजण आहेत असो 


प्राणायामानंतर रोज मूर्तीपुढे बसून आपण मूर्ती झालो आहोत अशी धारणा करावी सुरवातीला त्यासाठी मूर्तीशी एकरूप होणे आवश्यक आहे एकरूपता आणि उन्माद ह्यांच्यात फरक आहे उन्माद एकरूपतेला हानिकारक आहे भावतंत्रात ध्यान म्हणजे दया क्षमा शांती ह्या त्रिभावांचे अंतःकरणात अवतरण होणे व भाविक स्वतःच मूर्तिमंत दया ,क्षमा , शांती बनणे . प्राणप्रतिष्ठेचा व प्राणप्रतिज्ञेचा मुख्य उद्देश हा भाविकाने किमान ध्यानापर्यंत पोहचणे म्हणजे मूर्तिमंत दया क्षमा शांती होणे हा आहे 


भावतंत्रातला प्राणायाम वैष्णवांनी स्वीकारला पण त्यातील प्राणप्रतिज्ञा काढून टाकली प्राणप्रतिष्ठा भक्ताकडून काढून घेतली व ती ब्राम्हणांनी स्वतःकडे घेतली मात्र प्राणप्रतिष्ठा स्वीकारताना नावही तसेच ठेवले खरंतर वैष्णवांनी आत्माप्रतिष्ठा असं नाव दिलं असतं तर ते त्यांच्या धर्माला शोभून दिसलं असतं कारण अमर आत्म्यावर त्यांचा विश्वास आहे पण त्यांनी हे केलेलं नाही शैवांच्यात प्राणप्रतिष्ठेचा अधिकार सर्व व्यक्तींना असतो अगदी मुस्लिम किंवा ख्रिश्चनसुद्धा प्राणप्रतिष्ठा करू शकतात वैष्णवांनी गीतेनुसार हा अधिकार फक्त पुण्ययोनींना म्हणजे ब्राम्हण व क्षत्रियांना दिला वैश्य व शूद्र हे पापयोनी व अस्पृश्य व आदिवासी हे अयोनिज असल्याने ह्या चौघांनाही हा अधिकार नाकारण्यात आला इतकेच न्हवे तर यजमान बनण्याचा अधिकारही नाकारण्यात आला मात्र मोक्षाचा अधिकार सर्वांना देण्यात आला विशेषतः भक्ती करून मोक्ष मिळवणे वैष्णव संतांनी ह्याविरोधात भक्ती चळवळ उभी केली 


आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन करतांना हा अधिकार ब्राह्मणांना दिला मात्र यजमान बनण्याचा अधिकार ब्राम्हण , क्षत्रिय व वैश्य ह्यांना दिला व शूद्र अतिशूद्र व आदिवासी ह्यांना नाकारला त्यामुळेच हिंदू धर्मानुसार मोदी हे वैश्य असल्याने त्यांच्या यजमान बनण्याबद्दल कुणीही कसलाही आक्षेप घेतलेला नाही काहींनी अस्तित्वात नसलेला वाद निर्माण केलाय म्हणून सांगतोय 


 आद्य शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेचा जो विधी सांगितला त्यानुसार जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोवर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू नये असा आहे कारण शंकराचार्यांच्या काळात अनेक मंदिरे अर्धवट बांधून सोडून देण्यात आली होती त्यांचे अवशेष आजही आहेत साहजिकच आत्ताच्या शंकराचार्यांनी ह्या मुद्द्यावरून विरोध केलाय मी युरेशियन नाही पण असतो तरी मी मोदींच्या बाजूने असतो कारण ज्या कारणासाठी हे बंधन आद्य शंकराचार्यांनी घातले होते ते इथे लागू नाही कारण मंदिर शंभर टक्के बांधून पूर्ण होणार हे स्पष्टच दिसतंय 


वैष्णव व हिंदूंचे प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना देणे हे मला कधीही पटलेले नाही पण वैष्णव व हिंदू धर्मियांचा घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य म्हणून मी हा मुद्दा तात्पुरता सोडतो शैवांनी मात्र प्राणप्रतिष्ठा करण्याचा व यजमान बनण्याचा अधिकार सर्वांनाच आहे हे लक्ष्यात ठेवावे 


अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असताना रामायणाची सध्या जोरदार चर्चा आहे ही चर्चा करताना धर्माची चर्चा अटळ होती व आहे मात्र ही करताना सध्या ज्या रामाच्या मूर्तीची चर्चा होत आहे तिचा धर्म हिंदू आहे आणि हिंदुत्ववादी तिची प्राणप्रतिष्ठा करत आहेत ह्याचा काहीसा विसर अनेकांना पडला आहे 


ह्या देशात आशियायी तंत्र श्रुती आहे आणि शैवांच्या प्रत्येक दर्शनाच्या रामकथा आहेत पण त्यांचा आणि ह्या श्रीरामाचा काडीचाही संबंध नाही हा शैव राम पूर्ण वेगळा आहे त्याचे स्वरूप त्रिस्तरीय आहे 


१ तो व्यक्तिरूप शिवभक्त आहे रामाचे सूर्यवंशी घराणे शैव असून त्या घराण्याची कुलदेवता ही काली आहे आणि अयोध्येत त्यामुळेच देवकालीची दोन मंदिरे आहेत रामायण ही सूर्यवंशी घराण्याची कथा आहे आणि रामांची कथा त्याच्यातून जन्मते त्याला जटायू वैग्रे मार्ग दाखवत नाहीत तर यमाई , मऋत वैग्रे शैव देवता व देव मार्गदर्शन करतात मऋताच्या आदेशावरूनच मरूत गणाचा प्रमुख मारुती रामाला मदत करतो तो रामाचा भक्त नसून मार्गदर्शक आहे 


२ तो शैव तत्वरूप आहे शैवांच्यात सूर्य चंद्र पृथ्वी शिवलिंग आहेत राम ह्या शिवलिंगरुपी सूर्याचे पहाटेचे रूप आहे ज्याला राम प्रहर म्हणतात इथे राम व्यक्ती नाही तो तत्व आहे सूर्यतत्व आहे सूर्याचा प्रकार आहे 


३ तो शैव ईश्वररूप आहे भगवान शंकरांनी पंचायतन दिले आहे १ शिव २ शक्ती ३ संसार ४ संसाराचा महाप्राण म्हणजे ईश्वर व ५ मोक्ष व मोक्षाकडे जाण्याची ११४ तंत्रे इथे राम ईश्वराचे रूप आहे काळाराम वैग्रे मंदिरे ही मूळरूपात शैव ईश्वररूपाची मंदिरे होती 


ह्या देशात युरेशियन श्रुती आहे आणि तिच्यातील असुर व सूर अशा दोन्ही प्रवाहात रामकथा आहेत असुरांच्यातील जैन रामकथा व बौद्ध रामकथा आहेत त्यांचाही ह्या श्रीरामाशी काडीचाही संबंध नाही मात्र ह्या श्रुतीत्त जो सूर प्रवाह आहे त्याचा मात्र ह्या श्रीरामाशी घनिष्ठ संबंध आहे आणि त्या संदर्भातच चर्चा व्हायला हवी शेवटी हे मंदिर हा प्रवाह निर्माण करतो आहे आणि घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर ठेवून ह्या प्रवाहाची चर्चा करायला हवी 


सर्वात पहिला सूर प्रवाहाचा आद्य अविष्कार हा वैदिक श्रद्धा आहे श्रीराम हे ह्या वैदिक श्रद्धेनुसार यज्ञ संस्था करणारे राजन्य म्हणजे राजे आहेत आणि ते यज्ञ संस्थेवर हल्ला चढवणाऱ्या शैव राक्षसांच्या विरोधात युद्ध करून यज्ञ संस्था स्थापन करतायत तिचा विस्तार करतायत मी नेहमीच मांडत आलोय कि आदी वैदिक श्रद्धेत वर्णजातिव्यवस्था नाही ती दहाव्या मंडलद्वारा घुसवण्यात आलेली आहे हे वेद ब्राम्हणांनी नाही तर ऋषींनी रचलेले आहेत आणि हे ऋषी सर्व समाजातून आले आहेत त्यामुळं माझं भांडण खऱ्या अस्सल वैदिकांशी नाही वैदिकांनी ब्राम्हण वा स्मृती ग्रंथ निर्माण केलेले नाहीत ते ग्रंथ ब्राह्मण्य पाळणाऱ्या पुरोहित लोकांनी निर्माण केलेले आहेत आणि त्यातूनच ब्राह्मणधर्म निर्माण झालेला आहे मूर्तिपूजा मूळ वैदिक श्रद्धेत नाही 


ह्या सूर प्रवाहातील ब्राम्हण धर्मानुसार श्रीराम हे फक्त यज्ञ संस्थेचे क्षत्रिय रक्षक नसून ते याज्ञवल्क्य , मनू आदी स्मृतींचे वर्णजातिव्यवस्थेचेही रक्षणकर्ते आहेत म्हणूनच ते शूद्र असलेल्या शंबुकाचा वध करतात 


ह्या सूर प्रवाहातील वैष्णव धर्मानुसार श्रीराम हे वैदिक सूर्यदेवता विष्णू हिचे अवतार आहेत हे फक्त यज्ञ संस्थेचे क्षत्रिय रक्षक नसून ते वर्णजातिव्यवस्थेचेही रक्षणकर्ते आहेत म्हणूनच ते शूद्र असलेल्या शंबुकाचा वध करतात वैष्णव धर्मानुसार रामायण व महाभारत ही केवळ महाकाव्ये नसून ती वैष्णव धर्माच्या स्मृती आहेत वैष्णवांनी कसं वागायचं हे ह्या स्मृतीनुसार ठरतं ह्या दोन्ही स्मृती जन्मदत्त वर्णजातिव्यवस्था स्वीकारतात म्हणून वैष्णव जन्मदत्त वर्णजातिव्यवस्था स्वीकारतात वारकरी वैष्णव आहेत म्हणून तेही जन्मदत्त वर्णजातिव्यवस्था स्वीकारतात व आंतरजातीय आंतरवर्णीय विवाहाला त्यांचा विरोध आहे ते अस्पृश्यताही पाळत होते काही अजूनही पाळतात त्यामुळेच विठ्ठल मंदिरात साने गुरुजींनी आंदोलन करेतोवर अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश न्हवता कारण अस्पृश्यता वर्णजातिव्यवस्थेचे शेवटचे टोक आहे जे वैष्णवांना मान्य आहे 


रामायण व महाभारत ह्या वैष्णव स्मृती दोन धर्म सांगतात 


१ वैयक्तिक धर्म इथे कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांशी कसं वागावं हे सांगितलं जातं रामायणाचा भर हा वैयक्तिक धर्मावर अधिक आहे तर महाभारताचा व त्यातील गीतेचा भर सार्वजनिक धर्मावर आहे रामाचे जे अपिलिंग आहे ते त्याच्या वैयक्तिक वर्तनामुळं ! एकतर तो राजा असूनही पूर्ण कौटुंबिक पुरुष आहे तो आपल्या वाडवडिलांच्या आदर ठेवतो आणि त्याचे भाऊही त्याचा आदर ठेवतात भावांनी एकमेकांशी कसं वागू नये ह्याचा नमुना महाभारतात तर कसं वागावं ह्याचा चांगला नमुना रामायणात दिसतो केवळ वडिलांनी दिलेले वचन तुटू नये म्हणून व वडिलांची कौटुंबिक स्थिती त्या स्थितीत झालेली कुचंबणा लक्ष्यात घेऊन त्याचा राज्यावर असलेला अधिकार सोडतो आणि वनवास पत्करतो एका अर्थाने तो आदर्श पुत्र आहे 


तो केवळ राजपुत्र नाही तर त्याच्या काळातला सर्वश्रेष्ठ एकबाणी धनुर्धारी आहे बळाचा प्रयोग करून तो आरामात भरताला व दशरथाला हरवू शकतो पण ते न करता तो वनवास पत्करतो सर्वोत्कृष्ट धनुर्धर असूनही तो विनम्र आहे त्याचे बोलणे सॉफ्ट मृदू आहे वागणे मर्यादाशील आहे त्याच्या हृदयात प्रेम आहे आणि माणसांना ह्या प्रेमाने जिंकण्यावर त्याचा विश्वास आहे त्याला सत्तेचा मोह नाही त्यामुळेच लंका जिंकूनही तो ते राज्य स्वतःजवळ ठेवत नाही तर बिभीषणाला देतो त्याची लढाई कौटुंबिक होती हे इथे स्पष्ट आहे बायको परत मिळताच तो लंका सोडतो ह्याचा अर्थ त्याचे युद्ध बायकोसाठीच होते हे स्पष्ट आहे कुठल्याही स्त्रीला तिच्यासाठी प्राण पणाला लावून युद्ध करणारा पुरुष आवडण्याची शक्यता ९० टक्के असते 


साहजिकच राम हा लोकप्रिय आहे कारण कुटुंबात कसं वागायचं ह्याचा तो आदर्श आहे 


२ सार्वजनिक धर्म : रामायणातल्या वैयक्तिक धर्माबाबत फारसे वादविवाद नाहीत वादविवाद आहेत ते श्री रामांच्या त्यांनी स्वीकारलेल्या धर्मावरून ! रामाने यज्ञसंस्था स्वीकारली आहे आणि वर्णजातिव्यवस्थाही ! केवळ लोक काय बोलतील म्हणून त्याने सीतेला एकदा अग्निपरीक्षा द्यायला लावली आहे तर दुसऱ्यांदा लोक काय बोलतायत ते ऐकून तिला पुन्हा वनवासात धाडले आहे भारतात कुटुंबांच्यावर नेहमीच लोक काय बोलतील व लोक काय बोलतायत ह्या दोन गोष्टींचे प्रेशर असते रामाबाबत हे सामाजिक प्रेशर शिगेला पोहचलेले दिसते सर्वसाधारण संसारात अशी बाहेरची प्रेशर्स अनेकदा ऍक्टिव्ह असतात साहजिकच चांगले नवरा बायको रामायणाशी रिलेट होतात कारण त्यांनीही हे सामाजिक प्रेशर एकत्रच झेललेलं असतं 


दुसरी गोष्ट त्याचे युरेशियन धर्माशिवाय जे इतर धर्मांचे लोक आहेत त्यांच्याविषयीचे धोरण कमालीचे वेगळे आहे आजच्या भाषेत सांगायचे तर श्रीराम सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत त्यामुळे ते शबरीच्या आदिवासी धर्माचा व हनुमान सुग्रीवाच्या शैव धर्माचा आदर ठेवतात 


रामायणाचा खरा प्रॉब्लेम राजकारणापासून सुरु होतो रामायणातील साऊथ इंडिया ही दक्षिणपथापासून सुरु होते व महाराष्ट्र दक्षिणेत येतो साहजिकच दक्षिणेतील रामाला मदत करणारे लोक वानर आहेत तर विरोध करणारे राक्षस ! अगदी काहीवेळा हे राक्षस नरभक्षक म्हणून दाखवलेआहेत ही वाल्मिकींची आकलनशक्ती आहे कि दक्षिणेच्या लोकांना कमी लेखण्याची वृत्ती आहे ? माझ्या मते रामायणकाळात म्हणजे ज्या काळात रामायण लिहिले गेले त्या काळात युरेशियन लोकांच्या दक्षिण भारताविषयी फार विचित्र समजुती होत्या त्याचे स्पष्ट प्रतिबिंब आपणाला रामायणात दिसते ह्या काळात युरेशियन लोकांनी प्रत्यक्ष दक्षिण पाहिलीच न्हवती त्यामुळं युरेशियन नॉर्थ इंडियन अहंकार रामायणात पदोपदी आढळतो त्यामुळे रामही ह्याच अहंकारात वावरताना दिसतो वालीला मारताना तो वाली हा वानर आहे व मी मनुष्य असल्याने वानराची ते निःशस्त्र असताना शिकार करण्याचा मला अधिकार आहे असा तर्क तो देतो जो विलक्षण आक्षेपार्ह आहे शंबुकाची शूद्र म्हणून केलेली हत्या हीही अशी आक्षेपार्ह आहे 


त्यामुळं वैयक्तिक राम व सार्वजनिक जीवनातील राम असे दोन राम खुद्द रामाच्या व्यक्तिरेखेतच आहेत एक स्वाभाविक चांगला आहे तर दुसरा धर्माने नियंत्रित आक्षेपार्ह ! वैष्णव धर्मातला परस्परविरोध रामायणात व रामात शिगोशीग भरलेला आहे 


युरेशियन सूर प्रवाहातील हिंदू राम हा वरील तिन्ही धर्मांचे एकत्रीकरण आहे आणि आजचे वाल्मिकी रामायण हे हिंदू धर्माचे रामायण आहे आणि अयोध्येतील राम मंदिरात ह्या हिंदुधर्मीय वा सनातनधर्मीय रामाचीच प्रतिष्ठापना होत आहे   


 हिंदुधर्मीय श्रीराम हे यज्ञ व पूजा दोन्ही स्वीकारतात ते लिंगस्थापना करतात ते विष्णूचे अवतार आहेत 


ते यज्ञ संस्थेवर हल्ला चढवणाऱ्या राक्षसांच्या विरोधात युद्ध करून यज्ञ संस्था स्थापन करतायत तिचा विस्तार करतायत


ते याज्ञवल्क्य , मनू आदी स्मृतींचे वर्णजातिव्यवस्थेचेही रक्षणकर्ते आहेत म्हणूनच ते शूद्र असलेल्या शंबुकाचा वध करतात 


ते वैष्णवधर्मी वैयक्तिक व सार्वजनिक सामाजिक धर्म पाळतायत 

त्यांचा मोक्षावर विश्वास आहे 


रामलल्लाची जी मूर्ती आहे ती हिंदू मूर्ती आहे 


१ वैदिक धर्मात विष्णू ही सूर्यदेवता आहे ह्या मूर्तीत श्रीरामाच्या डोक्यावरच्या भागात सूर्य आहे तो वैदिक विष्णू आहे 

२ त्यानंतर मूर्तिभवती ह्या विष्णूचे दहा अवतार आहेत जे वैष्णव आहेत रामाचा कपाळावरचा नाम उभा म्हणजे वैष्णव आहे 

३ रामाच्या पायापाशी हनुमान आहे जो शिवाचा अवतार आहे त्याच्याबद्दल दास रामाचा ही भूमिका आहे त्यामुळे तो पायापाशी आहे मूर्तीच्या सजावटीतही हनुमान पायापाशी आहे हात जोडून आहे 


थोडक्यात मूर्ती स्पष्टपणे हिंदू वैष्णव आहे त्यामुळेच प्राणप्रतिष्ठा विधीसाठी पुरोहित म्हणून एकाही बहुजन शैव पुरोहिताला विशेषतः गुरव समाजातील कुणाला बोलवण्यात आलं न्हवतं प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे वैष्णव ब्राम्हणांनी केलेली आहे जे हिंदू वैष्णव धर्माला धरून आहे 


भारतात आजच्या घडीला साधारण ३० करोड युरेशियन धर्मी लोक राहतात त्यांचा रामायण व महाभारतावर प्रगाढ विश्वास व श्रद्धा आहे साहजिकच श्रीरामाच्या गजराने सध्या भारत निनादतो आहे हा वैष्णव भारत भाजपचा व्होटबँक आहे भाजपमुळे हा विलक्षण एकसंध झालाय ह्याचा वर्णजातीवर विश्वास आहे हा विश्वास बदलून समतावादी हिंदुत्व प्रस्थापित होणार आहे का कि वर्णजातीवर श्रद्धा ठेवणारे सनातन चिपळूणकरांचे हिंदुत्व पुन्हा अवतरणार आहे हा खरा प्रश्न आहे 

दुसरा खरा प्रश्न उर्वरित भारत हा विश्वास हे सनातनी चिपळूणकरी हिंदुत्व स्वीकारणार आहे का ? हा आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना