चॅनेल ज्ञ : लव ,लव इन अँड लव आउट
जिज्ञासा संपली
आणि शिळे झालेले स्तन
आव्हान झाले
उत्सुकता गमावलेले हात
जीर्ण झाले
योनीची कृष्ण विवरे नाहीशी झाली
पृष्ठ भागावरून
तुझ्या नाकपुड्या नागपुड्या राहिल्या नाहीत
डोळे ओथंबून येण्याएवजी
ओघळू लागले चेहऱ्यावर
ओठांवर चुंबने उमलण्याऐवजी
फक्त रस मळू लागली
आणि मला कळलं
हा रोमान्सचा अस्त आहे
आता रोमांचक संपून मंचक सुरू
वसंत संपून वस बस सुरु
कंटाळ्याच्या अंड्यातून प्रत्येक क्षण
सण होण्याची क्षमता गमावलेले
आता फक्त संसार आणि विस्तार
गृह धर्म आणि माजोर्डा समाज
जे दोघांचे ते सामूहिक
गजरा गार्डन वर अवलंबून
इशारा, चिन्ह आणि खूण
हे जंजाळ आणि जाळ
जाळं आणि शेवाळ
माळ काढून अडगळ जमा करत
काळ काढून कळ जमा करत
आता खरी कसोटी निष्ठेची
बायका येतील त्यांना टाळण्याची
शिळ्या झालेल्या शरिरांना ओव्हनमध्ये टाकून फ्रेश करणे
आणि चवीने खाणे
मी पळणार नाही संसारातून
फक्त मला कायमचा एवरग्रीन करणारा मोक्ष
नात्यात नांगरणार आहे
बघ
शेतात यायचं
कि अर्बन शिळोप्यात मला कळू न देता गुडूप व्हायचं
मुंबई पळवाट शोधून देण्यात एक्स्पर्ट आहे
श्रीधर तिळवें नाईक
(चॅनेल सिरिजमधील चॅनेल : ज्ञ लव्ह,लिव्ह इन, लिव्ह आउट ह्या काव्य फाईलीतून)
क्रेझी फिलिंग टच करतय अविरत
एक समुद्र आता लाटा मोजत नाही
ढग मोजतो
प्रोफेशनल डोळ्यांचा अंत झालाय
एक मवाळ सिनरी स्क्रिप्टमधून डोकावतीये
आणि त्वचेवर हिरवी होतीये
श्वासांचं किलर स्किल आता किल्ले बांधतय
वाऱ्याचा पतंग उडवत बसलोय मी
वादळांच्या मध्ये
आणि मला हवेत उडण्याचं आता दुःख होत नाही
माझ्यातला सायंटिस्ट अल्कोहोलिक झालाय तुझ्या मादक प्रेमाच्या दारूमध्ये
मी तुझ्या बॉडीचा कायमचा सबस्क्राईबर झालोय
आणि तुला फक्त वाचतोय
पाना मागून पाने पाना मागून पाने
त्यांच्यावरच्या रानांच्यात कधी बर्फ कधी आग कधी पाऊस कधी नद्या
आणि कधी वाघाची डरकाळी सुद्धा
उंटावरच्या सगळ्या शहाण्यांना मी आता तुझ्या स्तनांच्या नदीत उतरवायला शिकलोय
तुझ्या नजरेतून पाघळणाऱ्या प्रकाशाची तेजस्वी वृध्दी पिंगा घालणारी
झोपेलाही स्वप्ने पडतात ती तुझीच
आणि जागृतीला जाग येते तुझ्या डोळ्यांच्या सावल्यात
एक लघु आता स्टॉप न घेता दीर्घ झालाय
मी चर्चगेटवर तुला सोडायचे म्हणून
चर्चगेट स्टेशनासाठी म्हणून येतो
तुझ्या प्रेमात ब्लाइंड फोल्डेड ठाण्याला पोचतो
तुला पोहोचवतो
आणि परततो
आणि पुन्हा पोहोचतो
फक्त तुला पाहण्यासाठी
तुला पाहण्याचे क्रेझी फिलींग संपत नाही
स्टेशनांची गणित आता मांडते कोण?
प्रेम म्हणजे थोडीच स्टेशनरी आहे?
तुझ्या एसएनडीटी विद्यापीठाला खापरपणजोबा समजणारा माझा हात
अचानक तुझ्या प्रेमामुळे त्याच्यात कॉन्टेम्पररी झालाय
जे एस हॉलची झालीये डॉल
आणि फॉल होऊ न देता
मी धबधबे वेचतोय तुझ्या अदांचे
जग कुठे चालले याची मला आता पर्वा नाही
मला आपल्यातल्या महाकाव्याची पर्वे जास्त महत्त्वाची वाटतात
प्रत्येक भेट threat वाटण्याच्या काळात
आपण भेटींना सॅटॅलाइट करतोय
तू वेडिंग ड्रेस घालशील ना घालशील
तू बोटांच्या आत माझी अंगठी पाळशील ना पाळशील
एक गोष्ट नक्की आहे
आपले पाय एकमेकांच्यात आता अनंत होत चालले आहेत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल ज्ञ, लव्ह , लिव्ह इन अँड लव आउट या काव्यफायलीतून)
आत्ता या क्षणी तू म्हणतेस की
तुझं माझ्यावर खरोखर प्रेम आहे
त्याचा अर्थ या क्षणी तुझं माझ्यावर खरोखर प्रेम आहे
उद्या ते टिकेलच असं नाही
आणि उद्या तू कदाचित हेही म्हणशील
तू माझा अत्यंत द्वेष करतेस
आणि कदाचित ते त्या क्षणाचे सत्य असेल
रोमँटिक लोकांचे भय मला चिरपरिचित आहे
आणि त्या भयावर मात करण्यासाठी
ओसंडून वाहणारी आनंदाची आसक्तीही
जिचा मूळ चेहरा भयाचाच असतो
तुझे सतत बदलणारे मूड
मला गूढ वाटत नाहीत
फक्त लाटा
बाटाचे चप्पल घालून
पृथ्वीवर फिरायला आल्यासारख्या वाटतात
संतापाचा खराटा माझ्या त्वचेवरून फिरताना
तुझाच खरखर आवाज जास्त असतो
आणि प्रेम होते तेव्हाही
तू असतेस माझ्यापेक्षाही उत्कट
शंभर नद्यांचे घोडे कुठलाही कट न धारण करता
दौडत असतात
आणि तरीही माझे रक्त रेस कोर्स नसते
फुलांना वेगाने धावताना मी फक्त तुझ्यात पाहतो
आणि कळ्यांना उमलतानाही
सेक्स करताना
तुझी जंगले फुटाण्यासारखी टनाटन उडत असतात
आणि प्रोटीन वाढवत असतात
माझ्या कित्येक शवयात्रा तुझ्यात लोंबकळतात
आणि पाठीच्या कण्याच्या रेल्वेखाली सापडून
ठार होऊन
ताज्या होऊन परततात
मोगरासारख्या असलेल्या माझ्या ताजगीचे रहस्य
तुझ्यामुळे अधिकाधिक उजळ
आणि सुगंधित होत चाललय
मी ज्ञानेश्वर झालेलो नाही
पण माझ्या आतल्या भिंती
मला तुझ्यामुळे परिचयाच्या झालेल्या आहेत
तुझ्या हिंसेची मीमांसा मी करत नाही
फक्त तिचे मांस मोजतो
मीपण किती ते जोखतो
आणि माझा स्वभाव तुला किती प्रोवोक करतो यांचा अंदाज घेत
प्रतिक्रिया देतो
स्वतः विषयी अविश्वास आणि नफरत स्पॉन्सर करण्यात
मी एक्सपर्ट आहे
मला जे जमते
ते दुसऱ्यालाही सहज जमेल असा मी आभास देतो
माझे सामान्य रूप हे फार फसवे आहे
ते चकवे देत राहते
आणि लोक माझ्या नफरतीत
स्वतःचा चक्रव्यूह निर्माण करत बसतात
तू अपवाद नाहीस
फक्त तुझ्यापुढे मी अजून नियम सादर केलेला नाही
एवढंच
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल:ज्ञ लव लिव इन लव आउट या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment