Decathlon कर्म

सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यावं 

मग कान सोडून निघून जावं 


जो तो स्वतःचा प्रचार करणारच 

किती नादायाचं आपण ठरवावं 


सर्वच बिलंदर बिळेच तयार होणार 

प्रत्येकाला त्याच्या बिळात राहू द्यावं 


व्यवस्था कोणालाही बदलायची नाही 

आपण कोणालाही सामील ना व्हावं 


तृष्णा कोणालाही सुटत नाही 

आपण प्रत्येकाची गंगा व्हावं 


मायेच्या नावाने कारभार करावा 

मोक्ष मिळवून इथून पसार व्हावं 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन कर्म या काव्य फायलीतून) 


उंबरठा श्रीधर तिळवे नाईक 


ज्या ठिकाणी तुला फुकट वस्तू मिळतात ती फॅमिली 

ज्या ठिकाणी तुला किंमत द्यावी लागते तो समाज 


उंबऱ्याच्या आत नातेवाईक 

उंबऱ्याच्या बाहेर बाजार 


हा जो उंबरठा आहे हा काल्पनिक नाही 

तो जितका घरात आहे 

तितकाच तो समाजात आहे 

जेव्हा जेव्हा ओलांडशील 

तेव्हा दहा वेळा विचार कर 


त्याच्या बाहेर फक्त बाजार आणि राष्ट्र


राष्ट्र म्हणजे संविधानाने केलेले कायदे आणि संविधान 

त्या संविधानाने उभी केलेली व्यवस्था 


राष्ट्रात राहतोस म्हणजे संविधानात राहतोस 


सेक्सच फक्त प्रायव्हेट आहे 

कारण तो उंबरठ्याच्या आत केला जातो

तो कदाचित 

हॉटेलमध्ये भाड्याने घेतलेला सुद्धा असू शकतो 


तेव्हा उंबरठ्याबाहेर राष्ट्र आहे 

उंबरठ्याच्या आत कुटुंब 

आणि तुला दोन्ही लागणार आहेत 


बाजार तुला सामान पुरवेल 

पण तुला मेहनत करायला लागेल 

तुझ्या मेहनतीचे पैसे सामान विकत घेऊ शकतात 


माणसांच्या श्रमांना भाड्याने घेण्यासाठीही 

त्यांना पगार द्यावा लागतो 

आणि हे भाड्याने घेणे फक्त कामापुरते असते 

ही भाड्याने घेतलेली माणसे 

एकदा तुझ्या कंपनीच्या उंबरठ्याच्या बाहेर गेली 

आणि त्यांच्या कुटुंबांच्या उंबरठ्याच्या आत गेली कि 

ती कौटुंबिक बनतात 

आणि त्यांच्यावर तुझ्या कंपनीचे  

कसलेही कायदे आणि कानून लागू होत नाहीत 


तुझ्या कंपनीचा उंबरठा ओलांडून 

माणसे आत आली की तू त्यांचा बॉस 

आणि तो उंबरठा ओलांडून ती बाहेर गेली 

की मग ती नागरिक 

जी राष्ट्रात जातात आणि संविधानात राहतात 


सगळा खेळ काय आहे ते समजून घे 

उगाच काल्पनिक विचारप्रणालींच्यामध्ये गुंतून पडू नकोस 


जग जसे आहे तसेच स्वीकार 


तुझा प्रत्येक व्यवहार कायद्याच्या चौकटीत वावरला पाहिजे 

कारण अंतिमत: बाजार राष्ट्रात भरतो 

आणि राष्ट्र संविधानात राहते 


तेव्हा कायदा मोडू नकोस 

आपण सर्वच एकमेकांना भाड्यांना आपल्याला देत असतो 

पण प्रत्येक भाडेकरू 

हा तात्कालीक असतो हे लक्षात ठेव 

आणि मालक तर कोणच नसतो आणि गुलाम तर नसतोच नसतो 

कोणालाही गुलाम बनवू नकोस 

गुलाम बनवणारा नीच आणि हलकट असतो


कामाच्या गुणवत्तेनुसारच मूल्यमापन कर 

वर्ण जात जमात यासारख्या काल्पनिक गोष्टी व्यवहारात आणू नकोस 


या नेटकोर्समध्ये तूच नेट 

तूच जॉकी 

स्पर्धा अटळ आहे 

परंतु सहकार्य अनिवार्य आहे 


स्पर्धेच्या जागी स्पर्धा कर 

सहकार्याच्या जागी सहकार्य 


जे तुझ्या उंबरठ्याच्या आत हक्काने येतात 

ते तुझे दोस्त आहेत 


त्यांच्याशी दगाफटका करू नकोस 

विवेक बाळग 


लग्न करणार असशील तरच 

त्यांच्या बहिणीशी किंवा मुलीशी संबंध जोड 

त्यांची अनुमती घे 

अन्यथा केवळ लैंगिक व्यवहार ठेवणार असशील 

तर नालायक ठरशील

लैंगिकतेसाठी दोस्ती पणाला लावू नकोस 


फक्त कामवासनेत गुरफटणारा पशु असतो 

वासनेला उन्नत कर 

तिला प्रेम बनव 


आता थाट उंबरठा आणि उंबरठे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: तंत्र या कर्म या काव्यफायलीतून)


प्रत्येक वेळी तू कसा तसा तसाच मूर्ख बनतो रे 

हसत हसत हिस्कावले जाते कसा हिसकावू देतो रे 


तू काय कमावलेले नाहीस पूर्वजांनी कमावले 

कसलीही लाज न वाटता सारे कसे गमावतो रे 


ते नेहमीच धूर्त असतात शत्रुत्व नाही म्हणतात 

आतून पोखरत पोखरत सगळं ताब्यात घेतात रे 


की गोऱ्या रंगाची भुरळ आहे ज्यापुढे आंधळा होतोस

तुझी काळी त्वचा तुला का अपमानास्पद वाटते रे 


तुझा पिंडच गुलामाचा बहुदा आता बनून गेलाय

स्वतंत्र माणसाने तुझ्यात जीव का अडकवावा रे 


सदा सर्वकाळ मूर्ख बनणाऱ्याला मी तरी का पकडावे 

तुझ्या नावाने कवितेत खडे फोडावे एवढेच उरते रे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: कर्म या काव्यफायलीतून)


सर्व काही समजूनही मला तीव्र उदास वाटते 

माहित नाही का पण हे जग मला आभास वाटते 


आयएएस झाल्यावर तुला सुशिक्षित मानतील 

दिलासा येतो तरी आय ए एस होणे भास वाटते


आता फक्त गुंडगिरीतच सर्व जाती समान होतात 

गुंडगिरी घेते आहे समाजाचा तास वाटते 


तिच्याकडे गेल्यावरच माझा अभ्यासक्रम पुरा होतो

तिने किस दिला की मला एकदम झकास वाटते


कुठेही गेलो तरी परतताना पोकळ वाटते 

जिथे पोचलो ते स्थान निघालो त्याचे व्यत्यास वाटते


एक काळ असा होता जेव्हा माता वाटत होती 

आता ही पृथ्वी सुद्धा रचून ठेवलेली रास वाटते


कधीतरी येणारच होता कंटाळा तो आता आला 

काय करू आता तुझी बॉडी सुद्धा आरास वाटते


मी आनंदाने जातो आता भगवान शंकरापाशी 

तीच एक जागा आहे जिथे मला खास वाटते


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : कर्म या काव्यफायलीतून)

सर्व बाजूंनी चोरच उभे 

आणि लोक स्वतःलाच कुलूप घालून 

आपापल्या घरात रक्षक बनून 


जनतेचा पक्ष जनतेच्या डोक्यात घातला गेलेला

काळ आणीबाणी पचवून ढेकर देत हात म्हणून उगवत


कुणालाही निवडले तरी 

आपल्या धनाची सुरक्षितता नाही 

याची सर्वांनाच खात्री 


देवावरचा विश्वास तर कधीच उडालेला 

केवळ कर्मकांड म्हणून लोक श्रद्धा ठेवतात 


त्यांनाही कळून चुकलंय 

आपली भक्ती आता अगतीकता आहे 


हवालदिलपणाच्या सगळ्या स्टेप्स उतरून संपलेल्या 

स्वर्गाकडे जाण्यासाठी कुठला जिना नसतो 

हे सर्वांनाच कळालेले 


जेव्हा सर्वच बाजूने दरोडेखोर 

सर्वच बाजूने हरामखोर 

तेव्हा विश्वासार्हतेची हत्या 

कन्फर्म 


हा एक असा काळ आलाय 

जिथे माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही 


जणू प्रत्येकाच्या काळजाच्या जागी दगड 

दुसऱ्याच्या डोक्यात घालायला 


दगडापासून देव तयार करणारे लोक 

आता देवापासून दगड तयार करायला लागलेत 

काहींचे तर म्हणणे असे की 

देव हा स्पेशल दगड आहे 

थेट जनतेच्या डोक्यात घालता येतो 


आता अशा काळात महादेवा 

मी माझा मोक्ष घेऊन कुठे जाऊ 


माझ्या कर्मांचा हिशेब स्वच्छ रहावा 

म्हणून कुठली निरमा वापरू 


पूर्वी लोक पाय काढून घ्यायचे 

आता पाया काढून घेतात 


निराशा सुद्धा इतकी टोकाला गेलेली आहे कि 

आशा सुद्धा म्हणते 

शीशा हो या दिल हो टूट जाता है


खरंतर सगळंच तुटत चाललय 


उत्साहाला विष घालण्यात आलय 

विशेष संपवण्यात आलय 


जो तो नक्कल झालाय 

पण नेमका कशाचा झालाय हे कोणालाच माहीत नाही


मला तू केवळ टाईप करतोयस 

म्हणून मी लिहितो आहे 


अन्यथा उजाड झालेल्या या कागदावर 

लिहिणे सोड 

मु xxx सुद्धा करावेसे वाटत नाही 


लेखणीत दम्भ भरलाय असे वाटते 


आता कसलं उत्थान 

आणि कसली क्रांती 


तुझा दरवाजा प्रकाशात हालतो आहे 

एवढाच दिलासा 

ठसठसणारा


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल कर्म या सिरीज मधून)

आपण प्रायोरिटी फक्त आपल्याच आयुष्यात असतो 

त्यामुळे स्वतःलाच प्रायोरिटी कर 


इतर कितीही महत्त्वाचे असले तरी 

तुझ्या जीवाइतके महत्त्वाचे काहीच नाही 


शक्य आहे की तुझ्या प्रायोरिटीची चेष्टा उडवली जाईल 

नाके मुरडली जातील 

रस्ते ही मुरडले जातील 

कदाचित वाटा सुरळी करून अंगात घातल्या जातील 


बिथरून जाऊ नकोस 

स्वतःच्या पावलावर विश्वास ठेव

आतल्या आवाजाला होकायंत्र कर 


विवेकसुद्धा विवेकाने वापर 


निदान मी आता जिवंत आहे एवढी श्रद्धा तर ठेवावीच लागते


आयुष्य सिसीफसची शिळा नाही

तुला दिले गेलेलं प्राणाचं झाड आहे 


तू म्हणशील ती फुले येतील 

तू म्हणशील ती फळे येतील 


तू वाढवशील तेवढा विस्तार होईल 

तू आकसशील तेवढा छोटा होशील 


तुझी उंची तुझ्या विचाराच्या उंची इतकीच असेल 

तुझी झेप तुझ्या कष्टावर आणि मॅनेजमेंटवर अवलंबून असेल 


प्रतिभा मात्र तुझ्यातच असावी लागेल 

आणि लक्षात ठेव प्रतिभा प्रत्येकाजवळ असते 

फक्त कोणती आणि कशाची हे शोधावे लागते 

शिक्षण म्हणजे स्वतःच्या प्रतिभेचा शोध 

तेव्हा शिक 

पण कशासाठी शिकतोयस ते लक्षात ठेव 


प्रत्येक प्रतिभेला कौशल्य लागते ते कमाव 

आळशी लोक कौशल्य कमवत नाहीत आणि स्वतःला आळसात वाया घालवतात 


कष्टांना नाही म्हणू नकोस 

आणि सर्व श्रमांची इज्जत कर


आयुष्य फळण्यासाठी ते पणाला लावावे लागते 

लाव 


यश तुझेच असेल 

मिळव 


मात्र ते सुगंधासारखे असते एवढे लक्षात ठेव 


त्याच्यावर नाव लिहिण्याचा प्रयत्न करू नकोस 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलोन सिरीजमधील डेकॅथलॉन :अन कॅटेगरीकल : कर्म या काव्यफायलीतून)

तुम्ही दबाव आणता 

मी माझ्याच ओळी एडिट करून त्यांचा खून करावा 

पण मी हे करणार नाही 


तुम्ही म्हणाल तुझा प्राण जाऊ शकतो 

मी म्हणेन 

मी माझ्या कविता आणि माझा प्राण 

एकच आहेत 

मीच कविता आहे 


शक्य आहे की तुम्ही मला गोळी घालाल 

शक्य आहे की एखादा सूरा खूपसाल 


पण कोणीतरी कवितेचा प्राण 

पणाला लावला पाहिजे 


तुम्ही जीव घ्या 

मी प्राण जिवंत ठेवतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल :कर्म या काव्यफायलीतून)


यांच्यात आणि मनोरुग्णांच्यात काय फरक आहे 

हे इथे जमलेले आणि पशुंच्यात काय फरक आहे 


भगवे वस्त्र नेसले म्हणजे कुणी पवित्र होत नाही 

अटेंशनसिक अभिनेते अन यांच्यात काय फरक आहे 


देवांच्या नावाने कसले कसले तमाशे करणार आहात

फडावर जा तुमच्यात आणि नाच्यांच्यात काय फरक आहे


मुळात मोक्षासाठी कधी कुठली संघटना आवश्यक नाही 

राजकीय पक्ष आणि तुमच्या संघटनांच्यात काय फरक आहे


लीलाव होण्यापर्यंत मजल कधी आणि कोणी गाठली 

रेसकोर्सवरचे घोडे आणि अनुयायांच्यात काय फरक आहे


आता महादेवा तूच उतर खाली आणि सफाई कर 

तूच समजव शिवात अन जीवांच्यात काय फरक आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :कर्म या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना