शैव समाज विद्या
अनुराग कश्यप,शैव समाजविद्या (समाजशास्त्र) आणि भारतीय राज्यव्यवस्था श्रीधर तिळवे नाईक
भारतात समाजशास्त्र प्राचीन काळात अस्तित्वात होते की नाही हा एक वाद विवादाचा विषय आहे युरोपियन पुरोगामी वादाने विज्ञान जन्माला घातले आणि विज्ञानअधिष्ठित शास्त्रांचा उदय झाला त्याची एक शाखा म्हणजे सोशॉलॉजी होय मराठीत आणि एकंदरच भारतीय भाषांच्यात या शब्दाचा अनुवाद कसा करायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रात तो मराठी भाषेत समाजशास्त्र हा शब्द वापरून सोडवण्यात आला. प्रत्यक्षामध्ये हा शब्द अत्यंत चुकीचा असून त्या ऐवजी समाज विद्या हा शब्द वापरण्यात येणे आवश्यक होते परंतु विद्या, शास्त्र आणि विज्ञान यांच्यातला फरक न कळणारे लोक सातत्याने समाजशास्त्र हा शब्द वापरत राहिले आणि मग सोशालॉजी म्हणजे समाजशास्त्र असाच अर्थ रूढ झाला
सर्वसाधारणपणे भारतामध्ये समाजविद्या उदयाला आल्यानंतर तिच्यावर ब्राह्मण वर्णातून आलेल्या लोकांचे प्रचंड प्रभुत्व होते साहजिकच या लोकांनी ब्राह्मण धर्माधिष्ठित समाजशास्त्र रचण्याचे उद्योग सुरू केले भारतामध्ये शास्त्रांची मक्तेदारी ही कायमच ब्राह्मणांच्याकडे आहे असा ब्राह्मणांनी गैरसमज पसरवलेला आहे साहजिकच शास्त्र हा शब्द मुद्दाम वापरला जातो आणि त्यात अनेकदा ब्राह्मण धर्माचा संकेत असतो आपल्याकडच्या अनेक लोकांना हा संकेत लक्षात येत नाही साहजिकच अनेकांनी हिंदू समाजशास्त्र रचायला सुरुवात केली याचे कारण हिंदू हा शब्द प्रामुख्याने ब्रिटिश लोकांनी प्रचलित करायला सुरुवात केली आणि या प्रचलनाच्या कवेमध्ये सर्वच लोक आले याचा एक दुष्परिणाम असा झाला की भारतीय समाजविद्या ही कळत नकळत वर्णजातकेंद्री होत गेली आणि जणू काय भारताचा आणि भारतीय समाजाचा इतिहास म्हणजे वर्णजातीचा इतिहास असा एक फार मोठा गैरसमज पसरत गेला दुसरी गोष्ट या समाजशास्त्राने हिंदू नावाचा नवा धर्म विसाव्या शतकामध्ये सर्वांच्याच बोकांडी मारला प्रत्यक्षात हा शब्द तुकाराम किंवा ज्ञानेश्वरांच्या लिखाणामध्ये अस्तित्वात सुद्धा नाही हे लक्षात सुद्धा घेतले गेले नाही या शब्दाची चिकित्सा ऐतिहासिक पातळीवर होणे अत्यंत गरजेचे होते पण तशी चिकित्सा झाली नाही पारंपारिक भारतीय दर्शनाच्यामध्ये कायमच दर्शनांच्या संदर्भात वैदिक दर्शने हीच केंद्रीभूत केली गेली आणि झाली आणि वैष्णव दर्शने आणि शैव दर्शने ही कळत नकळत मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत असे जणू काही सुचवले गेले प्रत्यक्षामध्ये ब्राह्मणांनी प्रचलित केलेल्या सहा दर्शनामध्ये समाज घुटमळतच नव्हता किंबहुना 99 टक्के लोकांना या दर्शनांची नावे सुद्धा माहिती नव्हती पण या दर्शनाचा अर्थ असा लावला गेला की जणू काही ही सहा दर्शने भारतीय समाज चालवत आहेत जे एक अत्यंत स्पॉन्सरड केलें गेलेले खोटारडे निवेदन होते प्रत्यक्षामध्ये भारतीय समाज दोन धर्मांच्या मध्येच घुटमळत होता आणि हे दोन धर्म म्हणजे वैष्णव धर्म आणि शैव धर्म होय (या काळामध्ये मुस्लिम धर्मीय लोकांची संख्या धड १६% सुद्धा नव्हती आणि इंग्रजांच्या काळामध्ये मुस्लिम समाज वाढत गेला हे अनेक समाज शास्त्री लोकांच्या लक्षात आलेले नाही)आणि या दोन धर्मांनी निर्माण केलेली जी दर्शने होती तीच खरी दर्शने होती आणि त्यांचाच प्रभाव भारतीय जनतेवर आणि राज्यांच्यावर पडलेला होता उदा महाराष्ट्रामध्ये नाथ दर्शन आणि वारकरी दर्शन यांचाच प्रभाव होता मुस्लिम राजवटीमध्ये यातील वैष्णव धर्माने मुस्लिम धर्मापुढे आणि इस्लामपुढे सपशेल शरणागती पत्करलेली होती ही वस्तुस्थिती आहे या सपशेल शरणागतीला सहिष्णुतेचे नाव देऊन अनेकदा लपवले जाते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रतिकार करण्याची वैष्णव धर्माची क्षमता कधीच चांगली नव्हती याबाबतीत शैव मात्र सातत्याने आपला प्रतिकार करत राहिलेले दिसतात आणि पुढे शिवाजी महाराजांनीच या प्रतिकाराला एक प्रचंड मोठा आकार दिला ज्यातून पुढे मुस्लिम पराभूत होत गेले औरंगजेब हा याबाबतीत टर्निंग पॉईंट ठरलेला दिसतो औरंगजेबाची महाराष्ट्रात गाडली गेलेली हाडे हा शैव धर्माचा सर्वात मोठा विजय होता
मुस्लिमांना शरण जाणाऱ्या या वैष्णव धर्माने पुन्हा एकदा पेशवाई मध्ये आपली जागा निर्माण केली आणि तो प्रमुख धर्म म्हणून उदयाला येऊ लागला आणि त्याने पुन्हा एकदा वर्ण जाती व्यवस्था स्वीकारली स्मृती स्वीकारली जे वैष्णव धर्माला धरून होते या पराभूत झालेल्या लोकांना नंतर इंग्रजांच्या काळामध्ये पुन्हा जागा मिळाली इतकेच नव्हे तर त्याचे ब्राह्मणीकरण झाले या ब्राह्मणीकरण झालेल्या वैष्णव धर्माने महाराष्ट्रामध्ये वारकरी दर्शन जन्माला घालायला सुरुवात केली होती मात्र त्याची शास्त्रशुद्ध मांडणी तयार झाली नव्हती विसाव्या शतकामध्ये साहजिकच वारकरी दर्शन स्वतंत्र दर्शन मानले जाऊ लागले आणि त्यासाठी वारकरी संप्रदायातील संतांचा आणि त्यांच्या मांडणीचा वापर केला गेला
१९व्या शतकात राजा राम मोहन राय यांच्यानंतर हिंदू हा धर्म म्हणून अस्तित्वात आला आणि त्याचबरोबर हिंदुत्व नावाची गोष्ट ही अस्तित्वात आली विशेषत: स्वामी दयानंद सरस्वती यांनी यासंदर्भात विशेष काम केले आणि इथूनच पुढे सर्व वैष्णव, ब्राह्मण आणि वैदिक यांनी मिळून हिंदू धर्म तयार झाला आणि या हिंदू धर्माने शैव धर्म कसा गिळता येईल या अंगाने पावले टाकायला सुरुवात केली अत्यंत जाणीवपूर्वक शैव धर्माचा विचार करताना ती हिंदू धर्माची शाखा आहे असा अपप्रचार करण्यात आला रुद्र प्रामुख्याने शंकर म्हणून उदयाला आणला गेला शिव म्हणून उदयाला आणला गेला
या सगळ्या पातळीवर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली जी शिवशाही होती तिचा आधार असलेला शैव-धर्म मात्र पद्धतशीरपणे साईडलाईन करण्यात आला कारण तो ना ब्रिटिशांना हवा होता ना तो नवीन वैष्णव विचारवंतांना हवा होता आणि समाजशास्त्रावर यांचेच वर्चस्व असल्याने साहजिकच यांच्याच हिशेबाने समाजशास्त्राची मांडणी होऊन भारतामध्ये गटव्यवस्थेचा विचार करताना वर्ण व जात हे दोन गट गट म्हणून केंद्रस्थानी आणले गेले याचा दुष्परिणाम असा झाला की भारतीय समाज म्हणजे वर्ण आणि जातयुक्त समाज होय अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला. प्रत्यक्षामध्ये शैव-धर्मामध्ये वर्ण आणि जात या दोन्ही गोष्टींना कसलेही स्थान नव्हते शैव धर्मामध्ये फक्त समाज होते आणि या विविध समाजांचे मिळून गण आणि विविध गणांचे मिळून राज्य होत होते उदाहरणार्थ कायस्थ हा जात नाही किंवा वर्ण नाही तर प्रत्यक्षात तो शैव समाज आहे परंतु त्याने स्वतःला वर्णव्यवस्थेत जागा निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न वैष्णव दबावाखाली सुरु केले आणि त्यातूनच तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे की वैश्य आहे असा प्रश्न निर्माण झाला कारण मुळात तो समाज म्हणूनच अस्तित्वात होता त्याला जात ही डायमेन्शनच नव्हती हीच गोष्ट आपणाला मराठा समाज ,जाट समाज ,गुर्जर समाज ,राजपूत समाज , शीख समाज , पंडीत समाज या सर्व समाजांच्याबद्दल बोलता येते सर्व समाज होते आणि ते जात नव्हते परंतु ते जात असल्याच्या थाटात त्यांना वैष्णवांनी वागवायला सुरुवात केली कारण वैष्णवांना सर्व शैवांना शूद्र वागणूक द्यायची होती त्यांनी सर्व शैव कसे शूद्र वर्णात टाकता येईल ते पाहायला सुरुवात केली होती आणि याची सुरुवात पेशव्यांनी केली होती स्वतः पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पर्यंत शैव असलेले पेशवे नानासाहेब पेशव्यांच्या काळात वैष्णव झाले आणि त्यांनी वर्णव्यवस्था स्वीकारली साहजिकच त्यानंतरची त्यांची सर्व दिशा ही सनातन वैष्णव दिशा होती आणि त्याचा अत्यंत खोलवर परिणाम महाराष्ट्रातील जनजीवनावर झाला हीच गोष्ट राजपूत लोकांच्या बाबतीत राजस्थान ,हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेली दिसते तिथेही या राजपूत समुदायाने स्वतःचा मूळ शैव धर्म त्यागला आणि वैष्णव धर्म स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यातूनच तिथेही वर्णाची बाधा झालेली दिसते अनेक राजपूत स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेऊ लागले तर जे क्षत्रिय म्हणून सामावून घेतले गेले नाही त्यांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला कारण हे लोकही स्वतःला राजपूतच म्हणवून घेत होते कारण ते प्रत्यक्षात राजपूत समाज होते
अनुराग कश्यप यांच्या ब्राह्मण धर्माविषयी आणि वर्ण विषयी जे उद्गार आले त्यातून हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे याचे कारण अनुराग कश्यप यांची जात काय असा प्रश्न विचारला गेला आणि जेव्हा विचारणाऱ्यांच्या असे लक्षात आले की ते ब्राह्मण नसून त्यांचे कश्यप हे नाव प्रत्यक्षात आणीबाणीच्या आसपास त्यांच्या वडिलांनी घेतलेले नाव आहे आणि त्यांचे मूळ आडनाव सिंग आहे आणि ते नंतर आडनाव बदलून कश्यप झालेले आहेत अनुराग,- कश्यप किंवा कायस्थ आहेत की नाही त्याबद्दल मला चौकशी करायची गरज भासत नाही पण या निमित्ताने त्यांच्या कायस्थ होण्याची जी चर्चा सुरू झालेली आहे त्या अंगाने कायस्थ समाजाची चर्चा करायची आहे साधारणपणे नवव्या शतकामध्ये अनेक शैव समाजांनी आपली ओळख नाकारायला सुरुवात केली कारण हळूहळू वैष्णव तत्त्वज्ञानाचा व धर्माचा पगडा वाढत गेला यातून असा प्रश्न निर्माण झाला की या शैव समाजाचे करायचे काय? या प्रश्नाबाबत सर्वाधिक गोंधळलेली स्थिती जर कुठल्या समाजाबाबत निर्माण झाले असेल तर तो समाज म्हणजे कायस्थ समाज होय माझी स्वतःची आजी या समाजातील असल्याने या समाजाशी माझा थोडा रक्त परिचय आहे
खरे तर हा मूळचा व्यापारी समाज ! मात्र व्यापार करण्यापेक्षा व्यापारी लोकांचे हिशेब लिहिणे हा या समाजाचा उपजीविकेचा व्यवसाय होता अपवादात्मक वेळेला या लोकांच्यातून काही बलाढ्य व्यापारी सुद्धा निर्माण झालेले दिसतात हे लोक स्वतःला चित्र गुप्ता चे वंशज मानायला लागले त्याचे कारण चित्रगुप्त हा सुद्धा स्वर्गात पाप पुण्याचा हिशोब करत होता हा परलोक हा यमाचा नियंत्रणाखाली होता आणि यम मृत्यूनंतर पाप पुण्याचा निवाडा करून कोणाला स्वर्ग द्यायचा कोणाला नरक द्यायचा हे ठरवत होता मात्र हिशेब ठेवणारा चित्रगुप्त असल्याने साहजिकच यमाची अवस्था ही राजासारखी होती साहजिकच चित्र गुप्ताशी नाते जोडणे या लोकांना अत्यंत सहज आणि स्वाभाविक वाटले आजही चित्र गुप्ताशी असलेले हे नाते कायस्थ लोक तोडत नाहीत पृथ्वीतलावर अशाच प्रकारचे हिशेब राजे लोकांचे ठेवले जात किंवा व्यापारी लोकांचे ठेवले जात आणि ह्या हिशेब ठेवणाऱ्या लोकांचा एक स्वतंत्र समाज शैव लोकांच्यात निर्माण झाला तो म्हणजे कायस्थ समाज होय नवव्या शतकानंतर व्यापार कोसळत गेला समुद्र पर्यटन बंदी आली आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की या लोकांच्या हातातून त्यांचा उपजीविकेचा मुख्य सोर्सच काढून घेण्यात आला साहजिकच यातील अनेक जण शेतीकडे वळले आणि काहीजण शेतीकडून स्वतःच्या जमिनीच्या रक्षणासाठी शस्त्र चालवायला शिकले यातूनच अनेक कायस्थ क्षत्रियकर्म करायला शिकले महाराष्ट्रातील अनेक देशपांडे हे मूळचे कायस्थ आहेत आणि त्यांची कुलदेवता खंडोबा आहे कायस्थ समाजामध्ये पौराहीत्य कायमच त्यांच्या समाजातील पंडित लोक करत होते त्यासाठी ते कधीही ब्राह्मण बोलवत नव्हते आणि त्यांना तशी कधी गरजही भासत नव्हती साहजिकच या कायस्थ लोकांच्यातून उदयाला आलेले जे पंडित लोक होते ते वैष्णव धर्म स्वीकारल्यानंतर स्वतःला हळूहळू ब्राह्मण म्हणवून घ्यायला लागले यातूनच मग पंडित कर्म करणारे पुरोहित काम करणारे कायस्थ ब्राह्मण आणि शेतीचे काम करणारे कायस्थ शूद्र मानावेत का असा प्रश्न निर्माण झाला यातच महाराष्ट्रामध्ये अनेक कायस्थ हे योद्धे झाले आणि त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणवून घ्यायला सुरुवात केली या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की कायस्थ म्हणजे ब्राह्मण की क्षत्रिय की शूद्र असा प्रश्न निर्माण झाला विशेषत: उत्तर भारतामध्ये जे कायस्थ होते त्यांना शूद्र म्हटले जावे अशा प्रकारची हाकाटी सुरू झाली एखाद्या शैव समाजाला वर्ण व्यवस्थेत कोंबताना जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो प्रॉब्लेम इथे निर्माण झालेला दिसतो आणि याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय समाजशास्त्र म्हणजे ब्राह्मणांनी स्पॉन्सर केलेले वर्ण जात केंद्री समाजशास्त्र अशी झालेली गैरसमजूत! त्याऐवजी जर का आपण शैव धर्माची समाज ही पारंपारिक कॅटेगरी गटव्यवस्था म्हणून स्वीकारली आणि मराठा किंवा जाट किंवा राजपूत वगैरे सर्व समाजांची समाज ही कॅटेगरी मानून चिकित्सा केली तर समाजशास्त्राच्या संदर्भामध्ये आपणाला अनेक वेगळ्या गोष्टी दिसू शकतात परंतु दुर्दैवाने वर्ण आणि जातीमध्ये अडकलेले समाजशास्त्र आजही या शैव कॅटेगरीला स्वीकारायला तयार नाही यासाठी आपणाला स्वतंत्रपणे शैव समाजशास्त्राची किंवा समाज विद्येची मांडणी करावी लागेल आज महाराष्ट्रामध्ये जो मराठ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुद्धा असाच आहे कारण हा मूळचा शैव समाज आहे त्याचे मूळ कुलदैवत हे शैव आहे विशेषता खंडोबा किंवा तुळजाभवानी आणि म्हणूनच त्याला नेमका कुठल्या वर्णाचा आधार द्यावा हे कळत नाही संपूर्ण भारतीय समाज हा युरेशीयन कॅटेगरीमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये भारतीय समाजशास्त्र वर्ण आणि जातीच्या विळख्यात सापडलेले दिसते मी नेहमीच सांगत आलेलो आहे की जोपर्यंत या देशातले ब्राह्मण विशेषतः मूळचे शैव असलेले पंडित जोपर्यंत पुन्हा एकदा पंडित बनत नाहीत तोपर्यंत या देशाला वर्ण जातीतून मुक्तता मिळणे शक्य नाही पंडित हा सुद्धा समाज आहे वर्ण नव्हे आणि या समाजामध्ये कुठलाही विद्वान येऊ शकतो किंबहुना आपल्याकडे विद्वानाला पंडित म्हणण्याची जी प्रथा आहे ती यातूनच आलेली आहे
आपणाला एकीकडे वर्ण आणि जातीपासून मुक्ती हवी आहे आणि दुसरीकडे वर्णजातकेंद्री समाजशास्त्र चालवायचे आहे माझ्या मते हे शक्य नाही जोपर्यंत आपण आपले समाजशास्त्र बदलत नाही तोपर्यंत भारतीय समाज व्यवस्थेत फरक पडणे अशक्य आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment