परिपुर्ती श्रीधर तिळवे नाईक
आयुष्यात कळायला लागल्यापासून काही गोष्टी ठरवल्या होत्या आजच्या भाषेत बकेट लिस्ट तयार केली होती पुढे मोक्ष लागला आता म्हणू शकतो की ही सर्वच्या सर्व लिस्ट पूर्ण झाली ती पूर्ण करण्यासाठी मी काही फार मेहनत केली असे म्हणवत नाही पण शंकर म्हणतात तुम्ही मोक्षाची काळजी घ्या मोक्ष तुमची काळजी घेईल बुद्ध म्हणतो तुम्ही धम्माची काळजी घ्या धम्म तुमची काळजी घेईल किंवा जे कृष्णमूर्ती म्हणतात तुम्ही सत्याची काळजी घ्या सत्य तुमची काळजी घेईल तसे काहीतरी झाले बहुदा! मी काही ठरवून गोष्टी केल्या नाहीत जगत गेलो जगता जगता गोष्टी होत गेल्या माझ्या बकेट गोष्टी कधीच सामूहिक किंवा सामाजिक नव्हत्या मला काही गोष्टी करायच्या होत्या त्या मी केल्या पण त्याही काही जीव खाऊन मागे लागलोय असं काही झालं नाही बस एखाद्या जंगलातून जावे आणि जंगलातल्या प्रत्येक झाडाने तुम्हाला आवश्यक तसे फळ तुमच्या देहाच्या झोळीत टाकावे तसे काहीसे घडलेले आहे एका अर्थाने सांगायचे तर यात्रा संपूर्ण आणि सफल झाली
आता समाधीचा विचार करता येईल पण तेही काही नीट ठरवून वगैरे मी करणार नाही आतून आदेश आला की मी काहीही करू शकतो
किंवा मग नुसतच आहे ते एन्जॉय करायचे ते तर मी नेहमीच करत आलेलो आहे
आयुष्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहिलो कुठल्यातरी चंद्रावर किंवा मंगळावर दगड होऊन मरण्यापेक्षा आपण एक देह म्हणून उमलतो याहून सुंदर चमत्कार तो काय ? मला आयुष्याला ब्लेम करणारे लोक कायमच वेगळे वाटत राहिले आपल्या जगण्याचा उत्सव करायचा की सो कॉल्ड निरर्थकतेत अडकून प्रश्नांच्या भोवऱ्यात घरघरत राहायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे लोक नेहमीच आपल्या स्वतःच्या देहापेक्षा जास्त काही मागत असतात वास्तविक जो देह मिळाला आहे तोच पुरेसा आहे पण कोणी कोणाला समजवायचे ?
मी जगणार कसा असा प्रश्न कायमच माझ्या काही मित्रांना पडत राहिला कारण जी शैली मी निवडली ती पारंपारिक नव्हती पण ती माझ्यासाठी फार योग्य होती अनेक लोकांनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण मी काही घाबरलो नाही तुझे असे होईल आणि तुझे तसे होईल असे सांगणारे खूप भेटले पण माझा एका गोष्टीवर कायमच विश्वास होता तो म्हणजे मोक्ष ,सत्य, धम्म हे तुमची काळजी घेतात . लोकांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो त्यातून सर्व समस्या निर्माण होतात लोकांचा त्यांच्या देवावर सुद्धा विश्वास नसतो ते देव सुद्धा बाहेरून घेतात किंवा कुठल्यातरी ग्रंथा मधून ! त्यांच्या दृष्टीने देव म्हणजे सुद्धा दुकानच जे इच्छापूर्ती करते देव असा फळत नाही माणसाचा जर स्वतःच्या आतल्या देवावर संपूर्ण विश्वास संपूर्ण श्रद्धा असती तर हे मानवी जग सुंदर झाले असते खरे तर ते सुंदरच आहे पण आसक्त्यांचे पडदे एवढे मोठे कि माणसाला सौंदर्य दिसतच नाही दुर्दैवाची गोष्ट इतकीच की भाषेत हे काहीही पकडता येत नाही हे सगळे सौंदर्य भाषेतून निसटून जाते एका अर्थाने भाषाच करंटी आहे तिला आनंद पेलता येत नाही माझ्या कवितांची सर्वात मोठी मर्यादा ही आहे असे सर्व क्षण भाषेत आलेच नाहीत शिवाय आनंदाचे डोही आनंद तरंग यानंतर काही लिहिण्यासारखे उरत नाही
माझ्या या परिपूर्तीला साथ देणाऱ्या सर्वांच्या विषयी शरीरापासून कृतज्ञता व्यक्त करतो
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment