DECATHLON DNYAN

Decathlon ज्ञान २५

सत्यवादी

तो उभा राहिला आणि सत्य बोलला 

खूप काही हलले अस्वस्थ झाले तो जेव्हा बोलला 


कित्येक बागडायचे क्षण अचानक कठोर झाले 

काळ थोडा करपला तो जेव्हा बोलला 


काहींना त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली 

आकाशाने आवंढा गिळला तो जेव्हा बोलला 


तो आला झुळकी सारखा वादळासारखा निघून गेला 

हवेचा कम्फर्ट झोन हादरला तो जेव्हा बोलला 


पूर्वी ही असेच झाले होते त्याच्याबाबतही असेच झाले 

समाजाने क्षणभर स्वतःचा गळा आवळला तो जेव्हा बोलला


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन : अन कॅटेगरी कल :ज्ञान या सिरीज मधील काव्यफायलीतून)





 DECATHLON DNYAN डिसेंबर 24


हल्लेखोर हल्ला करतो आणि चौकशी करायला येतो 

ज्याच्यावर हल्ला तो विचारतो कशाला मरायला येतो


ही लोकशाही नाही काडीवर तरंगणारी मतांची गर्दी आहे 

लोकांनाच बुडायचेय तिथे कोण तारायला तरायला येतो


पशुपालन आऊटडेटेड जो तो माणसेच पाळतो आहे

माणसांचीच कुरणे झालेली राजकारणी चरायला येतो 


नैतिकता जतन करण्याची लोकांची इच्छा मरून गेली 

मोक्ष लोकांच्यात येत नाही नि सिद्ध झाडाखाली झरायला येतो 


माझा जीव शिवाला देऊन टाकला शक्ती आहे ती शक्तीला दिली 

मागे पुढे काय मला माहित नाही ईश्वरसुद्धा माझ्याकडे घाबरायला येतो


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


ह्या ब्रह्मांडातला 

पृथ्वी म्हणजे एक दगड आहे 

आणि आपण या दगडावर उगवलेले दोन पायाचे जीव 

ज्यांना हा दगड म्हणजे प्रचंड मोठे विश्व वाटते 


ब्रह्मांडाला या दगडाची फार काही पडलीये असं नाही 

त्याच्या दृष्टीने असे कैक दगड आहेत 

ज्यावर जीव आहेत 


तुम्ही साजरा करा हा दगड 

आणि या दगडावरचे पाणी 


तुम्ही साजरीं करा शेवाळी 

ज्यांना तुम्ही जंगल समजता 

आणि संस्कृती 

ज्यांना तुम्ही स्वतःचा विस्तार समजता


शेवटी साईज स्वतःच्या साईज वर अवलंबून असते 

आपण साईज प्रमाणेच जगण्याचा बूट घालत असतो 


चालत रहा आपल्या साईजच्या बूट मध्ये 

सायझेबल


आणि ब्रम्हांड जिंकण्याची स्वप्नं पहात रहा 

जोपर्यंत हे ब्रम्हांड हा दगड जगू देतय तोवर 


शेवटी हाही दगड गडगडणारच आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


नोव्हेंबर 24

देव श्रीधर तिळवे नाईक 

देव खाता येत नव्हता फळासारखा 

देव शिकार करून मारता येत नव्हता 

एखाद्या जनावरासारखा 

देव होता फळाहूनपण मोठा 

देव होता एखाद्या प्राण्यांपेक्षाही विशाल 

देव जंगलच होता 

शेवटी माणसाच्या लक्षात आले की 

देवा बरोबर फक्त एकच गोष्ट करता येते - व्यापार 

तोवर मनुष्याला व्यापार सुचला नव्हता 

मनुष्याने पहिला व्यापार देवाशी केला 

तुला मी अमुक देतो 

त्याच्या बदल्यात तू मला अमूक दे 

नवस ही पहिली देवघेव होती 

आणि ती नावाप्रमाणे देवाची घेव होती

आताही मनुष्य देवाशी व्यापारच करतो आहे 

असा व्यापार 

ज्यात देव ठरवतो 

की मनुष्याने ऑफर केलेली गोष्ट 

स्वीकारायची की नाही ?

देवाने ऑफर  स्वीकारली की काम होते असं म्हणतात 

देवाने ऑफर नाकारली की 

मग त्याची कारणमीमांसा शोधली जाते 

असे कारणमीमांसा शोधणारे लोक पुरोहित होतात 

म्हणजे ऑफर करताना कुठे काही चुकले का वगैरे वगैरे गोष्टींचा 

ते अभ्यास करतात 

काहीजण अधिक पुढे जाऊन 

कुठल्या देवाला काय ऑफर केले म्हणजे 

कुठला देव फळतो 

त्यावरही संशोधन करून 

ते संशोधन माणसांच्या पुढे सादर करतात 

काहीजण तर देवावर जाऊन पीएच डी सादर करतात 

देव प्रत्यक्ष दिसत नाही 

आणि तरी देवाशी व्यापार चालूच आहे 

आणि व्यापार 

माणसाने सुरू केलेला पहिला व्यवसाय होता 

प्रश्न इतकाच आहे की 

देव जर दिसत नसेल तर 

मग हा व्यापार तर्काच्या पातळीवर स्वीकारायचा कसा ? 

नास्तिक लोक देव नाकारतात 

देव घेव नाकारतात 

पण लोक आहेत की व्यापार सोडत नाहीत 

जगातला पहिला व्यवसाय 

हा असा अदृश्य व्यापार असावा 

हे अद्भुतच म्हटलं पाहिजे 

कदाचित म्हणूनच 

अदृश्य ही संकल्पना माणसाच्या डोक्यात शिरली 

आणि मग तो अनेक अदृश्य गोष्टी 

तयार करायला शिकला 

भाषा ही सुद्धा तशी अदृश्यच असते 

अशा अनेक गोष्टी 

म्हणजे गणित आणि भूमिती 

मुळच्या अदृश्यच असतात

म्हणजे एकंदरीत 

देवाने माणसाच्या संस्कृतीला 

अदृश्य आणि दृश्य 

सुरुवात करून दिलेली आहे 

देवाशी सुरू झालेला व्यापार 

हा माणसाच्या संस्कृतीचा पाया आहे 

हे सहजासहजी कळत नाही 

पण थोडा विचार केला की कळत 

प्रश्न असा आहे की 

आता जो दृश्य व्यापार आहे 

तो करण्यासाठी 

देवाची आवश्यकता आहे की नाही ?

देव अनावश्यक झाला असेल तर 

आपण त्याला भंगार मध्ये टाकावे का ?

की देव अडगळीत गेला की

 त्याच्याबरोबर संपूर्ण संस्कृती अडगळीत जाईल 

अशी आपणाला भीती आहे ?

देव आऊटडेटड झालाय 

किंवा त्याची एक्सपायरी डेट आली आहे

असं वारंवार वाटते 

पण घडताना मात्र दिसत नाही

देव का टिकलाय?

किंवा देव का टिकवला गेलाय?

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन या सिरीजमधील डेकॅथलोन : अनकॅटेगरीकल : ज्ञान या काव्यफायलीतून)


सर्वच तर दोष आहेत माझ्यात कुठे गुण आहेत ?

मला सांग तू निर्गुण तर माझ्यात कुठून सगुण आहेत?


तुझ्या नावाखाली धंदा श्रद्धेचा चाललेला 

तुला काय हे मंदिरातील चाळे  मंजूर आहेत ?


देवाबाबत प्रत्येकजण  निरढावत चाललेला

संवेदनबधिर प्रेतांचे हे ढीग तुला कबूल आहेत?


आत्ताच त्यांच्या अहंकारांना समजावून सांगू नकोस 

हळूहळू थंड होतील अद्याप ते ऊन आहेत


प्रेमासारखीच  देवसुद्धा समजावण्याची गोष्ट नव्हे 

ती ज्ञानाचा अंत आहे तिच्यात ज्ञानाचे खून आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅट्यागरिकल :ज्ञान या काव्यफायलीतून)

 नॉर्मल आयुष्य माझे उडून गेले 
आणीबाणी आली खरवडून गेले 

मी फक्त सरकारच्या नजरेत आहे 
साधे वावरणे माझे अवघडून गेले 

सत्तेच्या आंधळेपणात चांगलेही असेल 
ढोंगी दिलासे काही बडबडून गेले 

प्रामाणिकपणा बापाचा स्वभाव होता
चार पोलीस त्यास ओरबडून गेले

नदी उतार पकडून समुद्रात पोहोचते 
मी ढग होतो पिसारे झडून गेले 

कदाचित काळाची बेईमानी होती 
काही इमानदार लोक गडगडून गेले 

लोकशाही फक्त मनोरंजन होती 
आणीबाणी आली सत्य सापडून गेले

मतदान करूनही मतांवर विश्वास नाही 
मी नागरिक म्हणून काय आहे प्रश्न अवघडून गेले 

दुःख करायला सरकार थोडेच बुद्ध आहे
ते लौकिक आहे जे थड थडून गेले

घरात या अरेस्ट करा गोळी घाला 
खरी लढाई भयाशी नि भय झडून गेले

श्रीधर तिळवे नाईक 
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलोन अनकॅटेगरीकल :ज्ञान या काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA