MOKSH SIDEEFFECT
हा एक अतार्किक काळ आहे
कदाचित सगळेच काळ असे होते
आणि इतिहासकारांनी त्या काळांना तर्क दिला
कदाचित लोकही असेच होते फाटलेले आतून
ताणलेले आतून
आयुष्य वजा करत जगणारे
कदाचित राज्य करणारे असेच
लोकांच्या त्वचेची पोळी बनवून ती भाजून घेणारे
कदाचित रस्ते ही असेच उदास करणारे
आणि चालणारे ही असेच भकास आतून
आणि घरेही अशीच
अर्धी फाटलेली
अर्धी मस्त डौलदार
कदाचित ईश्वरही असाच
माणसांनी तयार केलेला -दिलासादायक
आणि मोक्षपुरुष मोक्षस्त्रिया अशाच
काळातून निसटलेल्या
आणि काळाला माया म्हणून बघणाऱ्या
आसक्त्या अशाच
ताज्यातवान्या
आयुष्याचा खून करणाऱ्या
आणि कवीही असेच
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणत
आपापल्या वॉलच्या अलीकडे बसलेले
बॉल दाबत
प्रश्न इतकाच
ह्याही काळात ज्ञानेश्वरांच्याप्रमाणे भिंती चालवत
तू कुठवर जाणार आहेस
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरीजमधील मोक्ष : साइड इफेक्ट या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment