CHANNEL ELCETRA
channel elcetra
प्रिया माहेर सोडताना श्रीधर तिळवे नाईक
तिने किचन मधले कित्येक सुवास नाकात भरून घेतले
तिचा पाठलाग करणाऱ्या आईच्या रेसिपीज डोळ्यात ठेवून घेतल्या
आपण ही भांडी आता कधीही घासणार नाही म्हणून
ती विनाकारण भांडी घासत राहिली १५ मिनिट
मग नळाला आलेले पाणी
ती पाहत राहिली शून्य नजरेने
आता या घरात पुन्हा येईन
तेव्हा पाणी पिण्यासाठी सुद्धा विचारावे लागेल पिऊ का म्हणून
या विचाराचा काटा तिच्या अंगावर उमटला
आणि स्वयंपाक घरात शिरतानाही
मी हे केले तर चालेल का असा प्रश्न डोकावेल
या संशयाने ती काच तडकावी तशी तडकली
आतल्या आत
टीव्हीवर पाहिलेल्या कित्येक कमर्शिअल्स ज्यावरून जतीनशी वाद घातला होता
तिने स्वतःच्या चष्म्यात ठेवून दिल्या
स्वतःच्या गोऱ्या गालावर एक ओला कवडसा पडला तेव्हा
उगवलेल्या सूर्याकडे ती मावळत्या नजरेने पाहत राहिली
निघताना आनंदी दाखवण्याच्या हव्यासापोटी ती हसली खरी
पण डोळ्यातले गुलाब करपत चाललेत आणि त्यांचा धुरळा उडतोय म्हणून ती थोडी कोडंमंडली
कदाचित सासरच्या टीव्हीवर याच कमर्शियल दिसतील
पण त्यांच्यापुढे आता आई नसेल वडील नसतील भाऊ नसेल
म्हणून
तिने क्षणभर नवे उमललेले सासर ताजे केले
आणि तो माहेरचा जुना टीव्ही केसांच्या खाली अडगळीत दडवून ठेवला
आपल्या आईच्या डोळ्यातील नजर कितपत परकी झाली आहे याचा तिने अदमास घेतला
वडिलांच्या शर्टवरील साधेपणा त्यांचा दुबळापणा ठरेल का या शंकेने ती कासावीसली
भावाच्या कलंदरपणाला इस्त्री मारता मारता
फाटलेले तिचे हात
तिने नीटनेटके केले
आता तो त्याचं बघून घेईल म्हणत
आपले नशीब त्याच्या नशिबापेक्षा तिने वेगळं केले
रात्रभर जागून केलेले अभ्यास आणि स्वाध्याय
सासरला घेऊन जाता येतात कारण ज्ञान शेवटी ज्ञान असतं
असं पुटपुटत तिने पुस्तकांच्यावर कॉम्प्युटरवर शेवटची नजर फिरवली
आणि ती गाडीत बसली तेव्हा
तिच्याही नकळत तिचे हात हलले निरोपासाठी
अश्रूंच्या जागी
माहेर मधल्या एका युगाचा झालेला अस्त
साडीच्या पदरात खोचून घेऊन तिने गाडीत घेतला
गाडी निघाली तेव्हा तिचे सासर तिच्या आईला दिसत नव्हते
आणि तिला तिचे माहेर हळूहळू अदृश्य होताना दिसत होते
ती हळूहळू नाहीशी झाली तेव्हा
माहेरचा तुकडा आकाशात उडाला
ज्यात कित्येक ढग होते
आणि मग
पाऊस पडला मेंदूत तेव्हा
सर्वजण ओले होत होते
रडण्यावर नियंत्रण मिळवू पाहणाऱ्या डोळ्यांत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment