मोक्ष आफ्टर इफेक्ट

 १

कुत्री नागडी झिंडतायेत 


त्यांना माहित नाही कपडे काय असतात 

त्यांच्यात थंडी सहन करण्याची ताकद आहे 

ती उन्हाला घाबरत नाहीयेत 


कपड्याशिवाय त्यांचे काही अडलेले आहे 

असेही वाटत नाही 


ती आहेत नागडी मोकळीढाकळी 

एकमेकांवर भुंकताना 

त्यांचे कपडे मध्ये येत नाहीत त्यांची त्वचा मध्ये येत नाही 


कुत्री एकमेकाला 

आपण जसे आहोत तसेच दाखवत आहेत 


कुत्री न्यूड आहेत



एक श्रीमंत बाई 

एक दयावंत बाई

जिच्या जवळ निष्ठावंत माणसे शिल्लक नाहीत 

निष्ठा पाळायची म्हणून 

आता माणसांच्या ऐवजी कुत्री पाळतीये 


तिला थंडी सहन होत नाहीये 

आणि तिला असं वाटतंय 

की तिच्या कुत्र्यालाही थंडी सहन होत नाहीये 

ती श्रीमंत आहे 

आणि ती कुत्रे अफॉर्ड करू शकते 

कापड अफर्ड करू शकते

आणि थंडी अफॉर्ड करू शकत नाही 

तिला थंडीशी मुकाबला करायचाय 

आणि तिचे कुत्रे आरामात थंडीशी मुकाबला करतय 




एका श्रीमंत बाईला 

तिचं कुत्र थंडीत काकडतय असं वाटतंय 

कुत्र्याला काकडxxx म्हणता येत नाही 

कुत्र्याला ईश्वराविषयीचे प्रश्न पडत नाहीत 

कुत्रा फिलॉसॉफर नाही 

कुत्रा फक्त कुत्रा आहे 

कुत्रा साक्षात निष्ठा आहे 


आणि कुत्रा थंडीने कापतोय असे श्रीमंत बाईला वाटतेय 


तिला टेलरिंग येते 

आणि ती कुत्र्यासाठी कपडे शिवतिये 



टेलरिंग येणाऱ्या बाईला 

कुत्रा कपड्यात हवाय 


आणि कुत्रा 

तिने शिवलेल्या कपड्यात आहे 



तिचा कुत्रा चाललाय 

तिने ठरवलेल्या मापातले 

तिने शिवलेल्या मापातले 

कपडे घालत 


इतर कुत्र्यांना समजत नाही 

हे या कुत्र्याच्या अंगावर काय 

आणि त्याला माणसाचा वास कसा येतो


त्यांना वाटतंय ही वेगळी त्वचा आहे 

ते ही त्वचा बारकाईने पाहत आहेत 

त्यांच्यासाठी हे अद्भुत आहे 


या त्वचेचा वासही वेगळा येतोय 

आणि ती पुन्हा पुन्हा कपडे हुंगताहेत


कुत्र्याला आपल्याला मिळणारा हा मान सन्मान वाटतोय 


तो आनंदाने थुई थुई नाचतोय 

ट्रेडिंग येणारी बाई 

टेलरिंग येणारी बाई 

हे सर्व शूट करून 

ऑनलाइन टाकतीये 


कपडे घालणारा तिचा कुत्रा प्रचंड लोकप्रिय होत चाललाय 

तिला आयडेंटिटी मिळत चाललीये 


"डॉग टेलर"

"डॉग फॅशन डिझायनर"




कपड्यांना येणारा वास अभूतपूर्व आहे 

असा वास कुठल्याच कुत्र्याच्या त्वचेला येत नाहीये 

श्रीमंत माणसाचे कुत्रे आता कपडे घालून रोज हिंडतोय 


त्यालाही हळूहळू कपडा चढत चाललाय 


माणसे मात्र म्हणतात 

श्रीमंत घरचे श्वान 

त्याचा कपडाही महान



तिसरी श्रीमंत बाई 

आता कुत्र्याला कपडा घालतीये 


तिचाही कुत्रा आता डौलात हिंडतोय 


सर्वच कुत्र्यांना जाणीव होतीये 

एक नवी त्वचा अवतरतीये 

आणि दुर्दैवाने आपल्याकडे ती त्वचा नाहीये 


रस्त्यावरची कुत्री मिटींग घेतायत


त्यांना कळत नाही 

अशी वेगळी त्वचा असलेल्या कुत्र्यांचं करायचं काय? 


त्यांना कुत्रा म्हणून मान्यता देणे कंटिन्यू ठेवायचे 

की त्यांना माणसाचा वास येतो म्हणून होमोसेपियन समजायचे?



कुत्र्यांची एक नवी जमात तयार होतीये 

कपडे घालणारी जमात 

होमो सेपियनिक कुत्री 


कपडे नसलेली कुत्री 

कपडे असलेल्या कुत्र्यांना मान देतायत 

त्यांना थंडी लागणार नाही 

याची त्यांना आता खात्री पटत चाललीये 

त्यांना प्रथमच आपल्या थंडीचा अहसास होतोय


कुत्र्यांच्या तीन जमाती तयार होतात 

श्रीमंतांची कुत्री 

ज्यांच्याजवळ कपडे आहेत

गरिब घरांची कुत्री

ज्यांच्याजवळ कपडे नाही 


आणि जंगली कुत्री 

त्यांना कपडे असतात हे माहीतच नाही



कपडेबाज कुत्री वाढत चाललेत 

कुत्र्यांच्या कपड्यांसाठी स्पेशल दुकाने तयार होत आहेत 

माणसांच्यातही दोन जमाती तयार झालेत 

एक कुत्र्यांना कपडे घालणारीं 

दुसरी कुत्र्यांना नागडे ठेवणारी


१०


हळूहळू प्रत्येक कुत्र्याला आता कपडे हवे आहेत 

ती कपड्यांच्यासाठी 

माणसांच्या वर हल्ले करायला तयार आहेत


इतक्या साऱ्या कुत्र्यांना कपडे कसे पुरवायचे ?

ज्या गरिबांच्या जवळ स्वतःच कपडे घालायला नाहीत त्यांनी कुत्र्यांना कपडे कसे द्यायचे ?


कुत्री आता गरिबांना सुद्धा हाडहुड करायला लागलेली आहेत 

जो कपडा देत नाही तो मालक कसा असा प्रश्न विचारायला लागलेलीं आहेत


११


अधून मधून कपड्यासाठी गरिबांच्या वर हल्ले होतायत 

सरकार नेहमीप्रमाणेच या संदर्भात काहीच करत नाहीये 

सरकारचे म्हणणे असे 

कुत्र्यांचे कपडे ही आमची जबाबदारी नाही 

कुत्र्यांना कपडे घालण्याची स्टाईल जनतेने स्वतः सुरू केलेली आहे आणि आता जनतेने स्वतःच्या जबाबदारीवर कपडे बाजी करावी

आम्ही जनतेला कधीही कुत्र्यांना कपडे घाला असे म्हटले नव्हते 

जनतेने स्वतःहून ओढवून घेतलेला हा रोग आहे 

जनतेने स्वतःच इलाज करावा 

कुत्र्यांना इजा झाली तर मात्र प्राणी कायद्यांच्याखाली माणसांना अटक होईल 


कुत्री हल्ले करत आहेत 

आणि गरिबांचे कपडे कमवत आहेत 


गरिबांना समजत नाही आता कुत्र्यांच्या पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ?


एकेकाळी गरिबांच्या घरी असणारी कुत्री आता फक्त श्रीमंतांच्या घरी नांदतायेत 


हळूहळू गरीब कुत्रामुक्त होत चाललाय 


कोणालाच कळत नाहीये 

कुत्र्याबरोबर निष्ठा गायब होणार आहे काय ?


कुत्री स्पेशालिस्ट तयार झालेत 

कुत्री टेलर्स तयार झालेत 

कुत्री फॅशन डिझायनर तयार झालेत 

कुत्री सायकोलॉजिस्ट तयार झाले 

कुत्री सायकॅट्रिक तयार झालेत


एकंदरच कुत्र्यांचा गवगवा वाढतो आहे 

आणि आता कुत्री सुद्धा एकमेकांवर भुंकतायेत 

तुझा कपडा श्रेष्ठ की माझा कपडा श्रेष्ठ ?

माझा कपडा ज्यादा स्वच्छ की तुझा कपडा ज्यादा स्वच्छ ?

माझ्या मालकीनीची वॉशिंग पावडर श्रेष्ठ की तुझ्या मालकिणीची वॉशिंग पावडर श्रेष्ठ?



१२


भुंकणे वाढत चाललेले आहे आणि आता माणसांना कळत नाहीये की 

कुत्र्यांचं करायचं काय ?


कारण कुत्री कपडे घातल्याने आता सभ्य झालेली आहेत 

सभेत सभ्य म्हणून मान्यता पावलेली आहे 

त्यांच्या भुंकण्याला सभ्य भुंकणे मानले जात आहे 

ॲनिमल ॲक्टनुसार भुंकणाऱ्या कुत्र्याला अटकाव घालण्याची कसलीही तरतुद कायद्यात नाही त्यामुळे भुंकणे अलाव आहे

आणि कुत्रे आहेत की फक्त भुंकतायत भुंकतायत भुंकतायत

त्यांना प्रथमच आपल्या भुंकण्याचा साक्षात्कार होते 

जो सर्वाधिक भुंकतोय तो सत्ताधारी होतोय 

श्रीमंताघरी श्वान होण्याची स्पर्धा आयोजित केली जातीये 

जो जिंकतोय त्याला मिस्टर श्रीमंत श्वान किंवा मिसेस श्रीमंत श्वान असे किताब दिले जात आहेत

आणि त्यांची रवानगी जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाकडे होते आहे


१३

फॅशन स्पेशलिस्ट श्रीमंत कुत्र्यांच्या कपड्यांचे श्रीमंत अनालिसिस करतायत 


कुत्र्यांच्या कपड्याचे एनालिसिस चे कॉलम सुरू आहेत 


टॉक् शो सुरू आहेत 

अनेक कुत्री टीव्ही समोर मोबाईल समोर आजकाल आपल्या विषयीचे टॉक्स बघत असतात आणि आपले कपडे ठरवत असतात 


त्यांचे टीआरपी सुद्धा कुत्र्यांच्यामुळे निश्चित होत आहेत


आज-काल कुत्र्यांना सुद्धा चॉईस विचारला जातोय 

कुत्री आपल्या पसंतीचे कपडे आपल्या पसंतीची डिझाईन स्वतः सिलेक्ट करतायत 

त्यांना माफक मोबाईल येतो असा त्यांचाही समज आहे 


१४


गरिबांच्या जवळ कुत्री उरलेली नाहीत 


एक खलनायक श्रीमंत तर आता आपण गरिबांनाच कुत्री का समजू नये असा प्रश्न विचारतोय 


मला कळत नाही 

कुत्री माणसांना घडवतायेत की माणसे कुत्र्यांना घडवत आहेत ?


श्रीमंती सुद्धा श्रीमंताकडे किती कुत्रे आहेत त्यावर ठरते आहे 


कुत्र्यांना मोक्ष माहीत नाही पण कुत्र्यांना धर्म प्राप्त होत आहे 

त्याला डॉग रिलिजन म्हणावे का ?


कुत्री आता बाजारात दाखल झालेली आहेत 

त्यांचा आठवड्याला बाजार भरतो आहे 

त्यांची ऑनलाइन सुद्धा खरेदी विक्री होते आहे 

आणि श्रीमंत कुत्री विकत घेतायेत


गरीब आहेत की त्यांच्याजवळ कुत्रीच नाहीत 


गरिबांच्या जवळ दोनच पर्याय आहेत 

एक तर स्वतः कुत्र्यासारखं व्हायचं 

किंवा गरीब रहायचं 


१५


मी आता कविता लिहिण्याऐवजी भुंकणे लिहावे का


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट या काव्य फायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना