चॅनेल स्पीरी च्युअल डिसेंबर

जानेवारी


मोबाईल नाकारण्याऱ्यासाठी श्रीधर तिळवे नाईक 


जोवर तुम्ही मोबाईल होत नाही तोवर 

तुम्ही मेलेले असता

तुमचा प्रवास फक्त स्वतःचा घेतलेला वास असतो 

तुमचे वाचन फक्त शववाचन असते 

तुमच्या आसपास फक्त वाळवंट असते 

आणि तुम्ही आयुष्यभर स्वतःला चंपा नि चमेली समजत राहता 


हळूहळू लँडफोन मध्ये मरत जाताना 

एमटीएनएलबरोबर तुम्हीही मरणार आहात 

तुमचा उत्सव उत्साह न टिकता 

शिळा होत जाणार आहे 


तुम्ही म्हणाल की ही ताजेपणा संपवण्याची युक्ती आहे 

पण नव्या दिशेने सरकलेली ही शक्ती आहे 

तिची सक्ती नाही 

पण सर्वांना तिची आसक्ती आहे


कोणतेही युग आसक्तीच्या तिच्या दिशेनेच जाते

हेही


तेव्हा ठरवा मोबाईल व्हायचं की एमटीएनएल मध्येच लँड फोन होऊन मिरवायचं


यावर एक मध्य आहे 

मोबाईल होण्याचा आणि घरात परतण्याचाही 

या दोघांचा समतोल साधाल 

तरच जगणे 

सुखाचे नाही तरी वाढीचे असेल 


पहा मोबाईल आणि घर यांचा समतोल साधता येतो का 


नाहीतर शवलेखन ऑन आहेच 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल स्पिरीच्यूअल् ह्या काव्यफायलीतून)

काही लोकांना मंबाजीचा रोल आवडतो

त्यांना तो करू दे 


त्यांच्या मत्सरांना मच्छर बनव 

म्हणजे त्यांना रक्त पिल्याचे समाधान 


स्पर्धा अशी आहे 

की भल्या भल्यांना उचकवत आहे 


लोक स्वतःहून आतल्या बागांची कोंडी करतायेत 

आणि जंगले तर कधीच तोडायला सुरुवात केलेली 


इको फ्रेंडली मोक्षाचा काळ कधीच संपला 

आता बुद्धांना सुद्धा ऑक्सीजनची चिंता पडते 


हे त्याच लोकांचे वंशज आहेत 

ज्यांनी बुद्धांचा उपदेश ऐकला नाही


तेव्हा जास्त अपेक्षा नको 

ऐकू येईल फक्त इको 


नशीब की तुझ्या धर्मात 

घंटा वाजवायची पद्धत आहे 

लोक बिझी राहतात 


आणि आता तर सारी रिलेशनशिप लॉंग डिस्टन्स वर 

त्यामुळे मंबाजी आता इंटरनेटवर 

बोचक बोचक बोचकणारे 


तुला संयम ठेवता येणार आहे का हा खरा प्रश्न आहे 


खेळवत रहा मंबाजींना त्वचेवर 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)


 ९९% लोकांचा परमनंट आणि सततचा द्वेष 


किमान तीन हजार वेळा केले गेलेले अपमान 


तुझ्या वसंतावर सुद्धा मुतून जाणारे अहंकार 


तुझ्या जीभेत निखारे आहेत म्हणून होणारे अपप्रचार 


त्वचेला जास्तीत जास्त भोके पाडण्याचे भीषण डावपेच 


तुझ्या काळजात तू दगड ठेवावेस म्हणून नाजूक भाषेत होणारे अट्टाहास 

आणि शेवटी येणाऱ्या धमक्या


हे सर्व घेऊन तू मराठी संस्कृतीत काय करतो आहेस ?


आजोबावरचा बहिष्कार पुरेसा पडत नाही का तुला 

म्हणून आता अवदसा सुचतीये?


तुझ्या साधनेची टवाळकी 

तुझ्या मार्गाचे बांधकाम ढिले करणारे दगड 

कोण धाडतंय ?


आयुष्य त्यांच्या हिशेबाने जगला नाहीस म्हणून 

तुझा हिशेब कसा धुळीस मिळवता येईल याचा मांडलेला त्यांनी खेळखंडोबा


ज्योतिषापासून वॉचमनगिरी पर्यंत काय काय तमाशे केलेस जगण्यासाठी 

पण शेवटी तुला धड सोंगाड्या म्हणून सुद्धा जगू दिले नाही मराठी लोकांनी 


मोक्ष मिळवायचा असेल तर प्रथम ह्या संस्कृतीच्या बाहेर जा 


हे तेच लोक आहेत ज्यांनी नामदेवांना पंजाब मध्ये पाठवले आणि एकनाथांना पाण्यात बुडवले 


ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना जलसमाधी घ्यायला लावून 

मग त्यांच्या जिवंतपणीच्या समाधीवर 

आणि साहित्यातील अमृततत्त्वावर

व्याख्यान देणारे हे निर्ढावलेले लोक 


शैव संतांचा तर आत्ता पत्ता सुद्धा ठेवलेला नाही या लोकांनी

हिशेब तर खूपच दूर


शरीरातल्या शरीरात कधी वारतोस 

हे विचारत नाहीत 

हेच नशीब समज 


बघ बाबा 

कदाचित मोक्षच असेल फिक्शन 

आणि हे लोकच असतील कदाचित खरीखुरी रिएक्शन 


आणि समज मिळवलास मोक्ष तर हे तुला फिक्शन मध्ये गुंडाळून ठेवणार नाहीत याची काय खात्री?


तेव्हा कुठल्याही परंपरेमध्ये उभा राहू नकोस 

परंपरेत पाणी वाहत नाही एवढे आता नक्की झाले आहे 


तेव्हा पोहण्याचा सिल्याबस इरेझ करून टाक 

आणि वाळवंटात पायांचा उंट करून चालायला सुरुवात कर


तुझा एकांत सिलिकॉन व्हॅली ना होवो 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल 

या काव्यफायलीतून)


माझी सावली मोठी पडते 

आणि प्रॉब्लेम सुरू होतात 


मी मला माहित असलेल्या गोष्टींच्या वर बोलतो 

मित्रांना वाटते मी हस्तक्षेप करतो 


मी खरे तर प्रोटोकॉल पाळतो 

तरीही माझी वेळ आल्यावर मी जेव्हा बोलतो 

तेव्हा माझी सावली मोठी पडते 

आणि प्रॉब्लेम सुरू होतात 


मला खरे तर काहीच सुरू करायचे नसते 

पण मी बोलतो 

आणि माझी सावली पडायला सुरुवात होते

मला फक्त सत्य बोलायचे असते मी सत्य बोलतो 

पण सत्याची सावली मोठी पडते 

आणि प्रॉब्लेम सुरू होतात 


मग उंची कमी करण्यासाठी 

मला बुटके ठरवण्यासाठी 

मला फिटिंग मध्ये बसवण्यासाठी 

लोक नाना गोष्टी करतात 

पण माझी सावली उंच पडते 

आणि प्रॉब्लेम सुरू होतात 


नको तितक्या विषयात गती 

नको तितक्या विषयांची खोली 

लोकांना ऑलराऊंडर फक्त क्रिकेट खेळताना आवडतात 

मी ऑल राऊंडर होतो 

माझी सावली डेरेदार पडते आणि प्रॉब्लेम सुरू होतात 


मला कळत नाही 

हा प्रॉब्लेम हाताळायचा कसा ?


लोकांच्या अहंकाराला ठेच न लावता 

मी जगायला गेलो 

की मी खोटा पडतो 

आणि मग माझी सावलीही पडत नाही 

आणि माझ्या लक्षात येते 

की मी अंधारात उभा आहे 


नाईलाजाने मी उन्हात येतो आणि माझी सावली पडते 

आणि माझे प्रॉब्लेम सुरू होतात


आता मी माझ्या सावलीकडे लक्ष देत नाही 

माझ्या देहात जे उकळते 

ते मी नदीसारखे सांडत जातो 


वाटेत आडवा येणारा प्रत्येक अडथळा 

माझ्या पाण्याने दूर करतो 

मी वाहतो 

वाहत राहतो 


मला खात्री आहे 

माझ्या पाण्याची सावली पडत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल: स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)

एक तर थ्रिलर आहे 

किंवा थिल्लर आहे 


ते चिल्लर वाजवत जाणार 

आणि इकॉनोमी बळकावणार 


लोकांना नाण्यांचा आवाज 

भुरळ पाडतो 

ते नोटा नाकारून चिल्लरच्या मागे धावतात 


साहजिकच खिसेकापुंचें राज्य येते 

ते स्वतःचा कंपू बनवून 

लोकांची नोटांनी भरलेली पाकिटे लंपास करत राहतात 

आणि चिल्लर मात्र वाजवण्यासाठी खिशात सोडून देतात 


थिल्लर लोकांनी थ्रिलर म्हणून सोडलेली चिल्लर लोकांची चिल्लर वाजतीये

आणि लोक आवाजात खुश आहेत 


तेव्हा बघ 

तू असा 

ज्याला नाही खिसा 


त्यामुळे ना चिल्लर 

ना नोटा 


संन्यासी असल्याचा एकच फायदा 


नोटा आणि चिल्लर यांच्यातला फरक कळतो 


बाकी देहाचे भिक्षापात्र 

खिसा बनू देऊ नकोस म्हणजे झालं 


स्वतःला पॉलिटिकल होऊ न देण्याचा तोच एक उपाय आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)


भारतीय म्हणून जन्मलायस 

पण अमेरिकेत जाऊन मर 

किंवा इंग्लंडमध्ये किंवा 

कुठेही परदेशात 


घेत रहा देशाचे नाव 

अभिमानाने सांगत रहा इथली परंपरा 

इथले धर्म 

इथले संत 

इथले सिद्ध 

इथले बुद्ध 

इथले क्लासिकल कलाकार 


परदेशात त्यांची डिमांड प्रचंड आहे 

त्यामुळे त्यांना अधिक डिमांडेबल बनव 

त्यामुळे मिळणारी इज्जत कमवत राहा

पण इथे मरू नकोस 

परदेशात जा  

आणि परदेशी नागरिकत्व घेऊन परदेशात मर


शक्य आहे की तुझा पूर्वज या देशासाठी लढला असेल 

या देशातल्या त्याच्या शौर्यगाथा वंदनीय असतील 

पण तुला भारतासाठी लढायचं असेलच असे नाही 

परदेशात जा 

भारताविरोधात लढ 

आणि लढता लढता भारतातल्या परंपराविषयी बोल 


कदाचित तुझा पूर्वज असेल इथला उद्योगपती 

परदेशात त्याच्या नावाने मोठा बिझनेस सेटअप कर 

कर चालू 

एक इंटरनॅशनल ब्रँड 

इथे इन्कम टॅक्स जास्त आहे

इथले रोड खराब आहेत 

इथली जनता करप्ट आहे 

अशी कारणे दे 

परदेशात गेल्यामुळे तू कसा करप्ट नाहीस

परदेशात गेल्यामुळे तू कसा सद्गुनी आहेस 

ते पटवून दे

देशाविषयी कर्तव्य कोणाला आहे 

ज्याला त्याला स्वतःला 

हाच तर आहे हिशेब इथला 

हिशेब सांभाळत परदेशात जा

कमव 

आणि परदेशात मर 

पण मरताना या देशातील परंपरा सांगत रहा 


पैसा नसेल तर ज्ञान घेऊन जा 

तिथल्या ज्ञानाची सेवा कर 

तिथल्या इन्स्टिट्यूशन मध्ये झेंडे लाव 

इथले लोक तुला भारतीय म्हणून मिळतील 

व्याख्यानाला बोलवतील 

त्यात स्वतःचे सार्थकत्व सिद्ध कर 

त्यात त्यांनाही सार्थकत्व वाटेल असे बोल

शेवटी विद्वान माणूस कुठल्याच देशाचा नसतो 

असे संस्कृत परंपरेने म्हटलेलेच आहे 

तेव्हा परदेशात ज्ञान तयार कर 

इथल्या लोकांना ते भरव 

म्हणजेच इथल्या लोकांनाही तू मोठा वाटशील 

भारतातल्या विद्वानांना इथे खाटांचीही किंमत नाही

तेव्हा फॉरेन रिटर्नचा शिक्का घे 

तिथल्या ज्ञानात ज्ञानपरंपरेत सेटल हो 

मात्र इथली परंपरा सांगायला विसरू नको 

ती सांगत सांगतच परदेशात मर


काळजी करू नको 

तुझ्या सारखे अनेक आहेत 

जे भारताचा यथेच्छ अभिमान बाळगतात 

भारताविषयी खूप खूप बोलतात 

मुलांना मात्र परदेशात सेटल व्हायला पाठवतात 

त्यांना भारताविषयी काय वाटते 

कसला अभिमान वाटतो 

देशाभिमान वाटतो म्हणजे काय वाटते

प्रश्न विचारू नको 

कारण जो तो कम्फर्टेबल असणे शोधतो 

किंबहुना भारतीय असण्याचा अर्थच 

आपल्यापुरते आपले पाहणे आणि कम्फर्टेबल जगणे 

तेव्हा तुही भारतीय आहेस 

देशाशी कशाला कर्तव्य आहे 

फक्त देशाच्या नावाने परंपरा मिरवता आली पाहिजे 

ती परंपरा मिरवत रहा 

सगळा धंदा सगळे तोड पाणी परदेशात सेटल कर 


भारतीय म्हणून जन्मलास 

पण परदेशात मर 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)

लोकांचे खरे नायक 

अभिनेता किंवा क्रिकेटर आहेत 

लोकांचे खरे नायक ते नाहीत 

जे लोकांचं आयुष्य बदलतात 


म्हणजे उदाहरणार्थ सायंटिस्ट 

जे त्यांना ज्ञान देतात 

किंवा तंत्र वैज्ञानिक 

जे त्यांच्यासाठी सोयी आणि सुविधा निर्माण करतात 


लोकांना सायकलचा शोध घेणारा 

महत्त्वाचा वाटत नाही 

सायकलच्या जाहिरातीत अभिनय करणारा महत्त्वाचा वाटतो 


तर लोक नालायक आहेत 

आणि हे लोकांना सांगण्याची धमक 

कुणातच नाही 


लोकांना सत्ता निर्माण करणारे लोक आवडतात 

त्यांना सत्तेने घातलेल्या शिव्या आवडतात 

कारण लोक मुळात सत्ताप्रोन आहेत 

नालायक आहेत 

त्यांना भ्रष्टाचार करणारे आवडतात 


तू लोकांच्या नादी लागू नकोस 

शांतपणे लोकांच्यातून कसा मुक्त होशील ते बघ 


प्रसिद्धीच्या मागे लागशील 

तर कधीही सिद्ध होणार नाहीस प्रसिद्ध होशील


लोकांना पुजायला देव लागतात 

आणि देव म्हणून त्यांना काहीही चालते 

कधी सिद्धही 

पण सिद्ध त्यांना देव म्हणून तेव्हाच चालतात 

जेव्हा त्यांच्या नवसाला ते पावतात 

हा विजय सिद्ध होण्याचा नाही 

योगायोगाने नवसाला पावण्याचा आहे 

तेव्हा देव होऊ नकोस 

कोणालाही पाया पडू देऊ नकोस 


पाया पडू देणारे सिद्ध होत नाहीत 

मोक्षात पाया असतो 

ते सिद्ध होतात 


लोकांच्या नादाला लागून त्यांना हवे तसे पाय हलवू नकोस 

सिद्ध म्हणजे सामूहिक नृत्य नव्हे 

ही स्वतःत नाचण्याची कला आहे 


लोकांच्या बद्दल करुणा बाळग 

पण मागच्या लोकांनी दिल्या तशा टाळ्या देऊ नकोस 

ते जिथे मूर्ख आहेत 

तिथे मूर्ख आहेत असेच सांग 


लोक शहाणे असते 

तर हे जग असे राहिलेच नसते 


तेव्हा हे वरवरचे सरफेस 

डॉमिनेट करून घेऊ नकोस 


हे वरवरची बोटे 

मेंदू बनू देऊ नकोस 


हे वरवरचे मेकअपचे तामझाम 

चेहऱ्यावर लादून त्यांचे ताजमहाल बनू देऊ नकोस 


ही दुनियादारी आहे 

आणि ती विषारी आहे 


ही जग रहाटी आहे 

आणि इथे आसक्त्यांची दाटीवाटी आहे 


हा व्यवहार आहे 

आणि तिथे प्रेमाचा अभाव आहे 


दया दाखवू नकोस 

फक्त करुणा ठेव


हे अज्ञान नाही 

हा लोकांनी जाणून-बजून स्वीकारलेला व्यवहार आहे 

आणि लोक हुशार आहेत 


सर्वांना स्वीकार 

मात्र वेळ आली तर फाट्यावर मारण्याची तयारी ठेव 


जंगलात पाठवतील 

एकांतात पाठवतील 

तुझ्याबद्दल एक उग्रता साठवतील 


पेटवतील तुला टॉन्सनी 

विचलित होऊ नकोस 

प्राणचलित रहा 


असण्यामध्ये आसन घाल 

यांच्या बैठकीला अटेंड करू नकोस 


आयामांना यम दे 

चेष्टेला भीक घालू नकोस 


ते पुन्हा पुन्हा बारमध्ये नेतील 

दारूचा आग्रह धरतील 

नकाराला उघड ठेव 


ते काड्या टाकतील 

तू माचीस जाळून टाक 


एकांतात एक आहेस 

शून्य होण्याचा प्रयत्न कर 


शेवटी खरे आयुष्य हे ब्लँक चेक सारखे असते 

जो त्यावर शून्य लिहू शकतो 

तो खरा श्रीमंत 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल या काव्यफायलीतून))

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना