निर्वाणा पूर्वीच्या कविता
स्टेटसची भूछत्रे चायनीज कर
तणावांच्या ताणांना बाण म्हणून मार
आपले एहसास सापेक्ष होत चाललेत
व्यक्तिगत फोकस फिक्स केले गेलेत
तू आहेस केवळ एक स्टिकर
स्टेटसला चिटकून असलेला
पर्सनॅलिटी ड्रॉपिंग
डम्पिंग झोनमध्ये जाणार
ह्याचा शोक नको
लोकांना स्वतःच्या भावनाही नीट कळत नाहीयेत
त्यामुळे गुलज़ारवर गुजारा अटळ
रोमँटिक राहशील तर लोकप्रियतेचा कडबा चघळशील
जो विद्यापीठमान्य आहे
आंडू पांडू स्टेटस गांडू
विटी थिटी लुळा दांडू
पॅराडॉक्सचंही सर्कल बनत चाललंय अद्याप
अहंकारासाठी हा सर्वोत्कृष्ट काळ आहे अद्याप
भय सगळ्यांना सांभाळतंय अद्याप
तेव्हा बघ
मोक्षाकडं वळायचं तर प्रथम स्टेट्स ड्रॉप करावं लागेल
आणि भयाची सुरवात आजकाल स्टेट्स सांभाळण्यापासून होते
अन्यथा दुर्बिणीतून आकाश पाहण्याचे फन्डिंग जमव
आणि तारे मोजताना विश्वात ढवळाढवळ केल्याचे समाधान मिळव
पळून कुठेही गेलास तरी पृथ्वी अपरिहार्य आहे -अद्याप
श्रीधर तिळवे -नाईक
(निर्वाणापूर्वीच्या कविता 2012 -2014 ह्या काव्यफाइलीतून )
Comments
Post a Comment