Channel Lover Terror and Horror

 “कवी आणि मुसलमान 

ह्यांच्यात मला फरक वाटत नाहीये 


दोघेही एहसास हाच श्वास 


दोघेही कवितेला बुरखा चढवत 

तिची मिस्ट्री वाढवत 

गुलामी चढवत 


कवी पुरुषसत्ताकच 


कवितेत भावनेचा समुद्र 

प्रत्यक्षात नळाला पाणी नाही 


कवितेत वायरीच वायरी 

प्रत्यक्षात लायटीची बिलं भरलेली नाहीयेत 


कवितेत चुकीच्या एकांतात बरोबर रस्ते गुणगुणत 

प्रत्यक्षात पत्ता विचारला कि माहीत नाही 


असं सगळंच भावनेवर आणि श्रद्धेवर सोडून कसं चालेल 

इल्मभी कोई चीज होती है ना ?”


ती बडबडतीये 

मी तिला अनुभवतोय 


तिच्या सरळ नाकाच्या नाक्यावर माझ्या डोळ्यांचा नाकतोडा 

तिच्या अरेबिक डोळ्यात मी संस्कृतमध्ये नमाज पढत 


ती म्हणतीये तू चालतं बोलतं वाळवंट आहेस 

मी म्हणतोय माझ्यात नक्की तेलाच्या विहिरी सापडतील 

ज्या तुला रईस बनवतील 


ती चाललीये 

माझ्या डोकयावर पळी हाणून 

माझं एहसासाचं आकाश काखेत मारत 


आणि मी चांदण्याचांदण्यातून तीळ तीळ तुटत

माहीत नाही 

तिच्या बुरख्यातल्या कुठल्या ब्लॅक होलमध्ये कोसळणार आहे   


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरींजमधील चॅनेल टेररिझम अर्थात टेरर हॉरर आणि लवर ह्या काव्यफाईलीतून )


सिमुलेशन मध्ये जगायला भाग पाडणारी स्टिम्युलेशंस 


स्वतःच्याच कॉपीचा रवा पाडा म्हणून मागे लागलेले माहितीचे जमीनदार 


ओरिजिनलिटी क्लेम करायला जावी 

तर ब्लड लाइन्स गायब 


मी सर्वत्र दिसतोय 

पण माझा डीएनए गायब आहे 


पूर्वजांनी पास केलेल्या इन्फॉर्मेशनचे गुडघे मोडलेले 


क्वांटम सुद्धा फँटम झाले 

आणि फिजिक्सने तर फक्त माझ्यासाठी व्यायाम शाळा सुरू केलेली आहे


कपाळावर विश्वासार्हतेचा पुरावा 

आलाय म्हणून बरं 

अन्यथा माझ्या मेंदू सकट मला 

 गायब करण्यात आलं असतं 


पाठीवरची ओझी ठाम विधाने असतात 

त्यांना शॉपिंग बॅगमध्ये कोंबलं म्हणून 

आयुष्याचा झालेला मॉल थोडाच नजरेआड करता येतो ?


लहानपणी ही माझी जागा आहे म्हणून क्लेम करणारा खट्याळपणा 

आता सरकार नावाच्या गोष्टीत करपला गेलाय 


ईश्वराच्या हातात सुद्धा सर्वांना सुरे दिसायला लागलेले 


अहिंसेचा किमान फतवा कोणीच कसा जारी करत नाही 


मरणारा मरतोय 

पाहणारे फक्त व्हिडिओ पाहतात 


आकाश तर फक्त सॅटेलाईट फिरवण्यासाठीच बनलं होतं 


सगळ्यांचीच भाषा एकसारखी झालेली 

आणि युनिव्हर्सल ग्रामरचा पत्ता नाही 


माझ्यासमोर एक टेररिस्ट सिम्युलेटेड झालेला 


आणि मी स्वगतं झाडतोय 


 नि:शस्त्र माणसाजवळ भाषेशिवाय काय असतं?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव टेरर अँड टेररिझम या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना