चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सेट्रा
Jan
नकार स्वीकारताना श्रीधर तिळवे नाईक
ऐनवेळी आलेला नको
आणि मी क्षणात झालेलो ठप्प
झाडे खुजी पण बाहेर इको
भयावह
सार्थकतेकडे निघालेला पिसारा
झडून झडून पाचोळा
तू डिजिटलवरून बोलवलं
आणि आता बॉडियलवर नाकारतेयस
कम्युनिकेशन म्हणजे मांस नव्हे
इंटरनेटचा एक छत्री अंमल म्हणजे
छत्री न्हवे
पावसाळा तर नव्हेच नव्हे
एकमेकाला काय प्रोजेक्ट केले ?
आणि एकमेकासाठी आता आपण काय आहोत ?
तुझ्या चेहऱ्याच्या वाफा गरम झाल्या होत्या
आणि अचानक किटली काळजातनं उडाली
शांत झाली
त्वचेवर उमललेला मुलायम स्पर्शसंभार
भार वाटायला लागला
बॉडीमध्ये ना कोळसा जळतोय
ना स्क्रीन
आमंत्रण म्हणजे लग्न न्हवते तर
दूध नासले म्हणून मी तुला दोष देत नाही
मी डिजिटल अग्नीवर भाळलो
आणि मला चेक करण्यासाठी देहाचा
एकही रीयल नाका उपलब्ध नव्हता
या मर्यादेवर मी थोडासा नाराज आहे
हे वेळ वाया गेल्याचे दुःख आहे का ?
क्षण मामुली वाटतात जेव्हा ते सफल होतात
आता एकेक क्षण भरघोस
मी हलका व्हायला आलो होतो
आणि तुझ्या नकाराच्या वजनाने
थोडा अधिक वजनदार होत
स्पर्शातून रिटायर होऊन निघालोय
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनल लव्ह सेक्स अँड एलसेट्रा ह्या काव्यफायलीतून)
सेक्सी म्हणजे स्पर्श समृध्दीने ओथंबलेली/ला
स्पर्शाळ
मी स्पर्शाने काटा काढण्यात निपुण आहे
तू स्पर्शाची फुले करण्यात वाकबगार आहेस का
जगात तीनच जाती असतात
स्पर्शाला सोकावलेले
स्पर्श शून्यतेत धन्यता मानणारे
आणि तिसरे आदले आणि मधले
मी तुझ्याविषयी ऐकून आहे
पण सेक्स बाबत
सत्य कमी आणि अफवाच जास्त असतात
शिवाय कम्फर्टेबिलिटी कम्पॅटीबिलिटीचा प्रश्न आहेच
मी अशाही एका स्त्रीवर प्रेम केले
जिच्यावर माझे प्रेम होते
पण जीच्याबद्दल मला कधीही सेक्सुअल अट्रॅक्शन वाटले नाही
तेव्हा शरीरं जुळून यावी लागतात
नुसती जमवून भागत नाहीत
शिवाय मर्यादा ठरवावी लागते
म्हणजे मी काही माझी मोक्षाची साधना सोडणार नाही
म्हणजे मी काही लग्न करणार नाही
संसार मुलांच्या पासून सुरू होतो आणि मी मुलांना जन्म द्यायला तयार नाही
तेव्हा बघ
मनोरंजन हवे असेल तर शरीररंजनाकडे वळ
नाहीतर तू अवयवांनी गाणी गायाचीस
आणि मी प्रसन्न व्हायचोचं नाही
किंवा उलट
मला तू झेबऱ्यासारखी दिसायला लागलेली आहेस
घोडा लावायला कधी येतेस?
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल : लव्ह , सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
मला ह्या किलिंग मशिनकडून मरू द्या
मोक्षाचा बल्ल्या झालाय
निदान प्रेमात तरी स्वतःला नीट पुरु द्या
माझं हृदय झालंय सेप्टिक
आणि ती आहे पेंसिमिस्टिक
ती पॉइझन असेल तर पॉइझन नीट पत्करू द्या
मला ह्या किलिंग मशिनकडून मरू द्या
रिस्क पत्करली कि नाहीसे होतात क्लिशे
रक्तात पाणी भरायला येतात झरतृष्ट आणि नित्शे
मृत्यूला घाबरलो नाही प्रेमाला घाबरू द्या
मला ह्या किलिंग मशिनकडून मरू द्या
मेन टेक्स्ट आहे कि आहे सप्लिमेंट
काहीही असो सद्या आहे माझी सेंटीमेंट
मी काय लिहितोय तिलाही कान टवकारु द्या
मला ह्या किलिंग मशिनकडून मरू द्या
ईश्वर तर मेला आता प्रेमालाही मरू द्यावे का
शरीरात सर्वत्र रोबोटिक्सला वावरू द्यावे का
जिवंतपणाची पागलपंती थोडी तरी करू द्या
मला ह्या किलिंग मशिनकडून मरू द्या
श्रीधर तिळवे - नाईक
(चॅनल : लव , सेक्स एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)
Dec
मित्र संसार मांडायला लागलेत
आणि तुझा अर्धवट कायक संन्यास लोम्बकळलेला
घासून गुळगुळीत झालेल्या सप्तपदया मरत नाहीत
त्या शक्यता आणि अ निश्चिततेच्या अग्निभवती घुटमळत
फेऱ्या मारतायत
विचित्र आणिबाणी
आणि देहात सेक्सचं वादळपाणी
बलिदानाला बळी तैय्यार
वामन दक्षिणा सांगतोय
डोक्यावर पाय ठेवण्याची
लैंगिंक ओढींच्या बोटी दाटीवाटी करून
हृदयाचा डाटा कोण मागतंय
चुंबनाची व्हिज्युअल्स पुरेशी
स्पर्शांच्या टॉर्चेस त्वचेवर प्रकाश टाकतायत
पेशींची संख्या मोजली जातीये
खोली नाही
ई-मेल नंतर शम्मीकपूर
याहू आणि याहो
तू बुडलेला नाहीस पुरेसा माहितीत
जी शेवटी फ्रस्टेशन गिटारसारखी वाजवते
मोक्ष मिळालेला नाही म्हणून उडवली जाणारी खिल्ली
तिला तुझ्या कुलुपाची किल्ली बनू देऊ नकोस
सेटलमेंट ही इंद्रियांनी तयार केलेली नवी अप्सरा आहे
एव्हढं लक्ष्यात ठेव
सेक्स कर पण सिड्यूस होऊ देऊ नकोस
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सेट्रा या काव्य फायलीतून)
तिलाही कळत नव्हतं तेव्हापासून
ती जीन्स ऐकतीये
तिला लेझीम खेळता येते आणि जिमही
तिच्या आवरणांना सौंदर्य म्हटले की ती खुश होते
पण तिला माहित आहे
आवरण हे फक्त संरक्षण आहे
खरा खेळ आतल्या जीन्सचा आहे
ती बुद्धीने बघत नाही
ती संपूर्ण शरीर पणाला लावून बघते
तिला माहित आहे
शेवटी आपणाला फक्त बुद्धी वाढवायची नाही
संपूर्ण शरीर वाढवायचे आहे
आपल्या गर्भात
तिची शैली पुरुषांना कळत नाही
पुरुषांना फक्त तिची शेती कळते
माती खाली काय चाललंय याचा त्यांना अंदाज येत नाही
ते आवरणाचा वरण-भात रोज खातात डोळ्यांनी
आणि समजतात की त्यांना रेसिपी कळलेली आहे
ती फक्त हसत असते आतल्या आत
असे कित्येक खाणारे तिने पचवलेले आहेत
ती ऐकतीये ऐकतीये ऐकतीये
आणि ह्या कानाचं त्या कानाला कळू देत नाहीये
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल लव, सेक्स आणि एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
स्वतःच्या काल्पनिक प्रेयसी निर्माण करत
खराखुर्रा प्रियकर चाललाय
ज्याला स्वतःबद्दल संशय
त्याची कॅमेऱ्यावर कमांड
कवितेवर लँड
आणि स्वतःच्या अस्तित्वात नसलेल्या
पण निर्माण करणे शक्य असलेल्या
दुसऱ्या बॉडीवर मांड
त्याची सेकंड बॉडी कॅमेरात प्रवास करत
जिला माहित नाही कि
ती अस्तित्वात आहे
ती त्याच्या कवितात अनेक रूपे घेऊन येते
आणि कॅमेरात बॉडी न दाखवता बॉडी दाखवते
शक्य आहे की त्याला चित्रपट मिळत नसल्याने
तो ही सेकंड बॉडी निर्माण करतोय
त्याचीही फॅन्टसी त्याच्या रियालिटीवर रियालिटी चेक आहे का
की रियालिटीचा अपुरे पणा तो फॅन्टॅसीने कम्प्लीट करतोय?
त्याची बोटे दोघांची बोटे
त्याचे केस दोघांचे केस
फक्त एक चेहराच
जो त्याला दुसऱ्याचा बनवता येत नाही
आणि दुसरी बॉडी आहे की तिला चेहराच नाही
तो कविता लिहितो
कारण कवितेत दुसऱ्या बॉडीला चेहराही देता येतो
शब्दांच्या मार्फत गंडवणे जास्त सोपे
स्वतःच्या शंभर शार्प काल्पनिक प्रेयस्या घेऊन तो लिहितोय
हजार कविता
लोकांना कळतच नाही की इतक्या पोरी याच्या प्रेमात पडल्या कशा ?
तो खोटारडा आहे का
की तो फक्त ऑडियनस्शी खेळतोय?
ही बॉडीग्राफी पोरनोग्राफी आहे का
की हा स्वतःच स्वतःला दिलेला ऑर्गेजम आहे ?
सांगणे कठीण आहे
कारण सेकंड बॉडी अस्तित्वात आहे आणि नाही
१०० प्रेयस्या आहेतपण आणि नाहीतही
त्याची पाच बोटे रौरव आहेतपण आणि नाहीतही
एक डिजिटल मेगॅनारेटिव्ह चालले आहे का?
की जे काल्पनिक समजले जाते आहे
तेच खरे ऑथेंटिक आहे?
तो काहीच कनफेस देत नाही
फक्त कन्फेशन बॉक्स कोसळताना
तो त्यांचे आवाज काढतो
असे नाही की तो ख्रिश्चन आहे
फक्त चर्च कोसळताना होणारा काल्पनिक आवाज
त्याला रेकॉर्ड करायला आवडतो
त्याच्या कवितेत असे कित्येक रेकॉर्ड केलेले आवाज आहेत
जे फॅन्टॅस्टिक नाहीत फॅन्सी नाहीत
फक्त पांढरे शुभ्र आहेत
मी त्याला पायबंद घालू शकत नाही
कारण त्याला पायाच नाही
मी फक्त डिजिटल गळ्याने गात राहतो
अत्तराचा पाया
आणा तुम्ही राया
आयुष्य फुलात चालले वाया
डिजिटली
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : लव , सेक्स अँड एल्सेटरा या काव्यफायलीतून)
तरुणपणी चुंबन दिले नाहीस
आणि आता मध्यम वयात म्हणतेस
"घे किसेस"
मला वाटलं होतं तू माझी विकेट काढून निघून गेलीस
आता म्हणतेस फिल्ड ओपन आहे
ऑडियन्स मधून विकेट वर पाऊल ठेवणे
इतके सोपे नसते
त्यावेळी जे काळजात होते
त्यातला काळ जात आहे
आणि तू म्हणतेस
आपले प्रेम सनातन आहे
माझं शरीर तुला भगवं दिसतं का?
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव सेक्स अँड एल्सेटरा ह्या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment