नेट बॉलीवूड

सगळे निघून गेलेत बेकायदेशीर कृत्य करायला 

मी बसलोय माझ्यात कायदेशीर 

ज्याला कायद्याचा सन्मान होता 


लोकांना धाक उरलेला नाही 

अटक होण्याची भीती नाही 

लोक माजलेत बेकायदेशीरपणात 

सामूहिक झालेत 

जो कायदेशीर आहे त्याच्या विरोधात 


त्यांना माहित आहे 

हा एकटाच पडणार 


मलाही माहित आहे 

मी एकटाच पडणार 


एकटा पडण्याची भीती मला कधीच वाटली नाही 


ज्याला शिव हवा असतो 

त्याला जीव एकटा असला काय किंवा नसला काय 


काळीज कालवायला बघतात लोक 

त्यांना रक्ताची आमटी करायला आवडते 

मी थाळीत बसायला नकार देतो 


संन्याशाने स्वतःसाठी संपत्ती बाळगू नये 

मी बाळगत नाही 

पण त्याचमुळे अनेकांची अडचण 

तणतण 


त्यांना नैतिक माणूस खणखण वाटते 

नको असलेली 

इको असलेली 

जिला इगो म्हणून बदनाम करता येते 


शॉर्टकटचा दंश प्रत्येकाला 

साप खेळवण्याची हौस प्रत्येकात 

सरकारला फसवले की सगळे सार्थक 


मोक्ष मिळवणाऱ्यांना हा हंगाम परवडत नाही 

त्यांना फुले सुद्धा वसंतात घ्यायला लागतात 


ऋतू संयम शिकवतात 

पण पैशांना ऋतू नसतो 

आणि लोक पैशासाठी ऋतूंना पिरगळतात


वाट पाहण्याचा संयम संपलेला 

प्रत्येकाने कायदा मोडण्याचा एक तुकडा ढापलेला 


मी पडलोय एकटा 

पण मी झुकणार नाही 


पळून तर अजिबात जाणार नाही 


माझा विश्वास आहे 

सत्य स्वतःत थांबले 

की विजयी होते 


श्रीधर तिळवे नाईक 

(नेट सिरीजमधील नेट बॉलीवूड या काव्यफायलीतून)


लोक मान्यतेचं राज्यकारण खेळतात 

मी मान्यता न मिळण्याचं राजकारण खेळतो 


मला भय आहे 

मला मान्यता मिळताच 

कविता दत्त म्हणून उभी ठाकणार नाही 

आणि माझा संजय होईल


श्रीधर तिळवे नाईक 


(नेट सिरिजमधील नेट बॉलिवूड या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना