चॅनेल वर्डस

मी बाण म्हणून 

डोळाच मारला 

डोळाच वारला 

कॅमेरा मध्ये 


मग मी कॅमेरा म्हणून 

कॅमेरा मारला

डोळा जन्मला 

कॅमेरा म्हणून 


मग मी जन्म मारला 

मृत्यू म्हणून 

मृत्यूत मग कॅमेरा

डोळा म्हणून जन्मला 


मग मी सर्व काही फेकून मारले 

सर्व काही मग तात्कालीक वारले 

त्यांनी तात्कालीक तिकीट काढले 

आणि वॉर यात्रा केली 


आता फक्त डोळे आणि कॅमेरे 

शिजलेले 

मेलेले 

रिटर्न तिकीट घेऊन 


श्रीधर तिळवे नाईक

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्डस या काव्यफायलीतून)

अमेरिके तुझ्याबरोबर माझी स्पर्धा

राहीन तुझ्याशी समकालीन

अंगावरचे कपडे काढेन आणि 

तरीही राहीन एकदम शालीन


मला वीट आलाय लॉग भरून काढण्याचा 

सतत कॉपी मारण्याचा 

डुप्लिकेट म्हणून वावरण्याचा 

आता मला व्हायचंय 

एकदम ओरिजनल 

नाही तुझा डमी हीन 

अमेरिके 

तुझ्याबरोबर माझी स्पर्धा 

राहीन तुझा मी समकालीन 


किती वेगाने धावत राहतेस 

भारतामध्ये अवतरत राहतेस 

सगळीकडे तुझ्याच नकला 

सगळीकडे तूच वाहतेस 


गुलाम गिरीविरुद्ध युद्ध करणारी 

तूच आहेस पहिलीं कंट्री 

तुझ्यामुळेच एक्झिट डिझाईन 

होते तुझ्यामुळेच एन्ट्री 


तुझा बदलला आता तोरा 

युद्ध करतेस तरातरा

तुझ्याकडूनच मेकअप येतो 

तुझ्याकडूनच येतो नखरा 


तुझ्याकडून येतो कॉम्प्युटर 

तुझ्याकडूनच येतात टीव्ही 

तुझ्याकडूनच सीट कॉम येतात 

कुलपे आणि नवीन चावी 


तरीही करतोय तुझ्याशी स्पर्धा 

माझी कविता तुला समांतर 

आय होप की भरून काढले 

मी आहे पिढ्यांचे अंतर 


तुझ्याबरोबर अपडेट राहीन 

त्वचेवर ठेवीन तुझी झिनझिन 

अमेरिके 

तुझ्याबरोबर माझी स्पर्धा 

राहीन तुझ्याबरोबरच समकालीन


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्ड्स या काव्य फायलीतून)



खोटं बोलून बायकांना झाकता झाकता 

मी मिथ्या झालो आतून वाकता वाकता


मुखवटे चेहऱ्यावरचे झाले डोईजड 

थांबता थांबली नाही काळजातली पडझड 


रक्तातले मोबाईल लँड फोन झाले अडकून 

आलेले सगळे कॉल कळले नाही कधी गेले तडकून


हाकललाही गेलो जिथे ठोकला मुक्काम 

मला सहन झाला नाही संसाराचा तामझाम 


कमिटमेंटची कदाचित वाटत होती भीती 

पुरेसा पडणार नाही म्हणून व्याकुळली छाती 


मलाच नाही द्यायची होती मग मागणार कशी कमिटमेंट 

असा राहिलो त्वचेवर जसे वाऱ्यात राहतात टेन्ट 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : वर्ड्स या काव्यफायलीतून)


 भारतीय म्हणून जन्मलायस 

पण अमेरिकेत जाऊन मर 

किंवा इंग्लंडमध्ये किंवा 

कुठेही परदेशात 


घेत रहा देशाचे नाव 

अभिमानाने सांगत रहा इथली परंपरा 

इथले धर्म 

इथले संत 

इथले सिद्ध 

इथले बुद्ध 

इथले क्लासिकल कलाकार 


परदेशात त्यांची डिमांड प्रचंड आहे 

त्यामुळे त्यांना अधिक डिमांडेबल बनव 

त्यामुळे मिळणारी इज्जत कमवत राहा

पण इथे मरू नकोस 

परदेशात जा  

आणि परदेशी नागरिकत्व घेऊन परदेशात मर


शक्य आहे की तुझा पूर्वज या देशासाठी लढला असेल 

या देशातल्या त्याच्या शौर्यगाथा वंदनीय असतील 

पण तुला भारतासाठी लढायचं असेलच असे नाही 

परदेशात जा 

भारताविरोधात लढ 

आणि लढता लढता भारतातल्या परंपराविषयी बोल 


कदाचित तुझा पूर्वज असेल इथला उद्योगपती 

परदेशात त्याच्या नावाने मोठा बिझनेस सेटअप कर 

कर चालू 

एक इंटरनॅशनल ब्रँड 

इथे इन्कम टॅक्स जास्त आहे

इथले रोड खराब आहेत 

इथली जनता करप्ट आहे 

अशी कारणे दे 

परदेशात गेल्यामुळे तू कसा करप्ट नाहीस

परदेशात गेल्यामुळे तू कसा सद्गुनी आहेस 

ते पटवून दे

देशाविषयी कर्तव्य कोणाला आहे 

ज्याला त्याला स्वतःला 

हाच तर आहे हिशेब इथला 

हिशेब सांभाळत परदेशात जा

कमव 

आणि परदेशात मर 

पण मरताना या देशातील परंपरा सांगत रहा 


पैसा नसेल तर ज्ञान घेऊन जा 

तिथल्या ज्ञानाची सेवा कर 

तिथल्या इन्स्टिट्यूशन मध्ये झेंडे लाव 

इथले लोक तुला भारतीय म्हणून मिळतील 

व्याख्यानाला बोलवतील 

त्यात स्वतःचे सार्थकत्व सिद्ध कर 

त्यात त्यांनाही सार्थकत्व वाटेल असे बोल

शेवटी विद्वान माणूस कुठल्याच देशाचा नसतो 

असे संस्कृत परंपरेने म्हटलेलेच आहे 

तेव्हा परदेशात ज्ञान तयार कर 

इथल्या लोकांना ते भरव 

म्हणजेच इथल्या लोकांनाही तू मोठा वाटशील 

भारतातल्या विद्वानांना इथे खाटांचीही किंमत नाही

तेव्हा फॉरेन रिटर्नचा शिक्का घे 

तिथल्या ज्ञानात ज्ञानपरंपरेत सेटल हो 

मात्र इथली परंपरा सांगायला विसरू नको 

ती सांगत सांगतच परदेशात मर


काळजी करू नको 

तुझ्या सारखे अनेक आहेत 

जे भारताचा यथेच्छ अभिमान बाळगतात 

भारताविषयी खूप खूप बोलतात 

मुलांना मात्र परदेशात सेटल व्हायला पाठवतात 

त्यांना भारताविषयी काय वाटते 

कसला अभिमान वाटतो 

देशाभिमान वाटतो म्हणजे काय वाटते

प्रश्न विचारू नको 

कारण जो तो कम्फर्टेबल असणे शोधतो 

किंबहुना भारतीय असण्याचा अर्थच 

आपल्यापुरते आपले पाहणे आणि कम्फर्टेबल जगणे 

तेव्हा तुही भारतीय आहेस 

देशाशी कशाला कर्तव्य आहे 

फक्त देशाच्या नावाने परंपरा मिरवता आली पाहिजे 

ती परंपरा मिरवत रहा 

सगळा धंदा सगळे तोड पाणी परदेशात सेटल कर 


भारतीय म्हणून जन्मलास 

पण परदेशात मर 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्डस या काव्यफायलीतून)

असं कि साम्भा घोडा घेऊन घोडीवर 


पण घोडी दिसत नाही बरं का 


आपण गृहीत धरायचं 


गब्बर दहशतीचा काळाबाजार करत 


तो मुस्लिम असं आपण गृहीत धरायचं 


डिमर प्रकाशाचा पहाड उतरत उतरत 


पाऊस पडतोय असं आपण गृहीत धरायचं 


मगरीच्या पाठीवर हिरे जडलेले 


आणि त्यावर हात तुटलेला ठाकूर असं आपण गृहीत धरायचं 


आणि 


मग 


कि दाबली कि शोले 


श्रीधर तिळवे नाईक


(सिरींजमधील  words काव्यफाईलीतून )

कॅम्पुटर बरोबर रोमान्स सुरू झाला आहे 

एक अशक्य असा डान्स सुरू झाला आहे 


वाटले नव्हते कधी मला मीही याच्या प्रेमात पडेन 

चिन्हांच्यातला ट्रान्स सुरू झाला आहे 


कधीच आदर दिला नव्हता मी कुठल्या उंदराला 

बिळात घुसण्याचा चान्स सुरू झाला आहे 


प्रथमच मला गोष्टींचे वेग उम जायला लागले

माझ्या वेगाबाहेर एक ग्लांस सुरू झाला आहे


असे काही न्यूड सारे स्क्रीनवर अवतरते की 

भारतात राहूनपण फ्रान्स सुरू झाला आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्ड्स या काव्यफायलीतून)


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

मोक्ष LOVE