डेकॅथलोन भक्ती
वो शिवजी है जानबुझके ऐसे हालात बनाते है
हालात के आईने मे सबके चेहरे नजर आते है
जो धुंधला है वो होने लगता है साफ साफ
जो असली आपके हैं वे साथ में टीक जाते हैं
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथ लॉन सिरीज मधील Decathlon भक्ति या काव्य फायलीतून)
येणारा प्रत्येक माणूस नुकसानच करून जातो
कितीही स्वच्छ ठेवा पाणी घाणच करून जातो
शत्रू काय आहे शार्क मासा की देव मासा
कळेपर्यंत अस्तित्वावर वरताणच करून जातो
चोहीकडून येतात अंगावर मशीन चालून
माझा अवसानघात धनुष्यबाणच करून जातो
ब्रम्ह अनुभव नाहीं ब्रह्मज्ञान सांगतो आहे
हा पुरोहित थापाड्या दंतलिखाण करून जातो
फेटाळायला हव्यात मलाच साऱ्या श्रद्धा
निवडलेला प्रत्येक देव धूळधाणच करून जातो
मी निवडला आहे आता महादेव हाच देव
पाहू दे ज्ञान देतो की मला ज्ञानच करून जातो
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलोन या सिरीजमधील डेकॅथलॉन : अनकॅट्यागरीकल : भक्ति या काव्यफायलीतून)
बिघडलेलं दुरुस्त करणे इतकं सोपं असतं
ब्राह्मण प्रथम मोक्षाचे केस कापतात
आणि त्यांची शेंडी बनवतात
संपूर्ण समाजाला शेंडी लावत जातात
त्यांनी निर्माण केलेल्या पुरुषाला
चार वर्ण फुटतात
आणि असंख्य जाती
ते पुरुषाचे डोके असतात
आणि डोके बनून सर्वांच्या डोक्यावर बसतात
ते मोक्ष मिळवत नाहीत अनेकदा पण मोक्षावर बडबड करत राहतात
जेणेकरून मोक्ष धर्माच्या ताब्यात राहावा
बिघडलेल्या मोक्षाला दुरुस्त करणं सोपं नसतं
प्रत्येक गोष्ट ब्राह्मणी करण्याचे त्यांचे कसब
त्यांना खाटीक बनवते
आणि ते काल्पनिक देवांना काल्पनिक हिंसा करायला लावतात
त्यांना आपल्या तालावर नाचायला लावतात
त्यांची शस्त्रे ते स्वतःची शस्त्रे म्हणून वापरतात
समाजाच्या हे लक्षात येत नाही
ते त्यांनी नाचवलेला देव
पूजतात
बिघडलेला देव दुरुस्त करणे एवढे सोपे नसते
ते भक्ताच्या कथांना भाकडकथा बनवतात
ते मूळ देवांना भक्ती देव बनवतात
आणि मंदिरांचे ठेके बनवून बळकावून
सगळे उत्पन्न स्वतःच्या खिशात टाकतात
देवांची विक्री खरेदी चालू राहते
आणि भक्त स्वखुशीने त्यांच्या दुकानात जाऊन
खिशातले पैसे देवाला देत राहतात
जे त्यांच्या खिशात पॉकेट मनी म्हणून राहते
आणि जी अनेकदा ड्रेस पेक्षा मोठ्या असलेल्या पॉकेटमध्ये विसावते
या देशांमध्ये
सनातन फक्त धर्म लूट आहे
तेव्हा बघ
या दुकानदारीत सामील होशील
तर भक्त म्हणून मोक्ष मिळणार नाही
तुला तुझा वेआऊट काढावा लागेल
मोक्ष म्हणजे धर्माचे हम रस्ते सोडून
स्वतःची पायवाट निर्माण करत
शून्य गाठणे
त्या वाटेवर तुझ्याच आतल्या मगरी आहेत
हिंस्त्र जनावरे आहेत
आणि अनेकदा केले गेलेले उपदेश आहेत
मोक्षाच्या मार्गावर स्वतःच करायचा मर्डर पावलो पावली उपलब्ध असतो
तेव्हा बघ
महामार्ग चघळायचे
की पायांनी वाट निर्माण करायची?
कुठल्याही वाटेवर
वाट लागण्याचा धोका राखीव ठेवला गेला आहे
जाणतोसच
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन : अनकॅटेगरीकल : भक्ती या काव्यफायलीतून)
तो दहा नळ उघडे करून बसलाय
एक xx गणपतीच्या नावाने
एक xx विठ्ठलाच्या नावाने
एक xx तुळजाभवानी च्या नावाने
एक xx शंकराच्या नावाने
एक xxxच्या नावाने
एक xx बाईच्या नावाने
एक xxच्या नावाने
एक xx xx च्या नावाने
एक कुल xxxच्या नावाने
एक कुल xxच्या नावाने
आणि दहा नळातून पाणी येतय
त्याला कळत नाही कुठल्या नळातून पाणी भरावे
तो दहा कळश्या लावेतोपर्यंत पाणी वाहून जातं
आणि त्याची एकही कळशी नीट भरली जात नाही
तो ईश्वराला दोष देतोय
मी म्हणतोय तुझी कपॅसिटी फक्त एका नळाची आहे
तो ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
जो फळेल तो आपला नळ
इतका तो फळण्यावर अवलंबून आहे
मी म्हणतोय
जोवर इष्टदेवता निवडत नाहीस
जोवर तुझा एक नळ निश्चित होत नाही
तोपर्यंत तुझी घागर कायम उपडी पडणार आहे
ईश्वर तुझ्यापेक्षा शहाणा आहे या एकातरी गोष्टीवर विश्वास ठेव
की ईश्वरांला सुद्धा तू तुझ्या हिशेबाने चालवणार आहेस ?
तो हिंदू आहे
त्याचा अहंकार मोठा आहे
तो स्वतःला ईश्वरापेक्षा शहाणा समजतो
कारण तो हिंदू आहे
तो ऐकत नाही
तो म्हणतो मला एक देव दिसत नाही
मी म्हणतो मग निदान एक ईश्वर स्वीकार
ईश्वर शब्द भाषेमध्ये आपोआप आलाय का?
पहिला एकेश्वरी धर्म शैव लोकांचा आहे
तेव्हा पुजायचाच असेल तर एक ईश्वर पुज
ईश्वरलिंग स्थापन कर आणि त्यात विलीन हो
कळशा आपोआप एका मागोमाग एक भरल्या जातील
तो ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
त्याला अनेक लोक शिकवत आहेत की
अनेक देव असणे हेच हिंदू असण्याचे लक्षण आहे
मी म्हणतो
सगळ्या आदिवासी टोळ्यांच्यात
अनेक देवांची परंपरा होती
तेव्हा तू काही वेगळा नाहीस
जरा तुला मिळालेल्या डोळ्यांनी आदिवासी टोळ्या बघ
आफ्रिकेतल्या टोळ्या बघ
दक्षिण अमेरिकेतल्या टोळ्या बघ
भारतातल्या टोळ्या बघ
सगळ्यां टोळ्यांच्यात अनेक देव आहेत
फक्त तुझ्या धर्मात नाहीत
तुला केवळ टोळीबाज बनवण्याचा हा कट आहे
अनेक देव असणे
तू अजूनही टोळी संस्कृतीत असल्याचे थांबल्याचे लक्षण आहे
तो ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
मी म्हणतो किमान आराध्य देव एक ठेव
जसा तुकोबाने विठ्ठल ठेवला
निवृत्तीनाथांनी शंकर ठेवला
कबीराने राम ठेवला
पण तो ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
तो आपल्या संतांचे नाव घेतो
पण आपल्या संतांचेसुद्धा ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
दहा ठिकाणी नळ लावणे
यामध्ये त्याला भूषण वाटते
आदिवासी संस्कृती शहरातसुद्धा उभी करणे
हे त्याला भूषण वाटते
कारण तो हिंदू आहे
त्याची कळशी कायम उताणी असते
आणि तो त्यालाही न कळणाऱ्या समुद्रावर बोलत असतो
वाहत्या नद्यांच्या वर बोलत असतो
पाण्याने रिकामा असलेला मनुष्य
स्वतः वाळवंट झालेला मनुष्य
वाळवंटाखाली आपला खेळ मांडणारा मनुष्य
सतत १०- २० -३० नळांविषयी बोलतो
३३ कोटी नळाविषयी बोलतो
कारण तो हिंदू आहे
मी त्याला म्हणतो
प्रत्येक नळ सर्वोत्कृष्ट आहे प्रॉब्लेम तुझ्यात आहे
तू एक नळ पकडत नाहीस
त्याच्यापुढे कळशी लावत नाहीस
म्हणून तुझी कळशी
घडली जात नाही
भरली जात नाही
आणि आता तर अवस्था अशी की
तुझ्या कळशीला जागोजागी लिकेज आहे
पाणी टिकत नाही
तू कायम ताणलेला तहानलेला
इतका की तुला ख्रिश्चन देव सुद्धा
नळासारखा वाटायला लागला
तुला मुस्लिम देव सुद्धा
नळासारखा वाटायला लागला
आता तिथेही कळशा घेऊन जातोस
त्यासाठी दर्गे इनव्हेंट करतोस
फक्त कधीतरी नवसाने
एक थेंब कळशीत किंवा घागरीत येतो
त्यावर खुश राहतोस
आणि समुद्रावर बोलतोस
तो सर्व या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडतो
कारण तो हिंदू आहे
भगवान शंकरांनी
फक्त शिवाची पूजा करायला सांगितली होती
किंवा शक्तीची
फक्त पहिल्या अवस्थेत महाप्राणाची ईश्वराची
दुसऱ्या अवस्थेत मात्र फक्त शिव किंवा शक्ती
बाकी कुठल्याही देवताची पूजा करायला
भगवान शंकरांनी सांगितलेले नाही
पण तू भगवान शंकरांचीच पूजा चालू केली
भगवती पार्वतीचीच पूजा सुरू केली
निदान आता तरी फक्त शिवलिंग बघ
तिथे कुठेही चेहरा नसतो
चेहरे तुम्ही काढायला सुरुवात केली
पण आता तरी निदान शिवलिंग जसे आहे तसे बघ
तो बघत नाही
कारण तो हिंदू आहे
प्रत्येक देवाचा मनुष्यदेव करणे
त्याला जणू हक्क वाटतो
देवाला मनुष्यासारखे बनवणारे लोक त्याला आवडतात
तो मनुष्याच्या सगळ्या तृष्णा देवांना देतो
मग आदिवासी लोकांच्या देवता सारखे
त्याचेही देव चिडतात
चिडचिड करतात
शाप देतात वर देतात
शेवटी त्याचा देव देवच राहतो
ईश्वर बनत नाही
कारण तो हिंदू आहे
ज्याला ईश्वर सुद्धा स्वतःच्या हिशोबाने चालवायचा आहे
मी म्हणतो,
"नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे "
तो ऐकत नाही
कारण तो हिंदू आहे
मी आता काहीच म्हणत नाही
कारण धर्म कधीच
हिंदूंचे अनेक देव प्रमोट करणे सोडणार नाही
हे मी जाणतो
जितके देव तितके व्रतवैकल्य तितके कर्मकांड
जितके व्रतवैकल्य कर्मकांड तितका पैसा
मी थेंबाला पावसाळा म्हणणाऱ्या लोकांच्यात राहावे का
विचार करतोय
मी टोळ्यांच्यात राहायला नकार देतो
लोक म्हणतात
तू आदिवासी संस्कृतीचा अपमान करतोयस
मी म्हणतो
आदिवासी आदिवासी आहेत
त्यांचा या सर्व गोष्टींच्यावर ऑथेंटिकली विश्वास असतो
तुम्ही हिंदू आहात
तुमचा या सर्व गोष्टींच्यावर ऑथेंटिक विश्वास नाही
आदिवासी थेंबात समुद्र बघतात
आकाश बघतात जंगल बघतात
त्यांना ईश्वराची गरजच नसते
कारण निसर्गच त्यांचा ईश्वर बनतो
तुम्ही निसर्गाची हत्या करता
तुम्ही थेंबांना पुजता
आता तुम्ही ठरवा काय व्हायचं ते
आदिवासी कि खरे भक्त?
जसे ज्ञाननाथ होते
अक्कमा होती
तुकाराम होते जनाबाई होती गोरा कुंभार होता
त्यांना मी काय म्हणतो ते कळत नाही
कारण ते हिंदू आहेत
ते आता बोलत नाहीत
माझ्यासमोर नळ ठेवतात
त्याच्यावर कळशी घागर उपडी ठेवतात
आणि म्हणतात
पाणी भरण्याची हीच खरी रित आहे
पाणी खालून वर चढत जाते
मी काहीच म्हणत नाही
घागरीत व कळशीत पाणी साठत नाही
ते वहात वाहत झरे बनते ओढा बनते नदी बनते
पण कळशीत येत नाही
घागरीत येत नाही
गेले कित्येक महिने
मी फक्त उपड्या असलेल्या कळशा घागरी पाहतोय
आणि ईश्वराबरोबर पावसाळा काखेत मारून
गावाला वळसा घालतोय
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन: अन कॅटेगरी कल : भक्ती या काव्यफायलीतून)
तू फक्त भक्त आहेस
देव नाहीस
म्हणूनच तुझ्याजवळ शस्त्र नाही
तुझ्या डोक्यावर शिवलिंग
तुझ्या शिवावरच्या भक्तीचे प्रतीक
त्याला तू स्वतःच्या डोक्यात घ्यायचे म्हणून डोक्यावर ठेवलं आहे
तुला खात्री आहे की तुझा हा देव
तुझ्या डोक्यावरचे शिवलिंग
तुझ्या डोक्यात सोडेल
आणि तू मुक्त होशील
तू शिवारकरी
तू धनगर
आणि विटा बनवणारा
तुझ्या हातातला गुरांना हाकणारा आणि विटांना आकार देणारा
दंडू दिसत नाही
कारण तो दिसला की
तू देव नाही हे कळेल
भक्त आहे हे कळेल
याची सार्थ भीती आहे
पांढरेश्वर किंवा पौंड्रेश्वर
तू ईश्वर म्हणून स्वीकारलायस
आणि तू लाडाने त्याला पांडुरंग म्हणतोस
आणि म्हणूनच लोक तुला मुक्ती नंतर पंढरीनाथ म्हणतात
कारण तू नाथ आहेस
तुझी बायको सुरुवातीला तुझ्यासोबत नव्हती
नंतर ती आली
तुझ्यासोबत शंकराची साधना करत उभी राहिली
तिलाही फक्त शिव पाहायचा आहे
म्हणून ती तुझ्याकडे पाहायलाही आता तयार नाही
इतकी ती शिवरूप झाली आहे
तुला मोक्ष मिळालाय
म्हणूनच तुझ्या चेहऱ्यावर शांती आहे
मी तुला देव म्हणून नमस्कार करत नाही
मी तुला सिद्ध म्हणून नमस्कार करतो
केवळ विटेवर उभे राहून
कोण साधना करतो आजच्या जगात ?
केवळ तुलाच अशी विट बनवणे शक्य होते
कारण तू वीट बनवणारा होतास
सगळी भुकांची तृष्णांची निकडीची गुरं
तू नियंत्रणात आणलेली होतीस
या अर्थाने तू गुरव आहेस
आता लोक विटेवर उभे राहिले की त्यांना वीट येतो
आणि ते साधनेतून पळ काढतात
आणि कर्मकांड करतात
तू मोक्ष मिळेपर्यंत हटला नाहीस
तुझ्या विटेवर उभा राहिलास
तू शिवारकरी
तू धनगर
तू विटेचा कारखाना काढलेला
तू संपूर्ण कारागीर
तुझे दर्शन घेतल्याशिवाय
पांडुरंग पावत नाही
शिव मोक्ष देत नाही
म्हणून मी तुझे दर्शन घ्यायला आलेलो आहे
विठ्ठला
तू तुझ्या युगाचा सर्वश्रेष्ठ योगी होतास नाथ होतास
जो मोक्षाला पोहोचला
विठ्ठला
मी ही तिळवे भांडार नावाच्या एका विटेवर उभा आहे
आपली वीट म्हणजे आपला काम करण्याचा एरिया
हे मी तुझ्याकडूनच शिकलो आहे
विठ्ठला
तुझ्या डोक्यावरून नाहीसे झालेले शिवलिंग
आता माझ्या डोक्यावर ठेव
आणि मलाही तुझ्याप्रमाणेच शिवारी करण्याची संधी दे ताकद दे
मलाही अनुभवायचंय
मेंदूचं शिवलिंग कसं होतं ते
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन अनकॅटेगरी कल : भक्ती या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment