निर्वाणा वेळच्या कविता

वय वाढत जातं 

तसं स्वतःचं अज्ञान वाढत जातं 

जे स्वतःला समजतात सर्व साक्षी 

ते धन्य होत 


पापुद्रे पाहण्यात हयात गेली 

आणि कॉसमॉसचा कांदा तर चिरता आलाच नाही 


तीव्र वास येईल म्हणून वाट पाहिली 

तर गंध पोहोचायला लाईट ईअर्स लागणार हे कळाले 


शेवटी ठरवले 

आपण आपल्या अस्तित्वाच्या चाफ्यालाच उमलवत बसवावे 

झाडे मोजायला जावे 

इतकी आपली लायकी नाही 

जंगलाला वाढू द्यावे 

आपल्या आसपास 

त्यातील काही जगणार 

काही पुन्हा जन्मणार 

काही मरून जाणार 


आपला रोल फक्त आपल्या पुरता आहे 


आपण नाटक लिहिले तर 

ते आपल्यापलीकडे जात नाही 


कोणी सांगितलं जगाचा रंगमंच करायला ?


स्वतःची त्वचा माहित नाही 

आणि ब्रम्हांडांच्या केंद्रांची व्याख्या करायला निघालेत 


भावनांची ताकद प्रथमच कळतीये 

त्या कशाशीही जोडून घेता येतात त्यासाठी ज्ञान आवश्यक नसते 


आपण कनेक्ट व्हावे 

आणि मोकळे ही व्हावे 


बाकी जे वीजदार आत चालून येईल 

त्याचे बीज वाढू देऊ नये 


उलट शून्याची वाट पहावी 


आणि ते आत आले की 

आपल्यातील समष्टीचा 

 त्याच्याशी गुणाकार करावा 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणा वेळच्या कविता या काव्यफायलीतून) 


त्रास गेली निराशा गेली 

खोटी उथळ आशा गेली


असुरक्षिततेचा उडाला पत्रा 

संतापाची विरघळली जत्रा 


नैराश्याचे पांगले ढग 

शिल्लक उरली नाही रेघ 


म्हातारपणाचे वस्त्र गळले 

मृत्यूचे उरातील भय जळले 


आनंदाचा कल्लोळ झाला 

श्रीधर आनंदात नाहीसा झाला 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणावेळच्या कविता या काव्यफायलीतून)


पूर्वी फक्त शब्दच खोटे असायचे 

आणि लोक डोळ्यावर विश्वास ठेव म्हणायचे 


आता दृश्येही खोटी झाली 

आणि अनुभवही 


सगळंच पडद्यातून चालत यायला लागलं 

आणि जे चालतं ते खरं की खोटं 

डोळ्यांना कळणं मुश्किल झालं 


ऑडिशन्स यायच्या 

आणि त्यावर विश्वास ठेवता यायचा 


आता ए.आयच्या साह्याने कोण काय बदलेल सांगता येत नाही 

म्हणजेच पुन्हा एकदा प्रत्यक्षाचे आगमन 


जे समोर आहे तिथेही मेकअपचा प्रॉब्लेम आहेच 

शिवाय आपल्या नावाने कोण अकाउंट उघडेल 

हे सांगणं कठीण 


आपल्या किती फेक आयडेंटिटीज कोणा कोणाशी कसला कसला शेक हँड करतायेत कोणास ठाऊक?


आपले चेहरे कुठे कुठे डकवले जात आहेत 

कोणास ठाऊक?


ठोकमपट्टी हीच घोकम पट्टी झालीये

ज्यात चाय कम पाणी जास्त 


दुधाच्या जागी सुद्धा मिल्क पावडर सेटल 


जोवर क्लोन्स आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत भीती नाही 

पण क्लोन्स ताब्यात आहेत कुठं ?


आपल्या या आयडेंटिटीज आपल्याला माहीत सुद्धा नाहीत तिथे ताबा फार दूरची गोष्ट 


आपण पसरलोय 

आणि आपला पसारा आपल्यालाच माहीत नसावा ?


महादेवा 

तुझा तिसरा डोळाच बरा बाबा 


सगळंच राख झालं 

तर काय आर्टिफिशियल आणि काय डिजिटल आणि काय रियल?


मी आयुष्यात प्रथमच 

डोक्यात राख घालून 

चाललोय 


श्रीधर तिळवे नाईक


(निर्वाण या सिरीज मधील निर्वाणावेळच्या कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA