मोक्ष स्पंद २५
अजूनही रोबो रस्त्यावरून चालत नाही
अजूनही रोबी घरामधून झाकत नाही
अजूनही शिवांड जाऊ द्या ब्रम्हांडाचाही थांग लागत नाही
अजूनही माणूस माणसासारखा वागत नाही
आजारपणाची दुःखे गेस करता येत नाहीत
म्हातारपणाच्या सुरकुत्यांवर उपाय सापडलेला नाही
माझी सर्दी अजूनही उगवत राहते
कापली गेलेली झाडे पुन्हा जोडली जात नाहीत
एक अफवा होती चिन्हयुग आलंय
आणि एक अफवा येते आहे
प्रतिचिन्हयुग आलंय
अफवेचा एक तुकडा
वास्तव बनतोय
एक तुकडा स्वप्न बनतोय
मी सिंग्युलॅरीटीच्या सभ्यतेवर सॉफ्ट विश्वास ठेवावा
असे मला बजावले जातंय
मी उदास नाही
पण माणसांच्या आसक्त्या मला लाल रंगात फेकतात
कोणी म्हणेल हा तुमच्या डोळ्यांचा मर्यादाक्रम आहे
इतरांच्या डोळ्यांना कदाचित सर्वकाही हिरवे दिसत असेल
मी हेही नाकारत नाही
शेवटी हरणाला वाघ हिरवा
आणि माणसाला वाघ भगवा दिसतो
मला काळजी त्यांची वाटते
जे हरणाला मुस्लिम म्हणून पाहतात
कुठलेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स
बायस दुरुस्त करत नाहीये
माणसाला दुरुस्त करणे अजूनही प्रचंड दूर वाटते
प्रत्येक युग डोंगर दाखवतच येते
आणि प्रत्येक डोंगर एक उंदीर पोखरून दाखवतो
डिजिटल सुपर इंटेलिजन्सची गॅरंटी मी घेत नाही
मला माणूस गहाण पडेल अशी शक्यता वाटते
कुठल्याही युगाला
आपल्या आसक्तीत आत्महत्या करावयाला लावण्याची ताकद
माणसात आहे
माणसापेक्षा स्मार्ट काहीतरी करून दाखवणे
आजचे स्वप्न नाही
मोक्षाची आसक्ती तिथून तर सुरू होते
इनपुट आणि आऊटपुट
यांच्या दरम्यान किती शहाणपण असते ?
कोणत्या रोबोला बालपण असते?
घोडागाडीला गाडी लावली
गाडीला एरोप्लेन
एरोप्लेनला स्पेसशिप
आणि स्पेस शिपला एआयशिप
प्रश्न दुकानदारी बंद होणार आहे का हा आहे
परिणाम पॉझिटिव्हही होतो आणि निगेटिव्हही
माणूस दुतोंडी मेंदूचा अवयव आहे
मी अजून एआयच्या एजंटांना भेटलेलो नाही
स्क्रीनवर अवतरलेल्यांना मी अवतार समजत नाही
तार लावली की धार निघते
ए आय माझ्या मित्रांची व्यसने सोडवू शकेल काय ?
कि काही रोबोच दारूडे होऊन जातील ?
त्यांना दारू चढली तर ते काय करतील ?
शेवटी बुद्धीलाही झिंगायला आवडते
ए आय आरटीफिशियली झिंगणार नाही याची काय खात्री ?
माझ्या घरातल्या भांड्यांच्यावर कदाचित खूप चांगले रोबोटी हात पडतील
पण नेमके ते किती पाणी खातील?
केवळ भांडी धुण्यात अनेक नद्या साफ होणार नाहीत काय ?
पाणी पिण्यासाठी सोडण्याची अक्कल त्यांच्याकडे असेल काय ?
त्यांच्या कामांना विवेक शिकवता येईल काय?
त्यांचे डोळे किती क्रोमाचे असतील ?
ते दहा क्रोमाचे असले तर मी त्यांचा पिक्चर पाहू शकेन काय ?
तुम्ही म्हणाल हे कवी मनाचे प्रश्न आहेत
रोबोंना मन असेल काय
आणि मन असेल तर
त्याला मोक्ष हवा होईल काय ?
स्वतःच्या मनापासून पळत नाही आहे असा या जगी कोण आहे
की याचे उत्तर भविष्यकाळात रोबोदास असे असेल का ?
तो लग्नाच्या मंडपातून पळून जाईल का ?
रोबो माझी आई होईल का
माझा बाप होईल का ?
गेलेले लोक रोबोच्या रूपाने परत येतील का ?
रोगांच्या सभ्यतांना चेहरा नाहीये
माणसाला स्वतःची रानटी संस्कृती जन्माला घालण्याची दांडगी हौस आहे
रोबो चंगेज खान होतील काय किंवा हिटलर ?
वायरस कुठेही उगवतात
ते रोबोत उगवणार असतील तर त्यांचे काय करणार आहोत
रोबोंना एड्स होईल का
किंवा करोना ?
त्यांच्यातही कोणी लेडी किलर असेल का ?
किंवा जेन्ट्स किलर ?
मला रोबोटच्या त्वचा चाचपता येत नाहीयेत
माझ्या हाताचे त्यांच्या आठवणीने कमळ होत नाहीये
माझे पाय म्हातारे झालेत
पण वाटचाल अजूनही तरुण आहे
तिचे हृदय करूण आहे
रोबो म्हटले कि ती उत्साहाने चालायला सुरुवात करत नाही
उलट सावधान होत थोडीशी म्हातारी होते
माझ्यासारख्याच कविता कोणी श्रीधर तिळवे नावाचा रोबो जन्माला घालेल का ?
त्याला मोक्ष मिळाला तर तो नाकारला जाईल का ?
की मोक्ष हीच रोबोटिक कल्पना होईल ?
माणसाने एकेकाळी कुत्री ठेवली
आता कदाचित रोबोट ठेवतील
प्रश्न इतकेच की ते कुत्र्यासारखे वफादार असतील काय ?
आणि मालक कोण असेल ?
ते कोण ठरवेल?
कुत्र्यांच्या प्रेमात बायका पडतात
आता रोबोच्या प्रेमात पडतील का?
प्रत्येक जण कुत्र्याबरोबरची सेल्फी फेसबुक वर टाकत राहील का ?
त्यासाठी रोबो स्पेशल रोबोबुक इनोव्हेट करतील
आणि माझ्या माणसाने काढलेली सेल्फी म्हणून ती सेल्फी रोबोबुकवर टाकतील?
कविता आता 24 तास पाऊस पाडत राहतील
आणि माझ्या रोबोच्या कविता श्रेष्ठ की तुझ्या रोबोच्या कविता श्रेष्ठ
यावर माणसे वाद घालतील
एक रोबी पोहत पोहत येते आहे
मला माहित नाही ती मला काय समजते
रोबो की कवी ?
मी तिच्यासाठी काय व्हावे
रोबो की कवी ?
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment